तुम्ही ‘मासेदोनियात जाऊ’ शकाल का?
१. पौलाला आणि त्याच्या साथीदारांना मासेदोनियात जाण्याचे मार्गदर्शन कोणी दिले?
१ सुमारे इ.स. ४९ साली प्रेरित पौल, आपल्या दुसऱ्या मिशनरी दौऱ्यासाठी सिरिया अंत्युखियाहून निघाला. त्याला इफिसस आणि आशिया मायनरमधील इतर शहरांना भेट द्यायची होती. पण पवित्र आत्म्याद्वारे त्याला “मासेदोनियात” जाण्याचे मार्गदर्शन मिळाले. पौलाने आणि त्याच्या साथीदारांनी आनंदाने हे मार्गदर्शन स्वीकारले आणि त्या प्रदेशात त्यांना एक मंडळी उभारण्याचा मोठा बहुमान मिळाला. (प्रे. कृत्ये १६:९, १०; १७:१, २, ४) आज, जगभरातल्या काही ठिकाणी आध्यात्मिक शेतकऱ्यांची खरोखरच गरज आहे. (मत्त. ९:३७, ३८) तुम्ही मदत करण्यास तयार आहात का?
२. काही जण इतर ठिकाणी जाण्याचा निर्णय का घेत नाहीत?
२ तुमच्या मनातही पौलाप्रमाणे मिशनरी कार्य करण्याची तळमळ असेल पण दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करण्याबाबत तुम्ही गांभीर्याने विचार केला नसावा. जसे की, गिलियड प्रशिक्षणासाठी, किंवा इतर कोणत्या खास प्रशिक्षणासाठी जाणे तुम्हाला शक्य नसेल कारण तुमचे वय बसत नसेल किंवा तुम्ही एक अविवाहित बहीण असाल किंवा तुम्हाला लहान मुले असतील. नवीन भाषा शिकण्याचा तुमच्यात आत्मविश्वास नसेल म्हणून कदाचित तुम्ही इतर ठिकाणी स्थलांतर करण्याचा विचार करत नसाल. किंवा आर्थिक कारणांमुळे कदाचित तुम्ही दुसऱ्या ठिकाणी राहायला आला असाल, आणि इथून पुन्हा दुसरीकडे जाण्यास कचरत असाल. पण, प्रार्थनापूर्वक विचार केल्यावर कदाचित तुम्हाला गरज आहे त्या ठिकाणी जाणे शक्य होऊ शकेल.
३. इतर ठिकाणी यशस्वीरीत्या प्रचार कार्य करण्यासाठी खास प्रशिक्षण घेतलेच पाहिजे, अशी अट का नाही?
३ खास प्रशिक्षण घेण्याची गरज आहे का? पौल आणि त्याच्या साथीदारांना यशस्वी होण्याकरता कोणत्या गोष्टीने मदत केली? ते यहोवावर आणि त्याच्या पवित्र आत्म्यावर अवलंबून राहिले. (२ करिंथ. ३:१-५) त्यामुळे, जरी खास प्रशिक्षण मिळवण्याची तुमची परिस्थिती नसेल, तरी तुम्ही इतर ठिकाणी यशस्वीरीत्या सेवा कार्य करू शकता. तुम्ही हे लक्षात ठेवा की तुम्हाला ईश्वरशासित सेवा प्रशाला आणि सेवा सभा यांद्वारे सातत्याने प्रशिक्षण मिळते. आणि तुमचे जर खास प्रशिक्षण मिळवण्याचे ध्येय असेल तर, इतर ठिकाणी स्थलांतरीत झाल्याने, अधिक प्रशिक्षणाकरता जेव्हा तुम्हाला बोलावले जाईल तेव्हा हा अनुभव तुमच्या कामी येईल.
४. दुसऱ्या ठिकाणी सेवा कार्यासाठी जाणे शक्य नाही असा विचार वृद्ध जनांनी का करू नये?
४ वृद्ध जन: आध्यात्मिकतेत प्रौढ असणारे वृद्ध जन ज्यांचे आरोग्य स्वास्थ्य चांगले आहे ते गरज असलेल्या ठिकाणी खूप लाभदायक ठरू शकतात. तुम्ही सेवानिवृत्त आहात का? ज्यांना बऱ्यापैकी पेन्शन मिळते ते, अशा ठिकाणी स्थलांतरीत झाले आहेत जेथे त्यांचा स्वतःचा आणि त्यांच्या औषधांचा खर्च कमी असतो त्यामुळे ते चांगल्याप्रकारे स्वतःचा खर्च भागवू शकतात.
५. जेथे गरज आहे तेथे स्थलांतरीत झालेल्या एका बांधवाचा अनुभव सांगा.
५ इंग्रजी भाषा बोलल्या जाणाऱ्या एका देशात, एक सेवानिवृत्त बांधव मंडळीत वडील आणि पायनियर आहेत. ते उत्तर आशियातील एका नावाजलेले पर्यटन स्थळी, नऊ प्रचारकांच्या इंग्रजी बोलणाऱ्या गटाला मदत करण्यासाठी तेथे राहायला गेले. या लहानशा गटाने मिळून तेथे राहणाऱ्या ३०,००० परदेशी लोकांना प्रचार केला. दोन वर्षात ५० जन सभांना उपस्थित राहू लागले. ते बांधव सांगतात: “याठिकाणी येऊन मी सर्वात अनोखा आशीर्वाद अनुभवला. याबद्दल बोलण्यासाठी माझ्याकडे वेळ अपुरा पडतो!”
६. गरज होती त्या ठिकाणी सेवा करायला गेलेल्या एका अविवाहित बहिणीचा अनुभव सांगा.
६ अविवाहित बहिणी: यहोवाने एका शक्तिशाली मार्गाने गरज असलेल्या ठिकाणी प्रचार कार्य करण्यासाठी बहिणींचा उपयोग करून घेतला आहे. (स्तो. ६८:११) एका तरुण अविवाहित बहिणीचे परदेशात राहून आपली सेवा वाढवण्याचे ध्येय होते, पण तिच्या आई-वडिलांना तिच्या सुरक्षिततेबाबत चिंता होती; आणि हे अगदी समजण्याजोगे आहे. त्यामुळे तिने असा देश निवडला जो राजनैतिकरीत्या व आर्थिकरीत्या स्थिर आहे, आणि याबद्दल तिने शाखा कार्यालयाला पत्र लिहिले आणि तिला योग्य ती माहिती व मदत मिळाली. या देशात राहायला येऊन तिला सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. या दरम्यान तिला खूप आशीर्वाद मिळाले. ती म्हणते: “घरी असताना मला मोजकेच बायबल अभ्यास करण्याची संधी मिळायची. पण जेथे गरज आहे त्या ठिकाणी सेवा केल्याने मी खूप बायबल अभ्यास चालवते आणि मी माझ्या शिकवणीच्या पद्धतीमध्ये प्रगती करू शकले आहे.”
७. एका कुटुंबाचा अनुभव सांगा जे वेगळ्या ठिकाणी स्थलांतरीत झाले आहेत.
७ कुटुंब: तुम्हाला जर मुले असतील तर दुसऱ्या ठिकाणी जाऊन प्रचार कार्य करणे तुम्हाला अशक्य आहे, असे तुम्हाला वाटते का? एका कुटुंबात ८ वर्षांचा एक मुलगा आणि १० वर्षांची एक मुलगी आहे; या कुटुंबाने गरज असलेल्या ठिकाणी जायचे ठरवले. त्या कुटुंबातील आई त्यांचा अनुभव सांगते: “आम्हाला खूप आनंद होत आहे की आमच्या मुलांचे संगोपन अशा ठिकाणी झाले जेथे त्यांना खास पायनियर आणि मिशनरी यांच्याबरोबर सहवास करायला मिळाला. गरज असलेल्या ठिकाणी सेवा करत असल्यामुळे आमचे जीवन अर्थभरीत झाले आहे.”
८. दुसरी भाषा न शिकता इतर ठिकाणी सेवेसाठी जाणे शक्य आहे का? सविस्तर सांगा.
८ भाषा: नवीन भाषा शिकावी लागेल, या भीतीने तुम्ही दुसऱ्या ठिकाणी जाण्यास घाबरत आहात का? तुमची भाषा इतर ठिकाणी बोलली जात असावी जेथे प्रचारकांची जास्त गरज आहे. इंग्रजी बोलणारे एक जोडपे, जास्तीत जास्त इंग्रजी बोलणारे लोक असलेल्या स्पॅनिश बोलणाऱ्या ठिकाणी स्थलांतरीत झाले. त्यांना शाखा कार्यालयाकडून अशी माहिती मिळाली की इंग्रजीत असणाऱ्या अनेक मंडळ्यांना इंग्रजी बोलणाऱ्यांची गरज आहे, तेव्हा त्यांनी एका मंडळीची निवड केली आणि ते तेथे दोन वेळा गेले. ते परत घरी आले, त्यांचा महिन्याचा खर्च त्यांनी कमी केला, आणि एका वर्षासाठी पैसे वाचवले. ते जेव्हा तिथे स्थलांतरीत व्हायला तयार झाले तेव्हा तेथील बांधवांनी, त्यांना परवडेल अशा घराची सोय केली.
९, १०. आपल्या मायदेशातून दुसऱ्या देशात राहायला गेलेले कोणता विचार करू शकतात आणि का?
९ विदेशी: सत्य शिकण्याआधी तुम्ही तुमचा मायदेश सोडून दुसऱ्या देशात किंवा तुमच्या देशांतील इतर ठिकाणी स्थलांतर केले आहे का? कदाचित तुमच्या गावी किंवा खेडेगावात, आध्यात्मिक कापणी कामगारांची जास्त गरज असेल. अशांना मदत करण्याकरता तुम्ही पुन्हा आपल्या मायदेशी जाऊ शकाल का? दुसऱ्या देशातून आलेल्या लोकांपेक्षा तुम्हाला सहजपणे तुमच्या देशात काम व घर मिळू शकेल. आणि कदाचित तुम्हाला तेथील भाषाही येत असेल. शिवाय, दुसऱ्या देशातून आलेल्या लोकांपेक्षा तुमच्या भागात राहणारे लोक, तुम्ही सांगत असलेला राज्य संदेश ऐकण्यास तयार होतील.
१० एक मनुष्य अल्बेनियाहून इटलीत निर्वासित म्हणून राहत होता. तेथेच त्याला चांगली नोकरी मिळाली व तो अल्बेनियात राहणाऱ्या आपल्या कुटुंबाला पैसे पाठवत असे. तो सत्यात आल्यानंतर अल्बेनियात जास्त गरज असलेल्या ठिकाणी स्थलांतरीत होणाऱ्या इटालियन बोलणाऱ्या खास पायनियरांच्या एका गटाला अल्बेनियन भाषा शिकवण्यासाठी त्याने सुरुवात केली. तो बांधव सांगतो: “मी जे क्षेत्र सोडले होते तेथे ते पायनियर जात होते. त्यांना भाषाही येत नव्हती तरीही ते जाण्यास उत्सुक होते. माझी भाषा व संस्कृती अल्बेनियन आहे. मग मी इथं इटलीत काय करतोय?” या बांधवाने सुवार्ता सांगण्यास मदत करण्यासाठी परत अल्बेनियात येण्याचे ठरवले. तो म्हणतो: “इटलीतील काम व पैसा सोडल्याची मला खंत वाटते का? मला एका क्षणासाठीसुद्धा असे वाटले नाही! मला अल्बेनियात सर्वात चांगले काम मिळाले. माझ्या मते, तुम्ही कुठंही असला तरी, यहोवाची सेवा करणे हे सर्वात महत्त्वाचे काम आहे आणि यातून खरे समाधान मिळते!”
११, १२. गरज असलेल्या ठिकाणी स्थलांतर करण्याचा विचार करत असलेल्यांनी काय केले पाहिजे?
११ ते कसे कराल: मासेदोनियात जाण्याआधी, पश्चिम दिशेला जाण्याचे पौल आणि त्याच्या साथीदारांनी ठरवलेले होते पण, “त्यांना पवित्र आत्म्याकडून प्रतिबंध झाल्यामुळे” ते उत्तरेला गेले. (प्रे. कृत्ये १६:६) जेव्हा ते बिथुनियाला जात होते तेव्हा येशूच्या आत्म्याने त्यांना तेथे जाऊ दिले नाही. (प्रे. कृत्ये १६:७) आजही यहोवा येशूद्वारे प्रचार कार्यावर देखरेख करत आहे. (मत्त. २८:२०) त्यामुळे तुम्ही जर गरज असलेल्या ठिकाणी जाण्याचा विचार करत असाल तर देवाकडे प्रार्थनापूर्वक मार्गदर्शन मागा.—लूक १४:२८-३०; याको. १:५; “तुम्ही ज्या ठिकाणी जाण्याचा विचार करत आहात तेथे खरोखरच गरज आहे हे तुम्ही कसे माहीत करून घेऊ शकता” हा चौकोन पाहा.
१२ तुम्ही विदेशी भागात सेवा करू शकाल का याबद्दल तुमच्या मंडळीतील वडिलांकडे किंवा इतर प्रौढ बांधवांकडे त्यांचे मत विचारा. (नीति. ११:१४; १५:२२) गरज असलेल्या ठिकाणी सेवा करण्याविषयी आम्ही छापलेले साहित्य तुम्ही वाचू शकता तसेच, ज्या देशात तुम्ही जाऊ इच्छिता त्याची माहिती काढा. त्या ठिकाणाला तुम्ही एकदा भेट देऊ शकता, किंवा काही दिवस राहून पाहू शकता? तुम्ही जर दुसऱ्या ठिकाणी जाण्याचे ठरवत असाल तर जास्त माहितीसाठी शाखा कार्यालयाला पत्र लिहू शकता. पण, तुमचे पत्र शाखा कार्यालयाला थेट पाठवण्याऐवजी ते तुमच्या मंडळीतील वडिलांना द्या, जेणेकरून ते पत्र पाठवण्याआधी ते त्यांचे मत त्यात लिहू शकतात.—आमची राज्य सेवा मार्च २००७ पृष्ठ ३ पाहा.
१३. शाखा कार्यालय तुम्हाला कशा प्रकारे मदत देऊ शकते, पण तुमची सर्वस्वी जबाबदारी काय आहे?
१३ शाखा कार्यालय तुम्हाला योग्य माहिती पुरवू शकेल ज्याच्या आधारावर तुम्ही निर्णय घेऊ शकाल. पण, ते कायदेशीर फॉर्म किंवा कागदपत्रे देणार नाहीत किंवा तुमच्यासाठी घर शोधणार नाही. या सर्व गोष्टी तुम्ही स्वतः केल्या पाहिजेत; दुसऱ्या ठिकाणी राहायला जाण्याआधी तुम्ही त्या ठिकाणाची काळजीपूर्वक माहिती काढली पाहिजे. जे दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतात त्यांनी स्वतःचा खर्च उचलला पाहिजे तसेच कायदेकानून संबंधीच्या सर्व गरजा पूर्ण करण्यास सक्षम असले पाहिजे.—गलती. ६:५.
१४. जेथे प्रचार कार्यावर बंदी आहे त्या ठिकाणी भेट देण्याआधी किंवा राहण्यास जाण्याआधी काय खबरदारी घेणे आवश्यक आहे?
१४ प्रचार कार्यास बंदी असणारे देश: काही देशांत तेथील स्थानीय बंधुभगिनींना आपल्या उपासनेप्रती खूप सावध राहावे लागते. (मत्त. १०:१६) जे प्रचारक अशा ठिकाणी भेट द्यायला किंवा राहायला आले आहेत त्यांच्यामुळे नकळत इतरांचे लक्ष आपल्या कार्यांकडे वेधले जाऊ शकते आणि तेथील स्थानीय बांधवांची सुरक्षा धोक्यात येऊ शकते. अशा ठिकाणी जाण्याचा निर्णय तुम्ही घेत असाल तर कृपया त्याआधी तुमच्या वडील वर्गाद्वारे तुमच्या स्थानीय शाखा कार्यालयाला पत्र लिहा.
१५. सेवेसाठी दुसरीकडे जाण्याची ज्यांची परिस्थिती नाही ते स्थानीय ठिकाणी राहूनही त्यांची सेवा कशी वाढवू शकतात?
१५ जर तुम्ही इतर ठिकाणी जाऊ शकत नसाल: जर तुम्ही काही कारणांमुळे दूरच्या ठिकाणी जाऊ शकत नसाल तर निराश होऊ नका. कदाचित, तुमच्यासाठी एक दुसरे “मोठे व कार्य साधण्याजोगे द्वार” उघडे असेल. (१ करिंथ. १६:८, ९) तुमच्या विभागीय पर्यवेक्षकाला, तुम्हाला जवळपास असलेल्या ठिकाणांबद्दल माहीत असेल जेथे गरज आहे. तुम्ही तुमच्या जवळच्या मंडळीला किंवा गटाला मदत करू शकता. किंवा तुम्ही तुमच्या स्थानीय मंडळीतच राहून तुमची सेवा वाढवू शकता. तुमची परिस्थिती कोणतीही असली तरी, तुम्ही देवाची उपासना पूर्ण मनाने करणे महत्त्वाचे आहे.—कलस्सै. ३:२३.
१६. गरज असलेल्या ठिकाणी जाण्याचा निर्णय घेणाऱ्या बांधवाबद्दल आपण कोणता दृष्टिकोन बाळगला पाहिजे?
१६ तुम्हाला कोणी असा प्रौढ ख्रिस्ती बांधव अथवा बहीण माहीत आहे का ज्यांना गरज असलेल्या ठिकाणी जाण्याचे ध्येय आहे? असेल तर, त्यांना पाठिंबा व प्रोत्साहन द्या! जेव्हा पौलाने सिरिया अंत्युखिया सोडले तेव्हा ते (रोम आणि ॲलेक्झांड्रियानंतर) रोमी साम्राज्यातील तिसरे मोठे शहर होते. या मोठ्या क्षेत्रात असलेल्या अंत्युखिया मंडळीला पौलाच्या मदतीची गरज होती, आणि तो तेथून गेला तेव्हा मंडळीला खूप दुःख झाले. तरीही बायबलमध्ये असा कोठेही उल्लेख नाही की तिथल्या बांधवांनी पौलाला जाण्यापासून अडवले. त्यांनी फक्त स्वतःचा विचार केला नाही तर, ‘जग हे शेत आहे’ हे लक्षात ठेवले.—मत्त. १३:३८.
१७. ‘मासेदोनियात जाण्याचा’ विचार करण्याकरता कोणकोणती कारणे आहेत?
१७ मासेदोनियात जाण्याचे आमंत्रण स्वीकारल्याने पौलाला आणि त्याच्या साथीदारांना खूप आशीर्वाद मिळाले. ते मासेदोनियातील फिलिप्पै शहरात गेले तेव्हा त्यांना लुदिया भेटली, आणि “तिचे अंतःकरण प्रभूने असे प्रफुल्लित केले की, पौलाच्या सांगण्याकडे तिने लक्ष दिले.” (प्रे. कृत्ये १६:१४) लुदिया आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाने जेव्हा बाप्तिस्मा घेतला तेव्हा कल्पना करा पौल आणि त्याच्या मिशनरी साथीदारांना किती आनंद झाला असेल! अनेक देशात, लुदियाप्रमाणे नम्र हृदयाचे लोक आहेत ज्यांना अजूनपर्यंत सत्य मिळालेले नाही. तुम्ही जर ‘मासेदोनियात गेला’ तर तुम्हाला अशा लोकांना मदत करण्याचा आनंद मिळेल.
[५ पानांवरील चित्र]
तुम्ही ज्या ठिकाणी जाण्याचा विचार करत आहात तेथे खरोखरच गरज आहे हे तुम्ही कसे माहीत करून घेऊ शकता
• तुमच्या मंडळीतील वडीलांशी आणि विभागीय पर्यवेक्षकांशी बोला.
• त्या ठिकाणी भेट दिलेल्या किंवा राहून आलेल्या प्रचारकांशी बोला.
• तुम्ही असे एखादे ठिकाण निवडत असाल जेथे तुम्हाला तुमच्या मातृभाषेत प्रचार करता येईल तर, या भागातील किती लोकांना ही भाषा अवगत आहे त्याची माहिती तुम्ही अधिकृत स्रोतांतून जसे की इंटरनेटवरून मिळवू शकता.