तुमच्या मुलांना सेवक होण्याचे प्रशिक्षण द्या
१. स्तोत्र १४८:१२, १३ मध्ये पालकांना काय करण्यास आर्जवण्यात आले आहे?
१ यहोवा तरुणजनांस त्याची स्तुती करण्यास आमंत्रित करतो. (स्तो. १४८:१२, १३) म्हणून ख्रिस्ती पालक आपल्या मुलांना फक्तच बायबलचे सत्य आणि देवाचे नैतिक दर्जे शिकवत नाहीत तर सुवार्तेचे सेवक होण्यास देखील ते त्यांना प्रशिक्षण देतात. पण पालक हे प्रशिक्षण देण्याचे काम प्रगतीशीलपणे कसे साध्य करू शकतात?
२. पालकांच्या चांगल्या उदाहरणामुळे मुलांवर काय परिणाम होऊ शकतो?
२ उत्तम उदाहरण: गिदोन शास्त्याने त्याच्या ३०० सैनिकांना असे सांगितले: “मी करतो तसे करा.” (शास्ते ७:१७) मुले सहसा आपल्या पालकांचे निरीक्षण करून त्यांचे अनुकरण करतात. एका पित्याचे उदाहरण घ्या. त्यांना रात्रपाळी असते व ते खूप थकून जातात तरीपण शनिवारी सकाळी ते आपल्या मुलांना प्रचार कार्यात घेऊन जातात. प्रचार कार्याला आपल्या जीवनात प्रथम स्थान दिले पाहिजे हे ते आपल्या मुलांना शब्दाविना शिकवत आहेत. (मत्त. ६:३३) प्रार्थना, बायबल वाचन, सभांमध्ये उत्तरे देणे आणि प्रचारात सहभाग घेणे या निरनिराळ्या मार्गांनी तुम्ही यहोवाची उपासना आनंदाने करता हे तुमची मुले पाहतात का? तुम्ही एक परिपूर्ण उदाहरण साहजिकच मांडू शकणार नाही. पण तुम्ही यहोवाची उपासना जोमाने केली तर तुमची मुले देखील यहोवाची उपासना जोमाने करण्यास प्रोत्साहित होतील.—अनु. ६:६, ७; रोम. २:२१, २२.
३. पालक आपल्या मुलांना कोणती आध्यात्मिक ध्येये ठेवून ती साध्य करण्यास मदत करू शकतात?
३ प्रगतीशील ध्येये: पालक दिवसरात्र एक करून आपल्या मुलांना चालायला, बोलायला, तयार व्हायला आणि बऱ्याच गोष्टी शिकवतात. मुले जसजशी मोठी होतात तसतशी ती जीवनातील महत्त्वाचे टप्पे पार करतात. आणि मग पालक त्यांच्यासमोर नवीन ध्येये ठेवतात. पालक जर ख्रिस्ती असतील तर ते, आपल्या मुलांचे वय आणि त्यांची क्षमता आठवणीत ठेवून त्यांना आध्यात्मिक ध्येये ठेवण्यास व ती साध्य करण्यास मदत करतात. (१ करिंथ. ९:२६) तुम्ही तुमच्या मुलांना सभेत आपल्या शब्दांत उत्तरे द्यायला आणि ईश्वरशासित सेवा प्रशालेत स्वतःचे भाषण स्वतः तयार करायला शिकवता का? (स्तो. ३५:१८) वेगवेगळ्या प्रकारच्या सेवेत भाग घेण्यास तुम्ही त्यांना प्रशिक्षण देत आहात का? बाप्तिस्मा घेण्याचे आणि पूर्ण वेळेची सेवा करण्याचे ध्येय तुम्ही त्यांच्या समोर ठेवत आहात का? आनंदाने व उत्साहाने पूर्ण वेळेचे सुवार्तिक असलेल्या बंधुभगिनींच्या सहवासात तुम्ही त्यांना राहू देता का जेणेकरून त्यांना प्रोत्साहन मिळू शकेल?—नीति. १३:२०.
४. कोवळ्या वयातच मुलांना सेवक होण्याचे प्रशिक्षण देणाऱ्या पालकांचा त्यांच्या मुलांना फायदा कसा होतो?
४ स्तोत्रकर्त्याने लिहिले: “हे देवा, माझ्या तरुणपणापासून तू मला शिकवित आला आहेस; आणि मी आजपर्यंत तुझी अद्भुत कृत्ये वर्णिली आहेत.” (स्तो. ७१:१७) कोवळ्या वयातच आपल्या मुलांना प्रचार कार्य करण्याचे अर्थात एक सेवक बनण्याचे प्रशिक्षण द्या. आध्यात्मिक पाया घालण्यासाठी तुम्ही केलेली मदत, त्यांना त्यांच्या वृद्धपणीही नक्कीच फायदेकारक ठरेल.—नीति. २२:६.