प्रगतीशील बायबल अभ्यास चालवणे—विद्यार्थ्यांना संघटनेबद्दल मार्गदर्शन करणे
१ बायबल अभ्यास घेण्याचा आपला उद्देश विद्यार्थ्याला फक्त बायबलमधल्या शिकवणींबद्दल सांगणे नाही तर विद्यार्थ्याला ख्रिस्ती मंडळीचा एक भाग होण्यास मदत करणे हादेखील आहे. (जख. ८:२३) असे करण्यास, यहोवाचे साक्षीदार—ते कोण आहेत? आणि त्यांचा विश्वास काय आहे? हे माहितीपत्रक आपल्याला मदत करेल. याची एक प्रत बायबल विद्यार्थ्याला द्या आणि ते वाचण्यास त्याला उत्तेजन द्या. त्याचबरोबर, प्रत्येक आठवडी अभ्यासादरम्यान, यहोवाच्या संघटनेविषयी काही मुद्द्यांवर थोडी चर्चा करा.
२ मंडळीच्या सभा: आपल्याबरोबर मंडळीतील सभांना उपस्थित राहून बायबल विद्यार्थी प्रामुख्याने यहोवाच्या संघटनेबद्दल अधिक माहिती घेऊ शकतात. (१ करिंथ. १४:२४, २५) यासाठी तुम्ही त्यांना, आठवड्यातील पाच सभांची माहिती देऊ शकता; बायबल विद्यार्थ्याला एक वेळेस एका सभेची माहिती देणे योग्य राहील. पुढील जाहीर भाषणाचा विषय त्यांना सांगा. टेहळणी बुरूज अभ्यास लेख आणि मंडळीचा बायबल अभ्यास यात अभ्यासला जाणारा भाग त्यांना दाखवा. ईश्वरशासित सेवा प्रशाला आणि सेवा सभा यांबद्दल माहिती द्या. सेवा प्रशालेत तुमचा भाग असेल तर तुम्ही त्यांच्याबरोबर त्याची तालीम करू शकता. सभेमध्ये सांगितलेले उल्लेखनीय मुद्दे त्यांना सांगा. सभांमध्ये नेमके काय होते याची कल्पना करण्यासाठी, नियतकालिकात सभांबद्दलचे फोटो असतील तर ते त्यांना दाखवा. पहिल्या अभ्यासाच्या सुरुवातीपासूनच सभांना येण्यास त्यांना आमंत्रित करा.
३ स्मारक दिन, संमेलने, विभागीय पर्यवेक्षकांची भेट जवळ येत असेल तर बायबल विद्यार्थ्याला याबाबतीत समजावून सांगण्याकरता आणि या व्यवस्थेबद्दल त्यांच्यात उत्साह निर्माण करण्यासाठी थोडा वेळ काढा. आपल्याला यहोवाचे साक्षीदार म्हणून का ओळखले जाते? आपल्या सभा होणाऱ्या ठिकाणाला आपण राज्य सभागृह का म्हणतो? मंडळीत वडील आणि सेवा सेवक यांची काय भूमिका आहे? आपले प्रचार कार्य आणि क्षेत्र याची व्यवस्था कशी केली जाते? आपली प्रकाशने कशी छापली जातात? संघटनेचा खर्च कसा चालवला जातो? कामावर देखरेख करताना, शाखा कार्यालय आणि नियमन मंडळ यांची काय भूमिका आहे?, यासारख्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही हळूहळू देऊ शकता.
४ उद्देशात्मक व्हिडिओ: बायबल विद्यार्थी आणखी एका मार्गाने, म्हणजेच आपल्या संस्थेच्या व्हिडिओद्वारे यहोवाची अप्रतिम संघटना पाहू शकतात. आपण त्यांना टू द एण्ड्स ऑफ द अर्थ, आर होल असोसिएशन ऑफ ब्रदर्स आणि युनायटेड बाय डिव्हाईन टिचिंग हे व्हिडिओ दाखवू शकतो. पाच वर्षांपासून एका स्त्रीला आपली नियतकालिके आणि प्रकाशने मिळत होती. तिने जेव्हा जेहोवाज विटनेसेस—द ऑर्गनायझेशन बिहाईंड द नेम हा व्हिडिओ पाहिला तेव्हा ती अश्रू आवरू शकली नाही. तिच्याकडे येणाऱ्या साक्षीदारांवर तिचा भरवसा वाढत चालला होता, पण हा व्हिडिओ पाहिल्यावर तिला वाटले, की ती यहोवाच्या साक्षीदारांच्या संघटनेवरदेखील भरवसा ठेवू शकते. तिच्याबरोबर बायबलचा रीतसर अभ्यास सुरू झाला आणि पुढील आठवड्यापासून ती राज्य सभागृहात होणाऱ्या सभांनादेखील उपस्थित राहू लागली.
५ आपल्याला दिलेल्या साधनांचा उपयोग करून दर आठवडी आपण, आपल्या बायबल विद्यार्थ्यांचे लक्ष यहोवा आज वापर करत असलेल्या संघटनेकडे हळूहळू वळवू शकतो.
[अभ्यासाचे प्रश्न]
१. प्रत्येक आठवडी बायबल अभ्यासादरम्यान यहोवाच्या संघटनेविषयी असलेल्या मुद्द्यांवर चर्चा करणे फायद्याचे का ठरेल?
२. तुम्ही बायबल विद्यार्थ्याला सभांना येण्यासाठी उत्तेजन कसे देऊ शकता?
३. संघटनेच्या कोणत्या वैशिष्ट्यांवर आपण चर्चा करू शकतो?
४, ५. व्हिडिओंमुळे विद्यार्थ्यांना संघटनेबद्दलची माहिती मिळून त्यांची कृतज्ञता कशी वाढू शकते?