सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य पुस्तकाचा अभ्यास
१ सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य या पुस्तकाचा अभ्यास आपण १८ एप्रिलच्या आठवड्यापासून मंडळीच्या बायबल अभ्यासादरम्यान करणार आहोत. येशू ख्रिस्ताचे जीवन व त्याची सेवा यांची आपण उजळणी करणार आहोत ही किती आनंदाची गोष्ट आहे, नाही का? आपण अभ्यास केलेल्या पुस्तकांच्या तुलनेत या पुस्तकाची रचना जरा वेगळी असल्यामुळे काही सूचना आपल्याला मदत करतील.
२ या पुस्तकात पृष्ठ क्रमांक नाहीत, त्यामुळे कोणत्या अध्यायांचा अभ्यास केला जाईल याचा आराखडा आमची राज्य सेवा यात छापण्यात येईल. यातील काही अध्याय मोठे असल्यामुळे एक-दोन आठवड्यांच्या अभ्यासासाठी त्यांची विभागणी केली जाईल. अभ्यास संचालक एका अनुभवी बांधवाला एक पूर्ण अध्याय (किंवा एक पूर्ण पोटमथळा) वाचायला सांगतील व त्यानंतर वाचलेल्या भागावर आधारित असलेले अध्यायाच्या शेवटी दिलेले प्रश्न विचारतील. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लागोपाठ असणाऱ्या परिच्छेदांत मिळतीलच असे नाही. अध्यायाच्या आधारावर असणारी उत्तरे थोडक्यात व मुद्दयाला धरून असावीत.
३ त्यानंतर, वेळ राहिल्यास अध्यायाच्या शेवटी दिलेली वचने आपण वाचू शकतो. उतारे मोठे असतात तेव्हा त्या वचनांची छोट्या भागात विभागणी करता येईल जेणेकरून वेगवेगळ्या प्रचारकांना वाचण्याची संधी मिळेल आणि मग वाचलेल्या वचनांवर बंधूभगिनी टिप्पणी देऊ शकतात. अभ्यास संचालकाने बनवलेल्या मुद्देसूद प्रश्नांमुळे प्रचारकांना, वाचलेली वचने पुस्तकातील माहितीशी कशी जुळतात त्याबद्दलची अर्थपूर्ण उत्तरे देता येतील. या सर्व प्रश्नोत्तरांच्या चर्चेमुळे तेथे उपस्थित असलेल्या लोकांचे लक्ष येशू ख्रिस्तावर, त्याच्या जीवनशैलीवर व त्याच्या शिकवणींवर केंद्रित झाले पाहिजे.
४ सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य या पुस्तकात येशूच्या जन्मापासून त्याच्या मृत्यूपर्यंत घडलेल्या घटनांची माहिती देण्यात आली आहे. या घटना कशा घडल्या असतील याची कल्पना करून त्या मनात रूजवल्याने आपल्याला त्यांचा विसर पडणार नाही. त्यामुळे, पुस्तकातील रंगीबेरंगी चित्रे पहा आणि ठिकाणांची नावे येतात तेव्हा या पुस्तकातील प्रस्तावनेनंतर असलेल्या नकाशात ते ठिकाण कोठे येते ते पाहा.
५ पहिल्या आठवड्यात या पुस्तकातील प्रस्तावनेची चर्चा केली जाईल. त्यानंतर एका पूर्ण पोटमथळ्याखालील सर्व परिच्छेद वाचून झाल्यानंतर, अभ्यास संचालक त्यांनी तयार केलेले प्रश्न विचारतील. प्रस्तावनेची चर्चा केल्यामुळे येणाऱ्या वर्षादरम्यान आपण पुढील अध्यायांची चर्चा करण्यास तयार होऊ. उपस्थित असलेले सर्व जितकी या पुस्तकाची तयारी करतील तितका हा अभ्यास लाभदायक ठरेल. अभ्यास संचालकाने खासकरून चांगली तयारी केली पाहिजे जेणेकरून मंडळीतील बंधुभगिनींना ते, सर्वकाळात होऊन गेलेला सर्वश्रेष्ठ मनुष्य, आपला प्रभू व तारणकर्ता येशू ख्रिस्त याच्याशी सुपरिचित होण्यास मदत करू शकतील.