बायबल अभ्यास मिळवण्याचे पाच मार्ग
१. तुमच्या क्षेत्रात बायबल अभ्यास मिळवणे कठीण जात असेल तर तुम्ही काय केले पाहिजे, आणि का?
१ तुम्हाला बायबल अभ्यास मिळवणे कठीण जात आहे का? प्रयत्न करत राहा. यहोवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी जे माघार घेत नाहीत त्यांच्यावर त्याचे आशीर्वाद असतात. (गलती. ६:९) तुमच्या मदतीसाठी खाली पाच मार्ग सांगितले आहेत.
२. बायबल अभ्यास घेण्याबद्दल आपण सरळसरळ कसे विचारू शकतो?
२ सरळ विचारा: बहुतेक लोकांना माहीत आहे की आपण टेहळणी बुरूज आणि सावध राहा! ही नियतकालिके देतो, पण आपण बायबल अभ्यासही घेतो हे त्यांना माहीत नसेल. तर मग घरोघरचे कार्य करत असताना शक्य तेथे तुम्ही घरमालकाला बायबल अभ्यास करण्याविषयी सरळसरळ विचारू शकता. आस्थेवाईक लोकांकडे तुम्ही जाता तेव्हा त्यांनाही तुम्ही बायबल अभ्यासाबद्दल सरळ विचारू शकता. जर त्यांना बायबल अभ्यास घ्यायचा नसेल तर तुम्ही त्यांची रुची वाढवण्यासाठी त्यांना नियमित रीत्या नियतकालिके देऊ शकता. एक बांधव एका जोडप्याला बऱ्याच वर्षांपासून नियमित नियतकालिके देत होता. एक दिवस नेहमीप्रमाणे नवीन नियतकालिके त्यांना देऊन तो तेथून निघणार इतक्यात त्याने त्यांना विचारले: “तुम्हाला बायबल अभ्यास घ्यायला आवडेल का?” आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या जोडप्याने होय असे उत्तर दिले. आणि आता त्यांचा बाप्तिस्मा झालेला आहे.
३. रुची दाखवणारे लोक सभेसाठी उपस्थित राहतात तेव्हा त्यांचा कोणीतरी बायबल अभ्यास घेत असावा असा आपण निष्कर्ष काढू शकतो का? समजावून सांगा.
३ सभेत येणारे: रुची दाखवणारे लोक मंडळीच्या सभेसाठी उपस्थित राहतात तेव्हा कोणीतरी त्यांचा बायबल अभ्यास घेत असावा असा निष्कर्ष काढू नका. एक बांधव म्हणतो: “अर्ध्याहून जास्त बायबल अभ्यास मला सभेमध्ये उपस्थित राहणाऱ्या लोकांबरोबर बोलण्यामुळे मिळाले.” एका बहिणीने तिच्या मंडळीतील बाप्तिस्मा घेतलेल्या एका मुलीच्या आईशी बोलायचे ठरवले जी खूप लाजाळू होती. तिची आई १५ वर्षांपासून नियमित सभेत येत होती. पण ती नेहमी सभागृहात सभा सुरू होण्याच्या थोड्या वेळाआधी यायची आणि सभा संपल्यासंपल्या निघून जायची. ती बहीण त्या स्त्रीशी बोलली आणि ती बायबल अभ्यास घेण्यास तयार झाली, आणि शेवटी तिने सत्य स्वीकारले. ती बहीण म्हणते: “तिला बायबल अभ्यास घ्यायला आवडेल का हे विचारण्यात मी उगाचच १५ वर्षे वाया घालवली!”
४. बायबल अभ्यास मिळवण्यासाठी आपण ओळखीच्या लोकांद्वारे पत्ता कसा मिळवू शकतो?
४ ओळखीद्वारे पत्ता मिळवा: एक बहीण इतरांबरोबर त्यांच्या बायबल अभ्यासासाठी जाते. ती तिच्याबरोबर असलेल्या बहिणीची परवानगी घेऊन तिच्या बायबल विद्यार्थ्याला विचारते की त्यांच्या ओळखीचे असे कोण आहेत का ज्यांना बायबल अभ्यास घ्यायला आवडेल. ज्या व्यक्तीची तुम्ही पुनर्भेट घेता तिला बायबल काय शिकवते पुस्तक दिल्यानंतर तुम्ही विचारू शकता: “तुम्ही अशा कोणाला ओळखता का ज्याला हे पुस्तक वाचायला आवडेल?” कधीकधी काही कारणामुळे प्रचारक किंवा पायनियर त्यांच्या क्षेत्रातील लोकांबरोबर बायबल अभ्यास घेऊ शकत नाहीत. अशा वेळी तुम्ही बायबल अभ्यास घेण्यास तयार आहात हे या प्रचारकांना व पायनियरांना सांगा.
५. आपल्या सभेत येणाऱ्या प्रचारकांचे सोबती जे सत्यात नाहीत त्यांना आपण बायबल अभ्यासाबद्दल का विचारावे?
५ सत्यात नसणारे सोबती: तुमच्या मंडळीत असे प्रचारक आहेत का ज्यांचे सोबती सत्यात नाहीत? सत्यात नसलेले सोबती, सत्यात असलेल्या त्यांच्या सोबत्यांबरोबर बायबलबद्दल कदाचित ऐकून घेणार नाहीत पण इतरांबरोबर चर्चा करण्यास तयार होतील. अशा सोबत्यांबरोबर बायबल अभ्यास कसा सुरू करता येईल त्याबद्दल सत्यात असलेल्या त्यांच्या सोबत्यांबरोबर आधीच बोलणे चांगले राहील.
६. बायबल अभ्यास मिळवण्याकरता केलेल्या प्रार्थना इतक्या महत्त्वाच्या का आहेत?
६ प्रार्थना: प्रार्थनेत असलेल्या शक्तीला कमी लेखू नका. (याको. ५:१६) आपण जेव्हा यहोवाच्या इच्छेनुसार काही मागतो तेव्हा तो आपली विनंती ऐकण्याचे वचन देतो. (१ योहा. ५:१४) कामात खूप व्यस्त असणाऱ्या एका बांधवाने बायबल अभ्यासासाठी प्रार्थना केली. तो त्याच्या बायबल विद्यार्थ्याला, आणि खासकरून जर या विद्यार्थ्याला समस्या असतील तर तो त्याला वेळ देऊ शकेल का असा प्रश्न त्याच्या पत्नीला पडला होता. आणि तिने या गोष्टींविषयी यहोवाला प्रार्थना करायला सुरुवात केली. त्यांच्या प्रार्थनेचे उत्तर त्यांना दोन आठवड्यानंतर मिळाले. त्यांच्या मंडळीतील एका पायनियरला एक व्यक्ती भेटली जिला बायबल अभ्यास हवा होता. त्यामुळे पायनियर त्या व्यक्तीची ओळख त्या बांधवाशी करून देतो. त्या बांधवाची पत्नी लिहिते: “जर कोणाला वाटत असेल की त्याला बायबल अभ्यास घेणं शक्य नाही तर मी म्हणेन: प्रार्थनेत तसा स्पष्ट उल्लेख करा आणि याबाबतीत प्रार्थना करण्याचे सोडू नका. मी विचारही केला नव्हता इतका आनंद आम्ही अनुभवत आहोत.” तुम्ही जर बायबल अभ्यास मिळवण्यासाठी अतोनात प्रयत्न केले तर लोकांना “जीवनाकडे” नेणाऱ्या मार्गाकडे जाण्यास मदत केल्याने मिळणारा अवर्णनीय आनंद तुम्ही अनुभवाल.—मत्त. ७:१३, १४.