रविवारी तुम्ही प्रचाराला जाऊ शकता का?
१. पौल आणि त्याचे सोबती फिलिप्पै शहरात असताना त्यांनी जे केले त्यावरून आपण काय शिकतो?
१ फिलिप्पैमध्ये बहुतेक यहुदी शब्बाथाच्या दिवशी, आपल्या नोकरी-धंद्यापासून आराम घेत होते. पौल आणि त्याचे सोबती, त्यांच्या एका मिशनरी दौऱ्यादरम्यान फिलिप्पै शहरात आले होते. त्यांनीदेखील त्या दिवशी सेवेला न जाता घरी आराम केला असता, तर कोणीही त्यांना बोलले नसते. पण, पौलाला आणि त्याच्या सोबत्यांना माहीत होते, की या सुटीच्या दिवशी यहुदी लोक शहराच्या बाहेर प्रार्थनेसाठी जमलेले असतील, म्हणून या लोकांना प्रचार करण्याची चालून आलेली संधी त्यांना हातून घालवायची नव्हती. आणि ते प्रचाराला गेले तेव्हा लुदिया नावाच्या एका स्त्रीने आणि तिच्या संपूर्ण घराण्याने जेव्हा सुवार्तेवर विश्वास ठेवून बाप्तिस्मा घेतला तेव्हा पौलाला आणि त्याच्या सोबत्यांना किती आनंद झाला असेल! (प्रे. कृत्ये १६:१३-१५) आजही पुष्कळ लोकांना रविवारच्या दिवशी सुटी असते. तेव्हा अशा लोकांना प्रचार करण्यासाठी आपण रविवारचा काही वेळ उपयोगात आणू शकतो.
२. रविवारच्या दिवशी प्रचार करण्यासाठी यहोवाच्या लोकांनी कोणकोणत्या अडचणींवर मात केली आहे?
२ रविवारी प्रचार करण्यासाठी बांधवांचा लढा: १९२७ मध्ये, यहोवाच्या लोकांना दर रविवारी प्रचार कार्यासाठी थोडा वेळ काढण्याचे उत्तेजन देण्यात आले होते. पण यामुळे त्यांचा लगेचच कडाडून विरोध झाला. अमेरिकेत आपल्या अनेक बंधुभगिनींना, रविवारचे शब्बाथ नियम तोडल्याबद्दल, शांततेचा भंग केल्याबद्दल आणि विनापरवाना विक्री करण्याबद्दल अटक करण्यात आली. पण यहोवाचे लोक घाबरून गप्प बसले नाहीत. १९३० च्या दशकादरम्यान त्यांनी, ‘विभागीय मोहिमांची’ योजना केली. या मोहिमांदरम्यान, आजूबाजूच्या मंडळ्यांमधील प्रचारक, एखादे क्षेत्र पूर्ण करण्यासाठी एकत्र जमायचे. कधीकधी तर इतके प्रचारक जमायचे, की अधिकाऱ्यांना त्यांना अटक करता करता नाकी नऊ यायचे. या बांधवांनी केलेल्या त्यागांची तुम्ही खरोखरच कदर करता का आणि त्यांच्या उत्साहाचे अनुकरण करू इच्छिता का?
३. रविवारच्या दिवशी क्षेत्र सेवेत भाग घेण्याची कोणकोणती उत्तम कारणे आहेत?
३ प्रचारासाठी उत्तम दिवस: रविवारी पुष्कळ लोकांची सुटी असल्यामुळे ते घरी असतात. या दिवशी ते सहसा निवांत असतात. चर्चला जाणारे लोक या दिवशी कदाचित देवा-धर्माच्या गोष्टी करायला उत्सुक असतील. रविवारी आपल्या सभा असतील तर त्यासाठी आपण चांगले कपडे घालून तयारच असतो; मग, सभेच्या आधी किंवा नंतर क्षेत्र सेवेत जायची आपण योजना का करू नये? वाटल्यास, तुम्ही हलका-फुलका आहार सोबत नेऊ शकता.
४. रविवारी काही वेळ क्षेत्र सेवेत भाग घेतल्याने आपल्याला कोणता आनंद मिळू शकेल?
४ रविवारी काही वेळ क्षेत्र सेवेत जाऊन आल्यावरही आपल्याकडे आराम करण्यासाठी वेळ असेल. आराम करण्यासोबतच आपल्याला, पवित्र सेवेत भाग घेतल्यामुळे मानसिक समाधानही मिळू शकेल. (नीति. ३:२४) या दिवशी कदाचित आपल्याला, लुदियासारखे कोणीतरी सत्याची तहान असलेली व्यक्तीही भेटू शकेल!