सेवा करण्याच्या संधीला बहुमोल समजा
१. जगातील बहुतेक लोक आपण करत असलेल्या प्रचार कार्याबद्दल काय विचार करतात?
१ सैतानाच्या जगातील पुष्कळ लोकांना, आपण करत असलेले प्रचार कार्य “मूर्खपणाचे” वाटते. (१ करिंथ. १:१८-२१) आपण सावध राहिलो नाही तर लोकांच्या या बिघडलेल्या दृष्टिकोनाचा आपल्यावर परिणाम होऊन आपण निराश होऊ शकतो व सेवेतला आपला आवेश कमी होऊ शकतो. (नीति. २४:१०; यश. ५:२०) यहोवाचे साक्षीदार बनण्याचा आपल्याला मिळालेला सुहक्क बहुमोल समजण्याकरता आपल्याजवळ कोणती कारणे आहेत?—यश. ४३:१०.
२. आपले प्रचार कार्य “पवित्र कार्य” कसे आहे?
२ “पवित्र कार्य”: आपले प्रचार कार्य “पवित्र कार्य” आहे, असे प्रेषित पौलाने म्हटले. (रोम. १५:१५, १६, NW) ते कसे? या कार्यात भाग घेऊन आपण जो “पवित्र आहे” त्या यहोवा “देवाचे सहकारी” होतो आणि त्याच्या नावाच्या पवित्रिकरणात भाग घेतो. (१ करिंथ. ३:९; १ पेत्र १:१५) यहोवाच्या मते, आपण करत असलेले प्रचार कार्य हे, “स्तुतीचा यज्ञ” आहे. त्यामुळे, प्रचार कार्यात भाग घेणे हा आपल्या उपासनेचा अगदी महत्त्वाचा पैलू आहे.—इब्री १३:१५.
३. देवाच्या येणाऱ्या राज्याची आनंदाची बातमी सांगायचे काम अप्रतिम का आहे?
३ देवाच्या येणाऱ्या राज्याची आनंदाची बातमी सांगायचा बहुमान तसे पाहायला गेलो तर फार कमी लोकांना मिळाला आहे. देवदूतांना हे काम दिले असते तर ते त्यांनी अगदी आनंदाने शिवाय आपल्यापेक्षा कैकपटीने अधिक प्रभावीपणे केले असते. (१ पेत्र १:१२) पण ही अप्रतिम कामगिरी पूर्ण करण्यासाठी यहोवाने आपल्यासारख्या अपरिपूर्ण मानवांना अर्थात ‘मातीच्या भांड्यांना’ निवडले आहे.—२ करिंथ. ४:७.
४. प्रचार कार्यात भाग घेण्याचा आपल्याला मिळालेला सुहक्क आपण बहुमोल समजतो हे आपण कसे दाखवू?
४ प्राधान्य: प्रचार कार्यात भाग घेण्याचा आपल्याला मिळालेला सुहक्क आपण बहुमोल समजत असल्यामुळे आपण त्याला आपल्या जीवनात “श्रेष्ठ” स्थान अर्थात प्राधान्य देतो. (फिलिप्पै. १:१०) त्यामुळेच आपण या कामात दर आठवडी भाग घेण्यासाठी वेळेची आखणी करतो. एखाद्या संगीतकाराला जेव्हा, अतिशय नामवंत अशा संगीत कार्यक्रमात वाद्य वाजवण्याचा बहुमान मिळतो तेव्हा तो प्रत्येक प्रयोगाची तयारी करतो आणि आपले कौशल्य आणखी सराईतपणे पेश करण्यासाठी परिश्रम घेतो. त्याच प्रकारे आपणही, प्रचार कार्याला जाण्याआधी उत्तम तयारी करू. तयारी केल्यामुळे आपल्याला “सत्याचे वचन नीट” सांगता येते आणि लोकांना सत्य शिकवण्याच्या आपल्या कौशल्यात सुधारणा होते.—२ तीम. २:१५; ४:२.
५. आपण करत असलेल्या सेवेची कोण कदर करतात?
५ प्रचार कार्याकडे पाहण्याच्या लोकांच्या नकारात्मक दृष्टिकोनाचा स्वतःवर परिणाम होऊ देऊ नका. आपल्या क्षेत्रात असेही अनेक लोक आहेत जे आपण सांगत असलेल्या संदेशाची खरोखरच कदर करतात. एवढे मात्र खरे, की लोकांना आवडते म्हणून आपण प्रचार कार्यात भाग घेत नाही. तर, आपण जेव्हा प्रचार कार्याला जातो तेव्हा यहोवाला आनंद होतो आणि आपण घेत असलेल्या परिश्रमांची तो दखल घेतो.—यश. ५२:७.