बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकाच्या अभ्यासाचा आनंद घ्या
१ “देवाच्या आज्ञेत राहा” या प्रांतीय अधिवेशनाचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकाचे प्रकाशन. सध्या आपण क्षेत्र सेवेत आणि खासकरून गृह बायबल अभ्यास चालवण्याकरता मोठ्या प्रमाणात हे पुस्तक वापरतो. तेव्हा आपण स्वतः या प्रकाशनाशी चांगल्या प्रकारे परिचित असले पाहिजे. १५ ऑक्टोबर २०१२ पासून आपण आपल्या मंडळीच्या बायबल अभ्यासात या पुस्तकाचा अभ्यास सुरू करू, त्यामुळे या पुस्तकाशी आणखी परिचित होणे आपल्याला शक्य होईल.
२ मंडळीचा बायबल अभ्यास संचालक पुस्तकातील प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला असलेल्या प्रश्नांकडे सर्वांचे लक्ष वेधेल. त्यानंतर पानाच्या खालच्या बाजूला असलेल्या प्रश्नांचा उपयोग करून तो अभ्यास घेईल. मुख्य शास्त्रवचने वाचून त्यांवर चर्चा केली जाईल आणि प्रत्येक अध्यायाच्या शेवटी असलेली “बायबल असे शिकवते” ही चौकट, वाचलेल्या माहितीची उजळणी करण्यास उपयुक्त ठरेल; कारण, चौकटीत अध्यायाच्या सुरुवातीला विचारण्यात आलेल्या प्रश्नांची शास्त्रवचनीय उत्तरे देण्यात आली आहेत. या पुस्तकातील विषय स्पष्ट, साध्या आणि रोचक पद्धतीत मांडलेले आहेत, तेव्हा तुम्हाला उत्तरे द्यायला सोपे जाईल.
३ या पुस्तकातील परिशिष्टातदेखील विविध विषयांवर सविस्तर माहिती देण्यात आली आहे. बायबल विद्यार्थ्यांना एखाद्या विषयावर अधिक माहिती हवी असते तेव्हा आपण या माहितीचा उपयोग करू शकतो. परिशिष्टातील काही भागांवर मंडळीच्या बायबल अभ्यासादरम्यान चर्चा केली जाईल. बायबल अभ्यासात वाचन करणारा बांधव परिशिष्टातील माहिती वाचेल. लेख मोठे असतील तर त्यांची छोट्याछोट्या भागांत विभागणी केली जाऊ शकते. परिशिष्टात प्रश्न दिलेले नाहीत. पण बायबल अभ्यास संचालक उपस्थितांना मुख्य मुद्द्यांवर प्रश्न विचारू शकतो.
४ मंडळीच्या बायबल अभ्यासात दर आठवडी बायबल काय शिकवते या पुस्तकातून बरीच माहिती विचारात घेतली जाईल. पण आपण इतरांबरोबर, खासकरून ज्यांना बायबलविषयी फार कमी किंवा काहीच ज्ञान नाही, अशांबरोबर जर या प्रकाशनाचा अभ्यास करत असू तर त्यांच्याबरोबरही तितकीच माहिती विचारात घेतली जावी असे नाही. (प्रे. कृत्ये २६:२८, २९) गृह बायबल अभ्यासात आपल्याला शास्त्रवचनांवर सविस्तर चर्चा करावी लागते, चित्रे समजावून सांगावी लागतात. तेव्हा, बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकाची जेव्हा आपण मंडळीच्या बायबल अभ्यासात चर्चा करू तेव्हा दर आठवडी उपस्थित राहा आणि अभ्यासात भाग घेण्याचे ध्येय ठेवा.