नियमन मंडळाकडून पत्र
यहोवाच्या प्रिय सहसाक्षीदारांनो:
आपण जगत असलेला काळ किती रोमांचकारक आहे! आणि आपण किती आनंदी आहोत! आपला स्वर्गीय पिता यहोवा याच्या विषयी, तुमच्या सारख्या प्रेमळ बंधुभगिनींबरोबर “एकचित्ताने” उत्तम साक्ष देण्याचे कार्य करण्यास आम्हाला खूप आनंद होत आहे.—सफ. ३:९; योहा. १४:१२.
यहोवाची सेवा आपण आनंदाने करतो याचा अर्थ असा नाही, की आपल्याला कोणताच त्रास सहन करावा लागत नाही. गेल्या सेवा वर्षादरम्यान, भूकंप, पूर, वादळे आणि इतर अनेक जीवघेण्या नैसर्गिक आपत्तींमुळे तुमच्यापैकी काहींवर संकट ओढवले होते. (मत्त. २४:७) आजारपण व वृद्धापकाळ यामुळे पुष्कळ जण दिवसेंदिवस कमजोर होत चालले आहेत. आपल्या सर्वांनाच नाना प्रकारच्या “वेदनांचा” त्रास सहन करावा लागत आहे. (मत्त. २४:८) अनेक देशांमध्ये तसेच अर्मेनिया, एरिट्रिया व दक्षिण कोरियामधील आपल्या बांधवांना त्यांच्या विश्वासामुळे तुरुंगात टाकले जात आहे.—मत्त. २४:९.
या सर्व कठीण समस्यांचा सामना करत असतानाही कोणती गोष्ट आपल्याला सकारात्मक दृष्टिकोन बाळगण्यास मदत करते? सन २०१० च्या वार्षिक वचनाने आपल्याला महत्त्वपूर्ण गुणाची आठवण करून दिली: ‘प्रीती सर्व काही सहन करते. ती कधी अंतर देत नाही.’ (१ करिंथ. १३:७, ८) होय, आपले एकमेकांसाठी व त्याचबरोबर यहोवासाठी असणारे प्रेम आपल्याला समस्यांचा सामना करण्याचे बळ देते.
ख्रिश्चन असल्याचा दावा करणारे अनेक जण, आपण मोठ्या प्रमाणात व नियमितपणे प्रचार कार्य करत असल्याचे पाहून अवाक होतात. त्यांना आपले विश्वास व आपल्या शिकवणी पटत नसल्या तरी, काहींच्या तोंडून, “तुम्ही लोक जे कार्य करत आहात ते कार्य खरं तर आम्ही केलं पाहिजे,” असे उद्गार निघतात. कोणत्या कारणामुळे यहोवाचे साक्षीदार रात्रंदिवस प्रचार कार्य करतात? पुन्हा त्याचे उत्तर प्रेम हेच आहे. कोणाचाही नाश होऊ नये अशी आपल्या स्वर्गीय पित्याची इच्छा आहे आणि आपली देखील हीच इच्छा आहे. (२ पेत्र ३:९) सर्वांनी पश्चात्ताप करावा अशी आपली इच्छा, ही गोष्ट मागील सेवा वर्षात ७५,०८,०५० प्रचारकांच्या गाठलेल्या नव्या उच्चांकावरून दिसून येते. इतर कोणत्या धार्मिक संस्थेचे इतके सेवक, स्वेच्छेने व प्रेमळपणे इतरांना आध्यात्मिकरित्या मदत करण्यात उत्साहाने सहभाग घेत आहेत का?
यशयाने लिहून ठेवलेल्या भविष्यवाणीची पूर्णता पाहून आपल्याला खरोखरच खूप उत्तेजन मिळते. त्याने असे लिहिले: “शेवटल्या दिवसात असे होईल की परमेश्वराच्या मंदिराचा डोंगर पर्वताच्या माथ्यावर स्थापण्यात येईल, आणि सर्व डोंगरांहून तो उंच होईल; त्याकडे सर्व राष्ट्रांतील लोक लोटतील.” (यश. २:२-४) यहोवाच्या मंदिराकडे घोळक्याने येणाऱ्या मोठ्या लोकसमुदायात, मागील सेवा वर्षात बाप्तिस्मा घेतलेल्या २,९४,३६८ जणांचाही समावेश होतो. या अनमोल जनांचे आपण आपल्या बंधूसमाजात स्वागत करतो. ख्रिस्ती प्रेमाने प्रवृत्त होऊन आपण त्यांना, आपल्या सर्वांचा शत्रू असलेल्या सैतानाच्या प्रत्येक हल्ल्याचा प्रतिकार करण्यास मदत करत राहू या.—१ पेत्र ५:८, ९.
गेल्या वर्षी मंगळवार, मार्च ३०, २०१० रोजी स्मारकविधीला १,८७,०६,८९५ जण उपस्थित होते. यावरून असे दिसून येते की अजूनही लाखो लोक आपल्याबरोबर यहोवाची उपासना करण्यात सहभाग घेण्याची शक्यता आहे. यहोवा देवाने अजूनपर्यंत या दुष्ट जगाचा अंत केला नाही ही किती आनंदाची गोष्ट आहे! पण तोपर्यंत, प्रेम आपल्याला सहनशीलता प्रकट करण्यास मदत करेल.—२ थेस्सलनी. ३:५.
जगभरात, २०१० साली झालेल्या “यहोवाच्या जवळ राहा!” या प्रांतीय अधिवेशनामुळे आपल्या स्वर्गीय पित्या यहोवाबरोबरचे आपले नाते किती बळकट झाले आहे. याबाबतीत, स्तोत्रकर्त्याचे हे शब्द किती खरे ठरतात: “ज्या लोकांचा देव यहोवा आहे तेच सुखी आहेत!” (स्तो. १४४:१५, पं.र.भा.) यहोवा आपल्या बाजूने आहे, असा आपला पूर्ण विश्वास असल्यामुळे, भविष्यात आपल्यावर येणाऱ्या कोणत्याही संकटाचा आपण निर्भयतेने सामना करू. (स्तो. २३:४) लवकरच यहोवा आपल्या पुत्राद्वारे “सैतानाची कृत्ये नष्ट” करणार आहे. (१ योहा. ३:८) आपण त्या दिवसाची खरोखरच किती आतुरतेने वाट पाहत आहोत! पण, तोपर्यंत आपल्याकडे बरीच कामे आहेत ज्यात आपण स्वतःला व्यस्त ठेवू शकतो.—१ करिंथ. १५:५८.
आम्ही आमच्या प्रार्थनेत “निरंतर” तुमचा उल्लेख करतो ही खात्री बाळगा. (रोम. १:९) तुम्ही “सार्वकालिक जीवनासाठी आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या दयेची वाट पाहा, आणि आपणांस देवाच्या प्रीतिमध्ये राखा.”—यहू. २१.
आमच्या विश्वव्यापी बंधुसमाजाला ख्रिस्ती प्रेम!
आपले बांधव,
यहोवाच्या साक्षीदारांचे नियमन मंडळ