सुवार्तेचा प्रसार करण्यासाठी पत्रिकांचा उपयोग करा
१. देवाच्या लोकांनी पत्रिकांचा उपयोग कशा प्रकारे केला?
१ यहोवाचे लोक सुवार्तेचा प्रसार करण्यासाठी बऱ्याच वर्षांपासून पत्रिकांचा उपयोग करत आहेत. चार्ल्स टेझ रस्सल आणि त्यांच्या सोबत्यांनी १८८० पासून बायबल स्टुडन्ट्स ट्रॅक्ट्स प्रकाशित करण्यास सुरुवात केली आणि टेहळणी बुरुजच्या वाचकांना ते हे ट्रॅक्टस् द्यायचे. पत्रिकांना अतिशय महत्त्व होते म्हणूनच १८८४ मध्ये जेव्हा सी. टी. रस्सल यांनी राज्याच्या संबंधाने प्रकाशने मोठ्या प्रमाणात छापण्याकरता एक स्वयंसेवी कायदेशीर संस्था स्थापन केली तेव्हा त्यांनी, झायन्स वॉचटॉवर ट्रॅक्ट सोसायटी या संस्थेच्या नावात “ट्रॅक्ट” या शब्दाचा समावेश केला. या संस्थेला आज वॉचटॉवर बायबल ॲन्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ पेन्सिलव्हेनिया असे संबोधले जाते. १९१८ पर्यंत बायबल विद्यार्थ्यांनी ३० कोटी पत्रिकांचे वाटप केले होते. आजही सुवार्तेचा प्रसार करण्यासाठी पत्रिका प्रभावकारी साधन ठरल्या आहेत.
२. पत्रिका प्रभावकारी का आहेत?
२ प्रभावकारी का? पत्रिका रंगीत आणि आकर्षक असतात. त्यातील संदेश लक्ष वेधून घेणारा आणि बोधक असतो. जे घरमालक नियतकालिके किंवा पुस्तके वाचण्याचा कंटाळा करतात त्यांना पत्रिका वाचायला आवडतील. नवख्या प्रचारकांना व लहान मुलांनाही पत्रिका सादर करणे सोपे जाते. त्याचबरोबर त्या आकाराने लहान असल्यामुळे आपण सहजपणे त्या हाताळू शकतो.
३. पत्रिका किती अनमोल आहेत हे दाखवणारा एखादा व्यक्तिगत किंवा छापील अनुभव सांगा.
३ बऱ्याच जणांना सत्य पत्रिकांमुळे मिळाले आहे. उदाहरणार्थ, एका स्त्रीला आपली एक पत्रिका रस्त्यावर मिळाली. तिने ती उचलली, वाचली आणि ती म्हणाली “मला सत्य सापडलं आहे!” कालांतराने ती राज्य सभागृहात जाऊ लागली, तिने बायबल अभ्यास सुरू केला आणि बाप्तिस्माही घेतला. हे सर्व त्या पत्रिकेत असणाऱ्या देवाच्या वचनाच्या शक्तीमुळे शक्य झाले.
४. महिन्याची सादरता पत्रिका असते तेव्हा आपला काय उद्देश असला पाहिजे?
४ घरोघरचे साक्षकार्य: सुवार्ता सांगण्यासाठी पत्रिका प्रभावकारी साधन असल्यामुळे, नोव्हेंबर महिन्यापासून पुढे अधूनमधून सादरतेसाठी त्यांचा उपयोग केला जाईल. केवळ पत्रिका देणे हाच आपला उद्देश नाही, तर पत्रिकांचा उपयोग करून संभाषण सुरू करणे हा आपला उद्देश आहे. घरमालकाने जर पहिल्या भेटीतच किंवा पुनर्भेटी वेळी रुची दाखवली तर बायबल काय शिकवते पुस्तकातून किंवा इतर अभ्यास साहित्यांतून बायबल अभ्यास कसा घेतला जातो ते तुम्ही घरमालकाला दाखवू शकता. आपण घरोघरी पत्रिका कशी सादर करू शकतो? प्रत्येक पत्रिकेतील मजकूर वेगळा असल्यामुळे, सादर केल्या जाणाऱ्या पत्रिकेशी आपण चांगले परिचित असले पाहिजे.
५. घरोघरच्या साक्षकार्यात आपण पत्रिका कशा प्रकारे देऊ शकतो?
५ आपले सादरीकरण पत्रिकेशी आणि आपल्या क्षेत्राशी मिळतेजुळते असणे महत्त्वाचे आहे. घरमालकाच्या हातात पत्रिका देऊन आपण संभाषण सुरू करू शकतो. पत्रिकेच्या आकर्षक मुखपृष्ठामुळे घरमालकाची रुची वाढू शकते. किंवा आपण त्याला अनेक पत्रिका दाखवू शकतो आणि त्याला कोणती पत्रिका आवडली ते विचारू शकतो. क्षेत्र सेवेत लोक दार उघडण्यास कचरतात तेव्हा आपण पत्रिका त्यांना दिसेल अशा प्रकारे पकडू शकतो, किंवा दाराखालून ती आत सरकवू शकतो आणि नंतर मग त्यांचे मत विचारू शकतो. पत्रिकेचे शीर्षक जर प्रश्नार्थक असेल तर त्या प्रश्नाचे उत्तर काय आहे ते आपण घरमालकाला विचारू शकतो. किंवा आपण स्वतःहून असा एखादा प्रश्न विचारू शकतो ज्यामुळे घरमालकाची रुची वाढेल व संभाषण पुढे चालू राहील. आपण घरमालकाबरोबर पत्रिकेतील थोडासा भाग वाचू शकतो आणि वाचताना एखादा प्रश्न येतो तेव्हा थांबून घरमालकाचे मत विचारू शकतो. मुख्य वचने बायबलमधून वाचण्यास काही हरकत नाही. थोड्या माहितीवर चर्चा केल्यानंतर आपण चर्चा संपवू शकतो आणि पुनर्भेटीची व्यवस्था करू शकतो. कुलूप असणाऱ्या घरांच्या दाराखालून तुम्ही एखादे नियतकालिक सरकवत असाल तर आताही तुम्ही कुणाला दिसणार नाही अशा ठिकाणी पत्रिका ठेवू शकता.
६. रस्त्यावरच्या साक्षकार्यात आपण पत्रिकांचा उपयोग कसा करू शकतो?
६ रस्त्यावरचे साक्षकार्य: रस्त्यावरचे साक्षकार्य करताना तुम्ही पत्रिकांचा उपयोग केला आहे का? रस्त्यावर काही लोक घाईत असतात आणि ते आपल्याशी बोलायला थांबत नाहीत. अशा वेळी त्यांना खरेच सुवार्तेत रुची आहे की नाही हे ओळखणे फार कठीण आहे. त्यामुळे आपण त्यांना नवीन नियतकालिक देण्याऐवजी पत्रिका देऊ शकतो कारण आपल्याला माहीत नसते की ते नियतकालिके वाचतील की नाही. पत्रिकांचे मुखपृष्ठ रुची वाढवणारे असल्यामुळे आणि त्यातील संदेश संक्षिप्त असल्यामुळे, त्यांच्याकडे थोडा जरी वेळ असला तरी उत्सुकतेपोटी ते ती पत्रिका घेतील. पण ते जर घाईत नसतील तर आपण त्यांच्याबरोबर पत्रिकेत दिलेल्या काही भागावर चर्चा करू शकतो. पण, असे करताना सभोवार नजर ठेवा आणि आपल्या कार्यात अडथळा आणू शकतील अशा लोकांना टाळा.
७. अनौपचारिक साक्षकार्य करताना पत्रिकांचा कसा उपयोग केला जाऊ शकतो याचा एक अनुभव सांगा.
७ अनौपचारिक साक्षकार्य: पत्रिकांचा उपयोग करून अनौपचारिक साक्षकार्य करणे सोपे आहे. एक बांधव जेव्हाजेव्हा घराबाहेर पडतो तेव्हातेव्हा तो त्याच्या खिशात काही पत्रिका ठेवतो. आणि भेटेल त्या व्यक्तीला जसे की दुकानदाराला, तो पत्रिका वाचायला देतो. एक जोडपे जेव्हा एका शहरात फिरायला गेले होते तेव्हा त्यांना वाटले की बऱ्याच ठिकाणाहून येणारे लोक त्यांना भेटतील. त्यामुळे जाताना त्यांनी सर्व राष्ट्रांसाठी सुवार्ता ही पुस्तिका आणि वेगवेगळ्या भाषांतील बऱ्याच पत्रिका सोबत घेतल्या. आणि रस्त्यावर विक्री करणारी, बागेत किंवा रेस्टॉरंटमध्ये त्यांच्या शेजारच्या टेबलावर बसलेली व्यक्ती एक वेगळी भाषा बोलत आहे असे जाणवल्यावर ते त्या व्यक्तीला तिच्या भाषेतील पत्रिका द्यायचे.
८. पत्रिकांची तुलना बियांशी का केली जाऊ शकते?
८ सत्याचे बी पेरा: पत्रिकांची तुलना बियांशी केली जाऊ शकते. एक शेतकरी सढळ हाताने बिया पेरतो कारण त्याला माहीत नसते की कोणते बी रुजेल व त्याला अंकुर फुटेल. उपदेशक ११:६ म्हणते: “सकाळी आपले बी पेर, संध्याकाळीही आपला हात आवरू नको; कारण त्यातून कोणते फळास येईल, हे किंवा ते, अथवा दोन्ही मिळून चांगली होतील, हे तुला ठाऊक नसते.” त्यामुळे, आपण प्रभावकारी साधन असलेल्या पत्रिकांचा उपयोग करण्याद्वारे “विद्येचा प्रसार” करत राहू या.—नीति. १५:७.
[३ पानांवरील संक्षिप्त आशय]
सुवार्ता सांगण्यासाठी पत्रिका प्रभावकारी साधन असल्यामुळे, नोव्हेंबर महिन्यापासून पुढे अधूनमधून महिन्याची सादरता म्हणून त्यांचा उपयोग केला जाईल.