पूर्ण वेळेच्या सेवेतील आनंद
१ तरुण या नात्याने तुम्ही नक्कीच तुमच्या भवितव्याचा विचार केला असेल. नीतिसूत्रे २१:५ म्हणते: “उद्योग्याचे विचार समृद्धी करणारे असतात.” जीवनातील ध्येयांचा गंभीरपणे विचार केल्याने तुमचे भले होईल. तुम्ही भवितव्याच्या योजना करता तेव्हा, पूर्ण वेळेची सेवा सुरू करण्याचा विचार करा. का?
२ तरुणपणी पायनियरींग सुरू केलेल्या बंधुभगिनींना पूर्ण वेळेच्या सेवेविषयी त्यांचे मत विचारा आणि पाहा ते एकच गोष्ट सांगतील: “तो माझ्या जीवनातला सर्वात उत्तम काळ होता!” तरुणपणीच पूर्ण वेळेची सेवा सुरू केलेल्या एका बांधवाने काही वर्षांनी असे म्हटले: “तरुण असताना मी माझा वेळ कसा घालवला याचा विचार करतो तेव्हा मला खूप समाधान मिळते व मी म्हणू शकतो, की मी, ‘आपल्या तारुण्याच्या दिवसांत आपल्या निर्माणकर्त्याला स्मर,’ या सुज्ञ सल्ल्याचे पालन केले आहे.” (उप. १२:१) मुलांनो, स्वतःच्या व तुमच्या पालकांच्या विचारपूर्वक योजनांनंतरच तुम्हाला, तुमच्या तारुण्याच्या दिवसांत अशा प्रकारचा आनंद अनुभवता येऊ शकेल!
३ पालकांनो, पूर्ण वेळेच्या सेवेसाठी उत्तेजन द्या: यहोवा काळजी घेणारा देव आहे, कोणत्या मार्गाने गेले पाहिजे हे तो तुम्हाला सांगतो. (यश. ३०:२१) अशा प्रकारे प्रेमळ मार्गदर्शन पुरवून तो ख्रिस्ती पालकांसाठी स्वतःचे एक उदाहरण मांडतो. आपल्यासाठी कोणता उत्तम मार्ग आहे हे निवडण्याचे काम पूर्णपणे मुलांवर टाकून देण्याऐवजी, पालकांनो तुम्ही त्यांना सुज्ञपणे प्रशिक्षित करा जेणेकरून ते असा मार्ग निवडतील ज्यामुळे त्यांना यहोवाचे आशीर्वाद प्राप्त होतील. मग मोठे झाल्यावर, तुम्ही दिलेल्या प्रशिक्षणामुळे त्यांना, “चांगले आणि वाईट” यांतला भेद कळेल. (इब्री ५:१४) आपण आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू शकत नाही हे प्रौढांना अनुभवानंतर कळते; त्यांनी मार्गदर्शनासाठी यहोवावर अवलंबून राहिले पाहिजे. (नीति. ३:५, ६) मग, जीवनात कमी अनुभव असलेल्या तरुणांना यहोवावर निर्भर राहण्याची किती अधिक गरज आहे!
४ पालकांनो, तुमची मुले किशोरावस्थेत येतात तेव्हा किंवा त्याही आधी, त्यांना पुढे काय करायचे आहे याविषयी त्यांच्याशी उघड चर्चा करा. शाळा सल्लागार, शिक्षक, वर्गमित्र त्यांना जगीक, भौतिक गोष्टींचा पाठलाग करण्यासाठी प्रोत्साहित करतील. व्यावहारिक प्रशिक्षण देणारे कोर्स निवडण्यास त्यांना साहाय्य करा जेणेकरून देवाच्या राज्याकडे कानाडोळा न करता ते आपल्या भौतिक गरजा पूर्ण करू शकतील. (१ तीम. ६:६-११) पुष्कळ वेळा, उच्च शालेय शिक्षण आणि व्यावहारिक प्रशिक्षण किंवा एखादे कौशल्य, सामान्य पायनियर सेवा सुरू करताना आपल्या दररोजच्या गरजा भागवण्यासाठी पुरेसे ठरू शकते.
५ अविवाहित राहिल्याने मिळणारे आशीर्वाद प्राप्त करण्याचे उत्तेजन आपल्या मुलांना द्या. पुढे त्यांनी लग्न करायचे ठरवले तर, लग्न झाल्यावर येणाऱ्या भारी जबाबदाऱ्या उचलायला ते समर्थ असतील. (आमची राज्य सेवा सप्टेंबर २००३ मधील “तुम्ही स्वतःला उपलब्ध करू शकाल का?” या लेखातील परिच्छेद १९ पाहा.) पायनियरींगविषयी, अधिक गरज आहे त्या ठिकाणी जाऊन सेवा करण्याविषयी, बेथेल सेवेविषयी सकारात्मक गोष्टी बोलून, यहोवाला संतुष्ट करणारे, इतरांना फायदेकारक ठरणारे व स्वतःला आनंद देणारे जीवन जगण्याची इच्छा तुम्ही त्यांच्या मनात अगदी कोवळ्या वयापासूनच निर्माण करू शकता.
६ तरुणांनो, पूर्ण वेळेच्या सेवेला प्राधान्य द्या: तरुणांनो, पायनियर कार्य कसे असेल याविषयी तुम्हाला जास्त विचार करण्याची गरज नाही. शाळा चालू असताना किंवा सुट्या पडतात तेव्हा तुम्हाला जमेल त्याप्रमाणे तुम्ही साहाय्यक पायनियरींग करण्याचा प्रयत्न करू शकता. तेव्हा तुम्हाला समजेल की पायनियर सेवा खरोखरच किती समाधान देणारी सेवा आहे!
७ तुम्ही देवाच्या संघटनेत, तरुण बांधव असाल तर सेवा सेवकाची योग्यता प्राप्त करण्याचा गंभीरपणे विचार करा. (१ तीम. ३:८-१०, १२) त्याचबरोबर, हेही ठरवा, की तुमचे अपेक्षित वय झाल्यावर तुम्ही बेथेल सेवेसाठी अर्ज भरणार की अविवाहित बांधवांसाठी असलेली बायबल प्रशाला हिला उपस्थित राहणार. पायनियर सेवेच्या अनुभवामुळे तुम्हाला, वक्तशीरपणा, व्यक्तिगत गोष्टींच्या बाबतीत सुव्यवस्थितपणा, इतरांशी जमवून घेणे, जबाबदाऱ्या सांभाळणे यांसारखे महत्त्वपूर्ण धडे शिकायला मिळतील. या सर्व गोष्टींमुळे तुम्ही नंतर सेवेतील मोठे विशेषाधिकार सांभाळण्यासाठी तयार होऊ शकाल.
८ पूर्ण वेळेच्या सेवेत यशस्वी होण्यातील एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे, ईश्वरशासित गोष्टींमध्ये व्यस्त असणे. अशा प्रकारची मनोवृत्ती बाळगण्यास प्रेषित पौलाने उत्तेजन दिले व यामुळे मिळणाऱ्या आशीर्वादांबद्दलही सांगितले: “जे काही तुम्ही करता ते . . . प्रभूसाठी म्हणून जिवेभावे करा. प्रभूपासून . . . प्रतिफळ तुम्हाला मिळेल हे तुम्हाला माहीत आहे.” (कलस्सै. ३:२३, २४) पूर्ण वेळेच्या सेवेत तुमच्यावर यहोवाच्या आशीर्वादांचा वर्षाव होवो!