वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km २/१४ पृ. ४-७
  • प्रचार करण्याआधी, त्यांना शोधावे लागेल

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रचार करण्याआधी, त्यांना शोधावे लागेल
  • आमची राज्य सेवा—२०१४
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवाने ‘त्यांच्यावर आपला मुखप्रकाश पाडला आहे’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • तुमच्या क्षेत्रातील कर्णबधिर लोकांकडे दुर्लक्ष करू नका
    आमची राज्य सेवा—२००१
  • कर्णबधिर बंधुभगिनींवर मनापासून प्रेम करा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • वेगळी भाषा बोलणाऱ्‍यांना मदत करणे
    आमची राज्य सेवा—२००९
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२०१४
km २/१४ पृ. ४-७

प्रचार करण्याआधी, त्यांना शोधावे लागेल

१. ज्या भागांत अनेक भाषा बोलल्या जातात अशा क्षेत्रांत, तेथे बोलल्या जाणाऱ्‍या विशिष्ट भाषेनुसार क्षेत्र का नेमले जाते?

१ इ.स. ३३ च्या पेंटेकॉस्टच्या दिवशी येशूच्या शिष्यांना पवित्र आत्मा मिळाल्यानंतर, ते दूरदूरच्या ठिकाणांहून आलेल्या लोकांबरोबर “निरनिराळ्या भाषांतून बोलू लागले.” (प्रे. कृत्ये २:४) यामुळे सुमारे ३,००० लोकांचा बाप्तिस्मा झाला. लक्ष देण्याजोगी गोष्ट म्हणजे, तेथे जमलेले बहुतेक लोक त्यांच्या मातृभाषेव्यतिरिक्‍त हिब्रू किंवा ग्रीक भाषा बोलू शकत होते. तरीसुद्धा, त्यांना त्यांच्या मातृभाषेत राज्याचा संदेश कळावा, अशी यहोवाची इच्छा होती. कारण, लोक त्यांच्या मातृभाषेत जेव्हा राज्याबद्दल आनंदाची बातमी ऐकतात तेव्हा ते लवकर प्रतिसाद देतात. म्हणूनच, ज्या भागांत अनेक भाषा बोलल्या जातात त्या भागांत क्षेत्राची नेमणूक भाषेनुसार केली जाते. (आपली राज्य सेवा, फेब्रुवारी २००७ पुरवणीतील पृष्ठ १०, परि. १-२ किंवा यहोवा की इच्छा पूरी करने के लिए संगठित, पृष्ठ १०७, परि. २-३) भाषेच्या गटांना क्षेत्राची नेमणूक मिळत नाही, तर ते त्या गटाची देखरेख करणाऱ्‍या मंडळीच्या (प्रायोजक मंडळीच्या) क्षेत्रात किंवा जवळपास असलेल्या इतर मंडळ्यांच्या क्षेत्रात त्यांची भाषा बोलणाऱ्‍या लोकांना प्रचार करतात.

२. (क) शोधकार्य म्हणजे काय, आणि हे शोधकार्य कोणत्या भागात करण्याची जास्त गरज आहे? (ख) ज्या शहरात अनेक भाषा बोलल्या जातात तेथील मंडळ्या एकमेकांना कसे साहाय्य करू शकतात? (ग) इतर भाषा बोलणारी व्यक्‍ती राज्य संदेशात आवड दाखवते तेव्हा आपण काय केले पाहिजे?

२ तुम्ही राहत असलेल्या ठिकाणी सर्व जण एकच भाषा बोलत असतील तर तुम्ही घरोघरी जाऊन प्रचार करू शकता. पण, अनेक भाषा बोलणारे लोक असलेल्या मोठ्या शहरात तुम्ही राहत असाल, तर तुमची परिस्थिती जरा वेगळी असेल. तुमच्या मंडळीच्या आसपासच्या क्षेत्रात इतर भाषेच्या मंडळीतील बंधुभगिनीदेखील प्रचार करत असतील. जर तुमच्या मंडळीच्या क्षेत्रात वेगवेगळ्या भाषा बोलणारे अनेक लोक राहत असतील, तर त्या-त्या भाषेच्या मंडळ्यांना त्या क्षेत्रात आळीपाळीने सेवाकार्य करता येईल अशी व्यवस्था त्या मंडळ्यांच्या सेवा पर्यवेक्षकांनी करावी. पण, तुमच्या मंडळीच्या किंवा गटाच्या क्षेत्रात इतर भाषा बोलणारे फारसे लोक नसतील, तर त्या लोकांना शोधण्यासाठी व्यवस्था करण्याची गरज आहे. इतर मंडळ्या तुम्हाला जरी तुम्ही बोलत असलेल्या भाषेच्या लोकांची माहिती देत असले, तरीसुद्धा तुमच्या भाषेच्या लोकांना शोधण्याची मुख्य जबाबदारी तुमच्या मंडळीची किंवा गटाची आहे. (“एकमेकांना साहाय्य करा” ही चौकट पाहा.) त्यामुळे, तुमची भाषा बोलणारे लोक कोठे राहतात याबद्दलची चौकशी करून तुम्हालाच या शोधकार्यात उतरावे लागेल. तुम्ही हे शोधकार्य कसे करू शकता?

३. एखाद्या मंडळीने किंवा गटाने शोधकार्य कोठे करावे हे कशाच्या आधारावर ठरवता येईल आणि या शोधकार्यासाठी ते किती वेळ खर्च करू शकतात?

३ शोधकार्याची व्यवस्था: अनेक भाषा बोलल्या जाणाऱ्‍या क्षेत्रात शोधकार्य करण्यासाठी किती वेळ खर्च करायचा हे स्थानिक परिस्थितीनुसार ठरवावे लागेल. उदाहरणार्थ, तुमच्या भागातील किती लोक ती भाषा बोलतात? मंडळीत किती प्रचारक आहेत? मंडळीकडे किंवा गटाकडे किती लोकांचे आधीपासूनच पत्ते आहेत? मंडळीच्या क्षेत्रातील प्रत्येक भागात एकसमान शोधकार्य करण्याची गरज नाही. तर त्याऐवजी मंडळी आपल्या क्षेत्रातील जास्त लोकवस्ती असलेल्या आणि मंडळीच्या क्षेत्रापासून जास्त दूर नसलेल्या भागात शोधकार्य करण्याचे ठरवू शकते. पण, या शोधकार्याची पद्धतशीर व्यवस्था करणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना यहोवाच्या नावाचा धावा करण्याची संधी मिळू शकेल.—रोम. १०:१३, १४.

४. (क) शोधकार्याची व्यवस्था कशी करण्यात यावी? (ख) तुमची भाषा बोलणाऱ्‍या लोकांना शोधण्याचे काही मार्ग कोणते आहेत?

४ शोधकार्य करण्याची गरज असलेल्या एकाच क्षेत्रात वेगवेगळ्या प्रचारकांनी जाण्याचे टाळण्याकरता मंडळीच्या वडिलांनी, खासकरून सेवा पर्यवेक्षकांनी या शोधकार्याची व्यवस्था व देखरेख करावी. (१ करिंथ. ९:२६) प्रायोजक मंडळीच्या वडील वर्गाने निवडलेला एखादा वडील किंवा सेवा सेवक भाषेच्या गटात पुढाकार घेऊ शकतो. अनेक मंडळ्यांमध्ये व गटांमध्ये, प्राथमिक शोध करण्याची एक पद्धतशीर व्यवस्था आहे. जसे की, एखाद्या भाषेत सर्रास आढळणारी नावे शोधण्यासाठी ते टेलिफोन डायरेक्टरीचा किंवा मग इंटरनेटचा उपयोग करतात. त्यानंतर, क्षेत्रात कोणत्या पत्त्यांचा समावेश करायचा हे ठरवण्याकरता, मिळालेल्या नावाच्या व्यक्‍तींना फोन करून किंवा त्यांची भेट घेऊन हे शोधकार्य केले जाते. व्यावहारिक वाटत असेल, तर प्रायोजक मंडळीचा वडील वर्ग अशी व्यवस्था करू शकतो, जेणेकरून अधूनमधून संपूर्ण मंडळी या शोधकार्यात भाग घेऊ शकेल.—“तुमची भाषा बोलणाऱ्‍या लोकांना कसे शोधावे?” ही चौकट पाहा.

५. (क) शोधकार्य करणाऱ्‍या प्रचारकांसाठी कोणत्या काही सूचना आहेत? (ख) शोधकार्य करत असताना आपण लोकांना काय म्हणू शकतो?

५ शोधकार्यात आपण व्यक्‍तिशः भाग घेतो तेव्हा आपल्या मनात एक विशिष्ट उद्देश असला पाहिजे. हे कार्य आपल्या सेवेचाच भाग असल्यामुळे आपण प्रचार कार्याला जाताना सहसा जसे कपडे घालतो तसेच घालावेत. बहुतेक बंधुभगिनींना वाटते, की सादरीकरणांचा सराव केल्याने व शोधकार्य करताना त्या भाषेत बोलल्याने त्यांचा उत्साह टिकून राहू शकतो व त्यांची भाषा कौशल्ये वाढू शकतात. शोधकार्य करताना खर्च केलेल्या वेळेचा आपण क्षेत्र सेवा अहवालामध्ये समावेश करू शकतो; पण टेरिटरी मॅप व लोकांची यादी तयार करताना खर्च केलेल्या वेळेचा समावेश करू नये. आपली भाषा बोलणारी व्यक्‍ती आपल्याला भेटते तेव्हा आपण तिला सुवार्ता सांगितली पाहिजे आणि त्यानंतर सेवा पर्यवेक्षकांना किंवा त्यांनी नेमलेल्या बांधवाला लगेच कळवले पाहिजे, जेणेकरून टेरिटरी रेकॉर्डवर तशी नोंद करता येईल. त्या व्यक्‍तीने आवड दाखवली असो वा नसो, आपण वर सांगितल्याप्रमाणे केले पाहिजे. शोधकार्य महत्त्वाचे असले, तरीसुद्धा आपण संतुलन राखले पाहिजे आणि सेवेच्या इतर पैलूंतही भाग घेतला पाहिजे.—“शोधकार्य करताना काय म्हणाल?” ही चौकट पाहा.

६. कर्णबधिर लोकांना शोधताना कोणत्या अडचणी येऊ शकतात?

६ कर्णबधिर लोकांना शोधणे: कर्णबधिर लोकांना शोधणे वाटते तितके सोपे नाही. या शोधकार्यात वेगळ्याच अडचणी येऊ शकतात. त्यामुळे या कामासाठी बरीच मेहनत घेणे व चिकाटी दाखवणे महत्त्वाचे आहे. एखादी व्यक्‍ती कर्णबधिर आहे की नाही हे तिच्या नावावरून, रंगरूपावरून किंवा पेहरावावरून ओळखणे शक्य नाही. शिवाय, तिच्या कुटुंबातील सदस्य व मित्र तिला सुरक्षित ठेवायचा प्रयत्न करतील व तिच्याबद्दलची चौकशी करणाऱ्‍या प्रचारकाला माहिती देण्यास कचरतील. कर्णबधिर लोकांना, तसेच एखादी विशिष्ट भाषा बोलणाऱ्‍या लोकांना शोधण्यासाठी पुढे सुचवलेल्या गोष्टींचा अवलंब केला जाऊ शकतो.

७. (क) निवासी क्षेत्रात कर्णबधिर लोकांना शोधण्यासाठी तुम्ही कशा प्रकारे विचारपूस करू शकता? (ख) घरमालकाच्या मनातील शंका आपण कशा प्रकारे दूर करू शकतो?

७ संकेत भाषेच्या मंडळ्यांना व गटांना, निवासी क्षेत्रात चौकशी केल्याने बरेच यश मिळाले आहे. तुम्ही ज्याच्याकडे विचारपूस कराल कदाचित त्याने आपल्या एखाद्या शेजाऱ्‍याला, सोबत काम करणाऱ्‍याला किंवा शाळेत जाणाऱ्‍या विद्यार्थ्याला संकेत भाषा वापरताना पाहिले असेल. किंवा कदाचित त्याचाच एखादा नातेवाईक कर्णबधिर असेल. एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही लोकांची भेट घ्यायला जाता तेव्हा लोक कदाचित तुमच्याकडे संशयाने पाहतील. तरीपण, तुम्ही जेव्हा त्यांच्याबरोबर अगदी प्रामाणिकपणे, मैत्रिभावाने थोडक्यात व आदराने बोलता तेव्हा घरमालकाच्या मनातील पुष्कळ शंका दूर होऊ शकतात. कोणी कर्णबधिर त्यांच्या पाहण्यात आहे का, याची घरमालकांना विचारपूस करताना काही प्रचारकांनी त्यांना बायबल किंवा संकेत भाषेच्या डीव्हीडी दाखवल्या तेव्हा चांगले परिणाम दिसून आले. यानंतर ते घरमालकाला सांगतात, की अशा कर्णबधिर लोकांना ते बायबलमधून आशादायक संदेश सांगू इच्छितात. घरमालक कोणतीही माहिती देण्यास राजी नसेल, तर तुम्ही त्याला तुमचा पत्ता किंवा मंडळीच्या एखाद्या सभेचे आमंत्रण देऊ शकता आणि ते त्याच्या कर्णबधिर नातेवाइकाला किंवा मित्राला देण्यास सांगू शकता.

८. संकेत भाषेच्या मंडळीला जवळपासची एखादी मंडळी कशा प्रकारे मदत करू शकते?

८ वर्षातून एक-दोन दिवसांसाठी, संकेत भाषा मंडळी त्यांच्या मोठ्या क्षेत्राच्या हद्दीत असलेल्या कर्णबधिर लोकांना शोधण्याकरता एका वेगळ्या भाषेच्या मंडळीला मदतीसाठी बोलावू शकते. संकेत भाषेची मंडळी आपल्या क्षेत्र सेवेच्या सभेत या कार्याबद्दलच्या सूचना देऊ शकते आणि एखादे प्रदर्शन दाखवू शकते. त्या दिवशी क्षेत्र सेवेसाठी जाणाऱ्‍या प्रत्येक गटात, संकेत भाषेच्या मंडळीतील निदान एक प्रचारक तरी असावा व कोणत्या क्षेत्रात शोधकार्य करायचे आहे याचा नकाशा त्याला द्यावा.

९. कर्णबधिर लोक मनोरंजनासाठी आणि संगतीसाठी जेथे जमतात किंवा जेथे अशा लोकांना मदत पुरवली जाते तेथे हे शोधकार्य कसे केले जाऊ शकते?

९ कर्णबधिर लोक सहसा मनोरंजनासाठी आणि संगतीसाठी जेथे जमतात किंवा जेथे अशा लोकांना मदत पुरवली जाते तेथेही हे शोधकार्य केले जाऊ शकते. अशा वेळी, प्रचारकांनी परिस्थितीनुसार पेहराव करावा. सर्वांसमोर उभे राहून भाषण देण्याऐवजी, व्यवहारचातुर्याचा उपयोग करून तेथे असलेल्या एक किंवा दोन जणांशी बोलणे अधिक उचित ठरेल. एखाद्याने आवड दाखवल्यास, तुम्ही एकमेकांशी पुन्हा संपर्क कसा साधू शकता हे ठरवता येईल.

१०. प्रचारक स्थानिक व्यापारी क्षेत्रात शोधकार्य कसे करू शकतात?

१० आणखी एक पर्याय म्हणजे, स्थानिक व्यापारी क्षेत्राचा नकाशा बनवणे व उचित समयी जाऊन भेट देणे. एका नकाशात कदाचित अनेक पेट्रोल पंप असू शकतात. दुसऱ्‍या नकाशात, हॉटेल, रेस्टॉरंट, किराणा मालाची दुकाने असू शकतात; शिवाय, त्यात कपड्यांच्या, लॉन्ड्री वाल्यांच्या किंवा इतर दुकानांचाही समावेश असू शकतो. नकाशात एकाच प्रकारची दुकाने असल्यास, प्रचारक दुकानदारांशी बोलताना एकाच पद्धतीचा वापर करू शकतात आणि अशा प्रकारे अनुभव व कौशल्य मिळवू शकतात. जसे की, हॉटेल्समध्ये कर्णबधिर गिऱ्‍हाईकदेखील येतात. आपण हॉटेलच्या मॅनेजरला आपल्या कामाबद्दलची थोडक्यात माहिती सांगू शकतो. आपण आधीपासूनच एक पाकीट तयार करून त्यात एक डीव्हीडी व मंडळीच्या एखाद्या सभेची आमंत्रणपत्रिका ठेवू शकतो. हे पाकीट आपण हॉटेलच्या मॅनेजरला देऊन ते त्याच्या कर्णबधिर गिऱ्‍हाइकांना देण्यास सांगू शकतो. काही दुकानांत आपण सरळ दुकानदाराला विचारू शकतो, की तेथे कोणी कर्णबधिर व्यक्‍ती काम करते का, किंवा दुकानात संकेत भाषा वापरणारे गिऱ्‍हाईक येतात का? क्षेत्रात कर्णबधिरांसाठी शाळा असेल, तर आपण शाळेच्या वाचनालयासाठी आपल्या काही डीव्हीडी देऊ शकतो.

११. शोधकार्य आपल्या सेवेचा एक महत्त्वाचा पैलू का आहे?

११ अतिशय महत्त्वाचे काम: तुमची भाषा बोलणाऱ्‍या लोकांना शोधण्यासाठी तुम्हाला परिश्रम घ्यावे लागतील. शिवाय, काही क्षेत्रांत लोकांच्या कायम बदल्या होत असतात; त्यामुळे, टेरिटरी रेकॉर्ड ठेवणेही कठीण जाऊ शकते. तरीसुद्धा, बहुतेक क्षेत्रांत, शोधकार्य हे आपल्या सेवेचा एक महत्त्वाचा पैलू आहे. यहोवाने आपल्याला प्रचार करण्याची नेमणूक दिली आहे; तो पक्षपाती देव नाही. (प्रे. कृत्ये १०:३४) “त्याची अशी इच्छा आहे की, सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहचावे.” (१ तीम. २:३, ४) म्हणून, प्रामाणिक व चांगले अंतःकरण असलेल्या सर्व भाषेच्या लोकांना शोधण्यात आपण यहोवाला आणि एकमेकांना सहकार्य करू या.—लूक ८:१५.

[५ पानांवरील चित्र]

एकमेकांना साहाय्य करा

तुमच्या मंडळीला किंवा गटाला तुमची भाषा बोलणाऱ्‍या लोकांना शोधण्यासाठी मदत हवी असल्यास, सेवा पर्यवेक्षक जवळपास असलेल्या इतर भाषेच्या मंडळ्यांशी संपर्क साधू शकतो. तुमच्या मंडळीपासून जास्त दूर नसलेल्या मंडळ्यांशी किंवा ज्या मंडळ्यांच्या क्षेत्रात ती विशिष्ट भाषा बोलणाऱ्‍यांची संख्या जास्त आहे केवळ अशाच मंडळ्यांशी संपर्क साधणे चांगले ठरेल. ज्या मंडळ्यांशी संपर्क केला जातो त्या मंडळ्यांनी आपल्या प्रचारकांना सांगितले पाहिजे, की त्यांना ती विशिष्ट भाषा बोलणारी एखादी व्यक्‍ती भेटल्यास त्यांनी तिचा पत्ता लिहून घ्यावा आणि आपल्या सेवा पर्यवेक्षकाला द्यावा. मग, सेवा पर्यवेक्षक ही माहिती मदत मागणाऱ्‍या मंडळीला किंवा गटाला पाठवेल. या कार्यात समाविष्ट असलेल्या मंडळ्यांचे सर्व सेवा पर्यवेक्षक एकत्र मिळून एक व्यावहारिक व्यवस्था करू शकतात. या व्यवस्थेमुळे अनेक भाषा बोलणाऱ्‍या क्षेत्रातील लोकांना सुवार्ता सांगता येईल आणि आवड दाखवणाऱ्‍या लोकांना योग्य त्या मंडळीकडे किंवा गटाकडे पाठवता येईल.

प्रचारकांना जर इतर भाषेचा कोणी आढळला ज्याने खरोखर आवड दाखवली आहे (किंवा जो कर्णबधिर आहे) तर लगेच त्यांनी प्लीज फॉलो अप (S-43) फॉर्म भरून तो मंडळीच्या सचिवाला द्यावा. यामुळे, त्या व्यक्‍तीला लगेचच आध्यात्मिक मदत मिळू शकेल.—आपली राज्य सेवा, मे २०११, पृष्ठ ३ पाहा.

[६ पानांवरील चित्र]

तुमची भाषा बोलणाऱ्‍या लोकांना कसे शोधावे?

• इतरांना विचारा, जसे की बायबल विद्यार्थ्यांना, कुटुंबातील सदस्यांना, तुमच्यासोबत काम करणाऱ्‍यांना वगैरे.

• तुमच्या भाषेत सर्वसामान्य असलेली नावे शोधण्यासाठी टेलिफोन डायरेक्टरीचा उपयोग करा. पत्त्यांनुसार नावे असलेली रिव्हर्स डायरेक्टरी इंटरनेटवर किंवा टेलिफोन कंपनीकडे उपलब्ध असू शकते.

• स्थानिक वाचनालये, सरकारी कार्यालये, कॉलेज यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी सावधगिरीने विचारपूस करा.

• एखाद्या भाषेच्या समाजाने आयोजित केलेल्या सार्वजनिक कार्यक्रमांबद्दलची स्थानिक वर्तमानपत्रात बातमी वगैरे आहे का ते पाहा.

• एखाद्या भाषेचे लोक सर्रासपणे ज्या दुकानांत जातात त्या दुकानांना भेट द्या.

• एखाद्या विशिष्ट भाषेचे लोक सहसा ज्या व्यापारी क्षेत्राजवळ, विद्यापीठातील विद्यार्थी केंद्राजवळ किंवा वाहतुकीच्या केंद्राजवळ एकत्र येतात अशा ठिकाणी एका टेबलावर तुम्ही आपल्या प्रकाशनांचे प्रदर्शन करू शकता; अर्थात, यासाठी तुम्हाला आधी तेथील अधिकाऱ्‍यांची परवानगी घ्यावी लागेल.

[७ पानांवरील चित्र]

शोधकार्य करताना काय म्हणाल?

लोकांबरोबर मैत्रिपूर्ण रीतीने, प्रामाणिकपणे व खुल्या मनाने बोला. अशाने त्यांच्या मनातील शंका दूर होतील. आधीच त्यांच्या भाषेतील एखादे प्रकाशन त्यांना दाखवल्यास चांगले परिणाम मिळू शकतात.

नमस्ते म्हटल्यानंतर तुम्ही म्हणू शकता: “आम्ही अशा लोकांना शोधतोय जे ______ बोलतात. तुम्ही अशा कोणाला ओळखता का?”

कर्णबधिर लोकांना शोधताना तुम्ही म्हणू शकता: “नमस्ते. मी तुम्हाला काही दाखवलं तर चालेल का? [एका पोर्टेबल व्हिडिओ प्लेअरवरून, डीव्हीडीवरच्या न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन बायबलमधून एक वचन दाखवा.] हे अमेरिकन संकेत भाषेच्या बायबलमधलं एक वचन आहे. बायबलव्यतिरिक्‍त आमच्याकडे इतरही अनेक व्हिडिओ आहेत. हे व्हिडिओ, कर्णबधिर लोकांच्या आध्यात्मिक गरजा पूर्ण करण्यासाठी बनवण्यात आले आहेत. ते विनामूल्य आहेत. तुम्ही कोणा कर्णबधिर व्यक्‍तीला, किंवा जिला कमी ऐकू येते व जी संकेत भाषा वापरते अशा एखाद्या व्यक्‍तीला ओळखता का?” घरमालकाला कोणी आठवत नसेल, तर तुम्ही त्याला अशा ठिकाणांची उदाहरणे देऊ शकता जेथे कदाचित त्याने कर्णबधिर व्यक्‍तींना पाहिले असेल; जसे की कामाच्या ठिकाणी, शाळेत किंवा शेजारी-पाजारी.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा