क्षेत्र सेवेत होणाऱ्या विरोधास तयार असा
१. ख्रिस्ती सेवक कशाची अपेक्षा करू शकतात, आणि यामुळे कोणते प्रश्न उद्भवतात?
१ येशूने आधीच भाकीत केले होते की त्याच्या अनुयायांचा छळ केला जाईल. (योहा. १५:२०) आपण जसजसे शेवटल्या दिवसांच्या अंतास जाऊ तसतसे सैतानही अधिक कातावेल, त्यामुळे आपला जास्त विरोध होण्याची आपण अपेक्षा करू शकतो. (प्रकटी. १२:१२) क्षेत्र सेवेत असताना आपण स्वतःचे संरक्षण कसे करू शकतो? मदतीची गरज असल्यास पोलिसांना बोलावणे योग्य ठरेल का? आपल्यावर हल्ला करणाऱ्यांच्या विरोधात आपण गुन्हा दाखल करू शकतो का?
२. शारीरिक हानीपासून आपले स्वतःचे संरक्षण करण्यासाठी ख्रिश्चनांनी योग्य ती पावले का उचलली पाहिजेत?
२ जीवन मौल्यवान आहे: यहोवा जीवनास मौल्यवान समजतो. त्यामुळे, इस्राएली लोकांना दिलेल्या नियमांत त्याने, जीवन व आरोग्य यांचे संरक्षण करणाऱ्या नियमांचाही समावेश केला. (निर्ग. २१:२२-२९) आज देवाचे सेवक मोशेच्या नियमांच्या अधीन नसले तरीसुद्धा देवाने दिलेल्या जीवनाच्या देणगीचा ते आदर करतात. म्हणून, विरोधकांकडून शारीरिक हानी होण्याची शक्यता असते तेव्हा ख्रिस्ती आपल्या संरक्षणासाठी काही पावले उचलतात.
३. क्षेत्र सेवेत धोकेदायक परिस्थिती उद्भवल्यास आपण काय केले पाहिजे?
३ स्वतःचे संरक्षण कसे कराल: अनेक प्रसंगी, क्रोधीत विरोधक जेव्हा येशूवर हल्ला करण्यासाठी आले तेव्हा तो तेथून पळून गेला. (लूक ४:२८-३०; योहा. ८:५९) त्याच प्रकारे, क्षेत्र सेवेत धोकेदायक परिस्थिती उद्भवते तेव्हा ते ठिकाण सोडून जाणे बुद्धिमानीचे ठरेल. आणि जोपर्यंत हा विरोध कमी होत नाही तोपर्यंत दुसऱ्या क्षेत्रात कार्य करणे उत्तम ठरेल.—मत्त. १०:२३.
४. विरोधक आपल्याला जबरदस्तीने पकडून ठेवण्याचा प्रयत्न करत असेल तर आपण काय करू शकतो?
४ पण एखादा विरोधक आपल्याला जबरदस्तीने पकडून ठेवण्याचा किंवा त्याच्या घरात कोंडून ठेवण्याचा प्रयत्न करत असेल तर काय? अशा वेळी प्रत्येक व्यक्तीने आपापल्या परिस्थितीनुसार कार्य करावे. याचा असा अर्थ होत नाही, की आपण निमूटपणे हे बेकायदेशीर कृत्य सहन करत राहावे. मारहाण होत असताना आपण मारहाण करणाऱ्या व्यक्तीला ढकलून किंवा तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करून स्वतःचा बचाव करू शकतो. लोक आपल्याला खूप मारतील किंवा मग आपले जीवन धोक्यात आहे असे जर एखाद्या बांधवाला वाटत असेल तर तो, स्वतःचे संरक्षण करण्यासाठी, विरोधकाचा मार चुकवू शकतो, विरोधकाचा हात धरू शकतो किंवा मग बचावाकरता विरोधकालाच एखादा फटका मारून त्याला थांबवू शकतो. “बायबलचा दृष्टिकोन: आत्म-संरक्षणासाठी प्रतिकार करणे केव्हा उचित ठरते?” हा जून २००८ च्या इंग्रजी सावध राहा! अंकातील पृष्ठे १० व ११ वरील लेख पाहा.
५. आपली सेवा पूर्ण करण्याकरता आपण सरकारी अधिकाऱ्यांकडून मिळणाऱ्या कोणत्या कायदेशीर तरतुदीचा फायदा घेऊ शकतो?
५ आपण पोलिसांना बोलवावे का? प्रेषित पौलाने त्याच्या सेवेदरम्यान, रोमी नियमांत असणाऱ्या तरतुदींचा पुरेपूर उपयोग केला. उदाहरणार्थ, विरोधकांनी त्याच्यावर खोटा आरोप लावला तेव्हा पौलाने, कैसराकडे न्याय मागण्याच्या कायद्याच्या सोयीचा फायदा घेतला. (प्रे. कृत्ये २५:११) आधी घडलेल्या एका प्रसंगी, पौलाने रोमी नागरिकांसाठी असलेल्या त्याच्या हक्कांचा उपयोग करून त्याच्यावरील संकट टाळले. (प्रे. कृत्ये २२:२५, २९) म्हणून एक ख्रिस्ती व्यक्तीसुद्धा आपल्या ‘हितासाठी देवाचे सेवक’ म्हणून सेवा करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांकडून संरक्षण मिळवू शकते.—रोम. १३:४.
६. आपल्याला स्वतःची सुटका करता येत नसलेल्या धोकेदायक परिस्थितीचा सामना करावा लागत असेल तर आपण काय केले पाहिजे?
६ वरील गोष्टींचा विचार करता, क्षेत्र सेवेत असताना आपल्याला अशा एखाद्या धोकेदायक परिस्थितीचा सामना करावा लागत असेल ज्यातून आपण आपली सुटका करू शकत नाही तर अशा वेळेस आपण त्वरित पोलिसांशी संपर्क साधला पाहिजे. काहींनी आपल्या मोबाईलमध्ये, जवळच्या पोलीस ठाण्याचा नंबर ठेवला आहे जेणेकरून, धोकेदायक प्रसंगाची चाहूल लागताच, मदतीसाठी ते फोन करू शकतात. क्षेत्र सेवा सभा संचालित करणाऱ्या बांधवाने, त्यांच्या सोबत क्षेत्रात काम करणाऱ्या इतर सर्वांवर लक्ष ठेवले पाहिजे.—१ पेत्र ५:२, ३.
७. क्षेत्र सेवेत आपल्यावर हल्ला होत असल्यास विरोधकांवर गुन्हा दाखल करणे उचित का ठरेल?
७ आपण गुन्हा दाखल करावा का? क्षेत्र सेवेदरम्यान, घरमालकाने आपल्यावर हल्ला केला तर आपण त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करावा का? काही बंधूभगिनी, हल्ला करणाऱ्यांवर गुन्हा दाखल केल्याने पुढे आपल्यावरच आणखी संकटे ओढवतील किंवा सत्यात नसलेल्या नातेवाईकांमध्ये व समाजामध्ये आपला मान-सन्मान कमी होईल या भीतीने कदाचित गुन्हा दाखल करणार नाहीत. पण, आपण जर हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला नाही तर, यहोवाच्या साक्षीदारांवर आपण बिनधास्त हल्ला करू शकतो, अशी या हल्लेखोरांची समजूत होण्याची शक्यता आहे का? आणि मग ते आपल्यावर आणखी हिंसकपणे हल्ला करण्यास निर्ढावतील. (उप. ८:११) विरोधकांवर गुन्हा दाखल करण्याद्वारे, आपण “सुवार्तेसंबंधीच्या प्रत्युत्तरात व समर्थनात” सहभागी होऊ शकतो आणि भविष्यात आपले बांधव त्या क्षेत्रात जेव्हा कार्य करतील तेव्हा त्यांचा विरोध कमी होऊ शकतो.—फिलिप्पै. १:७.
८. छळ होत असतानाही आपण निडरतेने प्रचार का करू शकतो?
८ विरोधक यशस्वी होणार नाहीत: आपल्याला विरोधाचा सामना करावा लागेल हे अपेक्षित असले तरी ख्रिश्चनांनी घाबरण्याचे कारण नाही. जगातील सर्वश्रेष्ठ व्यक्ती आपल्या पाठीशी आहे. (यश. ४१:१०; इब्री १३:६) सुवार्तेचा प्रचार थांबवण्यासाठी विरोधक करत असलेले प्रयत्न यहोवा यशस्वी होऊ देणार नाही. (यश. ५४:१७) हेसुद्धा लक्षात ठेवा की, विरोध असतानाही आपण सेवेत विश्वासूपणे धीर धरून ‘देवाच्या दृष्टीने जे उचित आहे’ ते करतो. विरोधकांकडून त्याच्या सेवकांच्या होणाऱ्या नुकसानीची तो भरपाईदेखील करणार आहे. (१ पेत्र २:१९, २०) यहोवाची संघटना आपल्याला मदत करते. क्षेत्र सेवेत आपल्यावर हल्ला होत असेल किंवा आपली क्षेत्र सेवा कायद्याच्या विरोधात आहे असे जर अधिकारी म्हणत असतील तर आपण लगेचच याबद्दल वडिलांना कळवले पाहिजे व वडील जन शाखा कार्यालयाशी संपर्क साधतील. या शेवटल्या कठीण दिवसांत, आपण सुवार्तेची घोषणा अविरत करत असताना योग्य ती सावधगिरी व समंजसपणा दाखवला पाहिजे!—प्रे. कृत्ये ५:४१, ४२.