नमुना सादरीकरणांचा उपयोग कसा करावा?
१. नमुना सादरीकरणांचा उपयोग कसा करावा?
१ आपली नियतकालिके व इतर प्रकाशने कशी सादर करावीत हे दाखवण्याकरता आमची राज्य सेवा यात वेळोवेळी नमुना सादरीकरणे दिली जातात. सेवाकार्यात घरमालकाशी बोलताना या सादरीकरणांचा शब्दशः उपयोग करण्याची गरज नाही. घरमालकाशी काय बोलावे याची सर्वसाधारण कल्पना देण्याकरता ही सादरीकरणे दिली जातात. ही सादरीकरणे आपण स्वतःच्या शब्दांत मांडली तर ती सहसा जास्त परिणामकारक ठरतील. आपण जितके स्वाभाविकपणे बोलू तितका घरमालक निश्चिंत होऊन आपले ऐकेल; तसेच त्यामुळे आपला प्रामाणिकपणा व आत्मविश्वास दिसून येईल.—२ करिंथ. २:१७; १ थेस्सलनी. १:५.
२. सादरीकरणे तयार करताना विशिष्ट ठिकाणच्या लोकांच्या रीतिरिवाजांचा विचार करणे का महत्त्वाचे आहे?
२ आपले सादरीकरण जुळवून घ्या: आपण बरेचदा समाजातील रीतिरिवाज विचारात घेऊन आपली सुवार्ता सादर करतो. उदाहरणार्थ, सुरुवातीला घरमालकाला नमस्कार केल्यावर त्याच्याशी संभाषण सुरू करून मग तुम्ही आपला संदेश सादर करता का? की आपण कोणत्या कामाने आलो आहोत हे सर्वप्रथम तुम्ही सांगावे अशी तुमच्या भागातील लोक अपेक्षा करतात? प्रत्येक ठिकाणी परिस्थिती वेगळी असते आणि कधीकधी तर प्रत्येक व्यक्तीनुसार तुम्हाला हे ठरवावे लागते. घरमालकाला कोणताही प्रश्न विचारताना समजुतदारपणा दाखवणेही महत्त्वाचे आहे. काही ठिकाणी एखादा प्रश्न विचारण्यात काहीही गैर नसेल, पण तोच प्रश्न दुसऱ्या ठिकाणी विचारल्यास लोकांना वाईट वाटू शकते. त्यामुळे आपण विचारशीलता दाखवून, विशिष्ट ठिकाणी लोकांना काय आवडते, काय आवडत नाही हे विचारात घेऊन आपल्या सादरीकरणांमध्ये फेरबदल केला पाहिजे.
३. आपण ज्यांच्याशी बोलतो त्यांची पार्श्वभूमी व विचारसरणी लक्षात घेणे का महत्त्वाचे आहे?
३ याशिवाय, क्षेत्र सेवेची तयारी करताना आपल्या भागातील लोकांची पार्श्वभूमी व विचारसरणीदेखील आपण लक्षात घेतली पाहिजे. उदाहरणार्थ मत्तय ६:९, १० या वचनावर चर्चा करताना, एखाद्या कॅथलिक व्यक्तीशी चर्चा करण्याची तुमची पद्धत आणि जिला “प्रभूची प्रार्थना” माहीतच नाही अशा व्यक्तीशी चर्चा करण्याची तुमची पद्धत साहजिकच वेगळी असेल. आधी थोडा विचार केल्यास, सेवाकार्यात भेटणाऱ्या लोकांनी आपला संदेश आवडीने ऐकावा म्हणून आपण आपल्या सादरीकरणांमध्ये सहसा आवश्यक फेरबदल करू शकतो.—१ करिंथ. ९:२०-२३.
४. उत्तम तयारी करणे का आवश्यक आहे?
४ आपण नमुना सादरीकरणाचा जसाच्या तसा वापर करण्याचे ठरवले, तरी पूर्वतयारी करण्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आपण जो लेख किंवा जो अध्याय घरमालकाला दाखवू इच्छितो त्यातून त्याला आवडतील असे मुद्दे निवडण्यासाठी आपण आधी तो लेख किंवा अध्याय वाचला पाहिजे. मग त्या मुद्द्यांचा आपल्या सादरीकरणात उपयोग केला पाहिजे. आपल्या प्रकाशनांतील सुरेख माहितीशी आपण स्वतः परिचित झालो तरच आपण ती प्रकाशने उत्साहाने इतरांना सादर करू शकतो.
५. कधीकधी आपल्याला, दिलेल्या सादरतेपेक्षा वेगळी सादरता तयार करावीशी का वाटू शकेल आणि आपण हे कसे करू शकतो?
५ वेगळ्या पद्धतीने सादर करणे: आपण केवळ नमुना सादरीकरणांत दिलेल्या सादरतांचाच उपयोग केला पाहिजे असा काही नियम आहे का? नाही. जर तुम्हाला एखाद्या वेगळ्या पद्धतीने किंवा वेगळे शास्त्रवचन वापरून संदेश सादर करणे सोपे वाटत असेल तर तसे करा. खासकरून नियतकालिके सादर करताना मुख्य लेखांव्यतिरिक्त, आपल्या क्षेत्रातल्या लोकांना मासिकातले इतर कोणते लेख आवडतील याचा विचार करून ते त्यांना दाखवण्याचा प्रयत्न करा. सेवा सभेत क्षेत्र सेवेची प्रात्यक्षिके दाखवताना तुमच्या क्षेत्रात जी पद्धत परिणामकारक ठरली आहे ती दाखवा. अशा रीतीने सर्वांनाच परिणामकारक पद्धतीने सुवार्ता सादर करण्यास साहाय्य मिळेल.