शिक्षण आणि तुमची आध्यात्मिक ध्येये
१ लहानपणापासून उत्तम मूलभूत शिक्षण घेतल्यास तुम्हाला चांगले लिहिता-वाचता तर येईलच, शिवाय भूगोल, इतिहास, गणित आणि विज्ञान यांसारख्या विषयांचे चांगले ज्ञानही मिळेल. त्यामुळे योग्य दिशेने विचार करण्याचे, वस्तुस्थितींचे परीक्षण करण्याचे, समस्या सोडवण्याचे आणि काम करण्याच्या अधिक परिणामकारक पद्धती शोधून काढण्याचे बाळकडू तुम्हाला शाळेत मिळू शकते. अशा शिक्षणाचा तुम्हाला आयुष्यभर फायदाच होईल. पण, शिक्षणाचा तुमच्या आध्यात्मिक ध्येयांशी काय संबंध? आणि अशा शिक्षणामुळे “ज्ञान व विवेक” संपादन करण्यास कशी मदत होऊ शकते?—नीति. ३:२१, २२, पं.र.भा.
२ देवाचे कुशल सेवक बनण्यास स्वतःला तयार करा: शाळेत असताना वर्गात नीट लक्ष द्या आणि दिलेला गृहपाठ चांगल्या प्रकारे करा. वाचन व अभ्यास करण्यात तुम्ही तरबेज झाल्यास देवाच्या वचनाचे परीक्षण करणे आणि आध्यात्मिक रीत्या मजबूत राहणे तुम्हाला अधिक सोपे जाईल. (प्रे. कृत्ये १७:११) तसेच, सर्व गोष्टींचे बऱ्यापैकी ज्ञान असल्यास सेवेत भेटणाऱ्या निरनिराळ्या पार्श्वभूमीच्या, आवडीनिवडींच्या आणि धर्माच्या लोकांशी बोलायला तुम्हाला कठीण जाणार नाही. तसेच, देवाच्या संघटनेत विविध ख्रिस्ती जबाबदाऱ्या हाताळण्यासदेखील तुमचे शालेय शिक्षण तुम्हाला उपयोगी पडेल.—पडताळा २ तीमथ्य २:२१; ४:११.
३ स्वतःच्या पायांवर उभे राहायला शिका: तुम्ही मनापासून प्रयत्न केल्यास शिक्षण झाल्यानंतरही तुमचा चरितार्थ चालवण्यासाठी एखादे कलाकौशल्य तुम्हाला शिकता येईल. (पडताळा १ तीमथ्य ५:८.) तेव्हा, तुम्ही जे कोणते विषय निवडता ते विचारपूर्वक निवडा. ज्यात नोकरी-व्यवसायासाठी फारसा वाव नसतो अशा क्षेत्रांत शिरण्याचा विचार करण्याऐवजी, ज्यामुळे पुढे कोठेही उचित नोकरी मिळेल असे प्रशिक्षण घेण्याचा किंवा असे एखादे कलाकौशल्य आत्मसात करण्याचा विचार करा. (नीति. २२:२९) तसेच, अधिक गरज असलेल्या क्षेत्रांत जाऊन साक्षीकार्य करण्याचा निर्णय पुढेमागे तुम्ही घेतलाच तर स्वतःच्या पायांवर उभे राहण्यास हे प्रशिक्षण तुमच्या कामी येईल.—पडताळा प्रेषितांची कृत्ये १८:१-४.
४ होय, शाळेतील उत्तम मूलभूत शिक्षणामुळे तुम्हाला देवाच्या सेवेत जास्तीत-जास्त करता येईल. तेव्हा, यहोवाच्या सेवेत प्रगती करण्यासोबतच स्वतःच्या पायांवर उभे राहण्यास मदत करतील अशी कलाकौशल्ये शिकून घेण्यास झटा. अशा प्रकारे, तुमची आध्यात्मिक ध्येये गाठण्यास तुमचे शिक्षण लाभदायक ठरेल.