आपल्या कुटुंबांना मदत करा
१. दर आठवडी येणाऱ्या शब्बाथाच्या दिवसामुळे इस्राएली कुटुंबांना कशा प्रकारे फायदा होत असे?
१ शब्बाथाचा दिवस पाळायची योजना यहोवाने बनवली होती. यामुळे कुटुंबांना फायदा व्हायचा. इस्राएली कुटुंबे त्या दिवशी आपल्या कामाधंद्यापासून आराम घेत. यामुळे त्यांना, यहोवाच्या चांगुलपणावर व त्याच्याबरोबर असलेल्या त्यांच्या नातेसंबंधावर मनन करायला वेळ मिळत असे. त्या दिवशी पालक आपल्या मुलांच्या मनांवर नियमशास्त्रातील गोष्टी बिंबवत असत. (अनु. ६:६, ७) शब्बाथामुळे यहोवाच्या लोकांना दर आठवडी, यहोवाच्या उपासनेच्या संबंधाने असलेल्या गोष्टींवर आपले लक्ष केंद्रित करण्यास वेळ मिळत असे.
२. शब्बाथ पाळायच्या नियमावरून आपण यहोवाबद्दल काय शिकतो?
२ आज यहोवा कुटुंबांकडून शब्बाथ पाळायची अपेक्षा करत नाही. तरीपण, शब्बाथ पाळायच्या नियमावरून आपण देवाबद्दल काहीतरी शिकतो. हेच शिकतो, की त्याला पहिल्यापासून आपल्या लोकांच्या आध्यात्मिक कल्याणाची काळजी होती आणि आजही आहे. (यश. ४८:१७, १८) कौटुंबिक उपासनेची संध्याकाळ याद्वारे तो आज त्याची काळजी व्यक्त करतो.
३. कौटुंबिक उपासनेच्या संध्याकाळचा उद्देश काय आहे?
३ कौटुंबिक उपासना संध्याकाळचा उद्देश: जानेवारी २००९ पासून मंडळीचा पुस्तक अभ्यास, ईश्वरशासित प्रशाला व सेवा सभा ज्या दिवशी होतात त्याच दिवशी होऊ लागला. हा बदल यासाठी करण्यात आला जेणेकरून कुटुंबांना, आठवड्यातली एक ठराविक संध्याकाळ कौटुंबिक उपासनेसाठी ठेवून यहोवाबरोबरचा आपला नातेसंबंध मजबूत करता येईल. प्रत्येक कुटुंबाला त्यांचा कौटुंबिक अभ्यास, बायबल अभ्यास होणाऱ्या दिवशी करण्याचे उत्तेजन देण्यात आले. आणि जमल्यास या वेळेत ते, कुटुंबाच्या गरजेनुसार निवांतपणे, बायबल चर्चा व अभ्यास करू शकतात.
४. कुटुंबांनी, उपासनेची संध्याकाळ फक्त एक तासच ठेवावी का? समजावून सांगा.
४ मंडळीच्या पुस्तक अभ्यासाला जाण्याकरता आपल्याला तयार व्हायला लागायचे, प्रवास करावा लागायचा. आणि पुष्कळ बंधुभगिनींची, या सभेला उपस्थित राहण्याकरता फक्त एक तासच नव्हे तर संपूर्ण संध्याकाळच जायची. पण आपल्या सभांच्या आराखड्यात बदल झाल्यामुळे आता आपण या संध्याकाळी कुटुंब मिळून यहोवाची उपासना करू शकतो. त्यामुळे, आपल्या कौटुंबिक उपासनेची संध्याकाळ आपण फक्त एक तासापुरतीच मर्यादित ठेवू नये. तर, आपल्या कुटुंबाच्या गरजा, मर्यादा लक्षात ठेवून त्यानुसार वेळ ठरवावी.
५. संपूर्ण संध्याकाळच कौटुंबिक चर्चेत घालवावी का? समजावून सांगा.
५ संपूर्ण संध्याकाळच कौटुंबिक चर्चेत घालवावी का? पती-पत्नी आणि मुले असलेली कुटुंबे बायबल आधारित विषयांवर एकत्र मिळून चर्चा करतात तेव्हा ते एकमेकांना उत्तेजन देतात. (रोम. १:१२) यामुळे कुटुंबातील सदस्य एकमेकांच्या अधिक जवळ येतात. यास्तव, कौटुंबिक उपासनेच्या संध्याकाळी बायबल आधारित चर्चांना अधिक महत्त्व देण्याची गरज आहे. पण कुटुंबातील प्रत्येक सदस्यसुद्धा वैयक्तिक अभ्यासात बराच वेळ खर्च करू शकतो. जसे की, कुटुंब मिळून चर्चा झाल्यावर, कुटुंबातील सदस्य कदाचित त्यांचे स्वतःचे वाचन वेगळे करू शकतात, सभांची तयारी करायची राहिली असेल तर ते ती पूर्ण करू शकतात किंवा मग नियतकालिकांचे वाचन करू शकतात. काही कुटुंबांनी, कौटुंबिक उपासनेच्या दिवशी संपूर्ण संध्याकाळी घरात टीव्ही मुळीच लावायचा नाही, असे ठरवले आहे.
६. कुटुंब मिळून चर्चा कशी करायची?
६ कुटुंब मिळून चर्चा कशी करायची? चर्चा म्हटले, की नेहमीच प्रश्न व उत्तरे असे नसावे. कौटुंबिक उपासनेची संध्याकाळ जिवंत व रोचक बनवण्याकरता, पुष्कळ कुटुंबांनी आपल्या आठवड्यादरम्यानच्या सभेनुसार कार्यक्रम बनवला आहे. त्यांनी ही चर्चा अनेक भागात विभागली आहे आणि वेगवेगळ्या मार्गांनी ते ती हाताळतात. जसे की, ते कदाचित एकत्र मिळून बायबल वाचतील, सभांतील कुठल्या तरी एका भागाची तयारी करतील आणि सेवेत कसे बोलायचे याबद्दलचे सराव करतील. ६ व्या पानावर काही गोष्टी सुचवण्यात आल्या आहेत.
७. पालकांनी कौटुंबिक उपासनेच्या वेळचे वातावरण कसे ठेवायचा प्रयत्न केला पाहिजे?
७ पालकांनी कौटुंबिक उपासनेच्या वेळचे वातावरण कसे ठेवायचा प्रयत्न केला पाहिजे? उपासनेच्या वेळचे वातावरण प्रेमळ व खेळी-मेळीचे असेल तर सर्वांना बरेच काही शिकता येईल. हवामान चांगले असेल तर तुम्ही घराच्या बाहेर किंवा बागेतही बसू शकता. गरज असेल तर अधूनमधून तुम्ही थोडी सुट्टीही घेऊ शकता. काही कुटुंबे तर, उपासना झाल्यावर अल्पोपहारही ठेवतात. कौटुंबिक उपासनेच्या वेळेचा उपयोग पालक कदाचित, आपल्या मुलांना रागावण्यासाठी किंवा त्यांचे ताडन करण्यासाठी वापरणार नाहीत. पण, आपल्या मुलांमध्ये त्यांना एखादी विशिष्ट प्रवृत्ती किंवा समस्या दिसत असेल तर ते या उपासनेच्या वेळी त्याची चर्चा करतील. आणि, मुलांपैकी एखाद्या मुलाची काही विशिष्ट खोड असेल तर पालकांनी या नाजूक विषयावर कौटुंबिक उपासनेच्या वेळी सर्वांसमक्ष बोलून त्याला लाजवण्याऐवजी त्यांनी त्याच्याशी एकांतात बोलावे. कौटुंबिक उपासनेची संध्याकाळ, रटाळ, कंटाळवाणी नसावी तर आपण उपासना करत असलेल्या देवाप्रमाणे आनंदी असावी.—१ करिंथ. १४:३३, NW.
८, ९. कुटुंब प्रमुखांनी कोणती तयारी केली पाहिजे?
८ कुटुंब प्रमुख तयारी कशी करू शकतात? कौटुंबिक उपासनेच्या संध्याकाळी कोणत्या विषयावर चर्चा करण्याची आवश्यकता आहे व ती कशा प्रकारे केल्यास अधिक उपयोगी ठरू शकेल, यावर कुटुंब प्रमुखांनी आधीच विचार केल्यास, कुटुंबाला त्याचा जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो. (नीति. २१:५) याबाबतीत पती आपल्या पत्नीचेही विचार घेऊ शकतो. (नीति. १५:२२) कुटुंब प्रमुखहो, तुम्ही तुमच्या मुलांनाही अधून-मधून विचारू शकता, नाही का? असे केल्यास तुम्हाला तुमच्या मुलांच्या आवडी-निवडी, त्यांना असलेल्या चिंता अधिक चांगल्याप्रकारे समजू शकतील.
९ बहुतेक आठवडी, कुटुंब प्रमुखांना कौटुंबिक उपासनेच्या संध्याकाळची तयारी करण्यात खूप वेळ घालवावा लागणार नाही. कदाचित, कुटुंबातल्या सदस्यांना दर आठवड्याचा बायबल वाचनाचा कार्यक्रम आवडेल; त्यामुळे कुटुंब प्रमुखाला प्रत्येक वेळी पूर्णपणे नवनवीन कार्यक्रम बनवण्याची गरज पडणार नाही. तर एक अभ्यास संपल्यानंतर ते लगेचच पुढच्या कार्यक्रमाचा आराखडा तयार करू शकतात; कारण कुटुंबातील सदस्यांना कोणत्या बाबतीत आध्यात्मिक मदत देण्याची आवश्यकता आहे हे त्यांना माहीत असते. काही कुटुंब प्रमुख पुढच्या उपासना कार्यक्रमाचा एक कच्चा आराखडा तयार करून तो घरातील सर्वांना दिसेल अशा ठिकाणी, जसे की फ्रिजवर लावून ठेवू शकतात. यामुळे, कुटुंबातील सदस्यांमध्ये उत्सुकता वाढू शकते आणि गरज असल्यास त्यांना याची तयारी करायलाही वेळ मिळेल.
१०. एकटे राहणारे बंधू किंवा भगिनी कौटुंबिक उपासनेच्या संध्याकाळी काय करू शकतात?
१० मी जर अविवाहित किंवा सत्यात एकटाच असेन तर? एकटेच राहत असलेले बंधू किंवा भगिनी कौटुंबिक उपासनेच्या संध्याकाळी स्वतःचा वैयक्तिक अभ्यास करू शकतात. या वैयक्तिक अभ्यासात, बायबल वाचन, सभांची तयारी व टेहळणी बुरूज यांतील लेख वाचणे, यांचा समावेश होतो. काही प्रचारक याव्यतिरिक्त एक प्रकल्प हाती घेतात; जसे की, प्रकाशित झालेले कुठले तरी एखादे नवीन पुस्तक वाचणे किंवा मग एखाद्या विषयावर आपल्या प्रकाशनांमध्ये अतिरिक्त माहिती मिळवणे, वगैरे. कधीकधी, ते दुसऱ्या एखाद्या प्रचारकाला किंवा कुटुंबाला त्यांच्याबरोबर उपासनेसाठी बोलवू शकतात. या बायबल आधारित चर्चांमुळे दोघांचीही उभारणी होऊ शकते.
११, १२. नियमितरीत्या कौटुंबिक उपासना केल्याने कोणते फायदे मिळतात?
११ कौटुंबिक उपासना संध्याकाळचा नियमित उपयोग केल्याने कोणते फायदे होतात? जे अगदी मनापासून खरी उपासना करतात ते यहोवाच्या जवळ येतात. तसेच, एकत्र मिळून उपासना करणाऱ्या कुटुंबातील सदस्यांमधील बंधन आणखी मजबूत होते. एका विवाहित जोडप्याने त्यांना मिळालेल्या आशीर्वादांविषयी असे म्हटले: “आम्हाला मुलं नाहीत, तरीपण आम्ही कौटुंबिक उपासनेच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. आम्ही दोघं एकमेकांच्या आणि आमच्या स्वर्गीय पित्याच्या जवळ येत असल्याचं आम्हाला जाणवू लागलं आहे. कौटुंबिक उपासनेच्या दिवशी सकाळी आम्ही एकमेकांना म्हणतो: ‘आज काय आहे बरं? कौटुंबिक उपासनेचा दिवस!”
१२ कौटुंबिक उपासनेसाठी एक संध्याकाळ बाजूला ठेवल्यामुळे, कामात व्यस्त असलेल्या कुटुंबांनाही फायदा होतो. दोन मुले असलेली व स्वतः सामान्य पायनियरींग करणारी एक एकटी आई असे लिहिते: “पूर्वी, आमच्या कुटुंबात कौटुंबिक अभ्यास असा व्हायचा नाही. मी दमून जायचे त्यामुळे कधी वेळ मिळेल तेव्हा अचानक व्हायचा, आणि नियमित पण व्हायचा नाही. कुटुंबाला सांभाळत सांभाळत कौटुंबिक अभ्यास कसा करायचा तेच मला समजायचं नाही. त्यामुळे कौटुंबिक उपासनेसाठी खास एका दिवसाची व्यवस्था केल्याबद्दल तुमचे आभार मानण्याकरता मी हे पत्र लिहित आहे. आता आमचा अगदी नियमाने कौटुंबिक अभ्यास होतो आणि आम्हाला त्याचे फायदेही जाणवू लागले आहेत.”
१३. कौटुंबिक उपासनेबद्दल यहोवाने केलेल्या योजनेचा आपल्या कुटुंबाला किती फायदा होईल हे कशावर अवलंबून आहे?
१३ शब्बाथाप्रमाणे, कौटुंबिक उपासना संध्याकाळ ही आपल्या स्वर्गीय पित्याकडून आपल्याला मिळालेली देणगी आहे. या देणगीचा कुटुंबांना फायदा होऊ शकतो. (याको. १:१७) इस्राएली कुटुंबे शब्बाथाचा जितका अधिक उपयोग करीत तितके त्यांना यहोवाबरोबरचा आपला नातेसंबंध वाढवता आला. तसेच, कौटुंबिक उपासनेसाठी आपल्याला देण्यात आलेल्या वेळेचा आपण जितका उपयोग करू तितका आपल्या कुटुंबाला त्याचा फायदा होऊ शकेल. (२ करिंथ. ९:६; गलती. ६:७, ८; कलस्सै. ३:२३, २४) यहोवाने केलेल्या या योजनेचा तुम्ही पुरेपूर फायदा करून घेतलात तर तुमचे कुटुंबही स्तोत्रकर्त्याप्रमाणे असे म्हणेल: “माझ्याविषयी म्हटले तर देवाजवळ जाणे ह्यातच माझे कल्याण आहे; मी प्रभु परमेश्वराला आपले आश्रयस्थान केले आहे.”—स्तो. ७३:२८.
[५ पानांवरील सिंक्षिप्त आशय]
कौटुंबिक उपासनेची संध्याकाळ, रटाळ, कंटाळवाणी नसावी तर आपण उपासना करत असलेल्या देवाप्रमाणे आनंदी असावी
[६ पानांवरील चौकट]
जपून ठेवा
कौटुंबिक उपासना संध्याकाळकरता काही सूचना
बायबल:
• आठवड्याच्या बायबल वाचनातील एखादा भाग एकत्र मिळून वाचा. बायबल वाचन एखादा अहवाल असेल तर, कुटुंबातील एक सदस्य निवेदक म्हणून वाचन करू शकतो आणि बाकीचे त्या अहवालातील वेगवेगळ्या पात्रांचे संवाद वाचू शकतात.
• बायबल वाचनातील एखाद्या भागाचे नाट्य रुपांतर करा.
• कुटुंबातील प्रत्येक सदस्याला आठवड्यासाठी ठरवलेले बायबल अध्याय आधीच वाचायला व वाचलेल्या भागावर त्याला एक किंवा दोन प्रश्न तयार करायला सांगा. आणि सर्वांच्या प्रश्नांचे एकत्र मिळून संशोधन करा.
• दर आठवडी, बायबल वचन लिहिलेले एक कार्ड बनवा आणि ते तोंडपाठ करून व समजावून सांगा. असे अनेक कार्ड बनवा आणि मग आठवड्यातून एकदा, तुम्ही किती वचने पाठ केली त्याची उजळणी करा.
• तुमच्याकडे बायबल वाचनाचे रेकॉर्डींग असेल तर ते लावा आणि तुम्ही तुमच्या बायबलमधून ते पाहा.
सभा:
• सभांच्या एका भागाची तयारी करा.
• येणाऱ्या आठवड्यासाठी असलेल्या राज्य गीतांचा सराव करा.
• कुटुंबातील कोणाला ईश्वरशासित सेवा प्रशालेत भाषण असेल किंवा सेवा सभेत प्रात्यक्षिक करायचे असेल तर ते कसे सादर करता येईल त्याबद्दल कुटुंबातील इतरांनाही विचारा, किंवा मग कुटुंबासमोर त्याची तालीम करा.
कुटुंबाच्या गरजा:
• तरुणांचे प्रश्न पुस्तकातील माहितीवर चर्चा करा.
• शाळेत उद्भवू शकणारी एखादी परिस्थिती कशी हाताळायची त्याचा सराव करा.
• एका सरावात, पालक मुलांची भूमिका करू शकतात आणि मुले पालकांची भूमिका वठवू शकतात. मुले एखाद्या विषयावर संशोधन करतील आणि मग पालकांबरोबर तर्क करतील.
सेवा:
• शनिवार-रविवारच्या दिवशी सेवेच्या सादरतांचा सराव करा.
• स्मारक विधीच्या काळात किंवा सुटीत क्षेत्र सेवेत अधिक भाग घेता यावा म्हणून कुटुंबाबरोबर काही ध्येयांची चर्चा करा.
• क्षेत्रात कोणी वेगळेच प्रश्न विचारत असेल तर त्याचे उत्तर कसे द्यायचे त्यावर संशोधन करण्यास कुटुंबातील प्रत्येक सदस्याला काही मिनिटे द्या आणि मग त्याचा सराव करा.
अतिरिक्त सूचना:
• नवीन नियतकालिकातील एखादा लेख एकत्र मिळून वाचा.
• कुटुंबातील प्रत्येक सदस्याला, त्याला किंवा तिला जास्त आवडलेला नियतकालिकातील एखादा लेख आधीच वाचायला सांगा आणि मग त्यावर माहिती द्यायला सांगा.
• अधूनमधून, एखाद्या प्रचारकाला किंवा जोडप्याला तुमच्या कौटुंबिक उपासनेच्या संध्याकाळी बोलवा आणि क्षेत्र सेवेत त्यांना आलेले अनुभव सांगण्यास किंवा मग ते सत्यात कसे आले तो अनुभव सांगण्यास सांगा.
• आपल्या संस्थेने बनवलेला एखादा व्डिडिओ पाहा आणि त्यावर चर्चा करा.
• तीन महिन्यातून निघणाऱ्या टेहळणी बुरूज मधले “आपल्या मुलांना शिकवा” या सदराची चर्चा करा.
• आपल्या नियतकालिकात येणारे अनुभव किंवा गेल्या प्रांतीय अधिवेशनात प्रकाशित करण्यात आलेल्या नवीन पुस्तकातील किंवा माहितीपत्रकातील एखादा भाग वाचून त्यावर चर्चा करा.
• अधिवेशनाला किंवा संमेलनाला जाऊन आल्यावर, कार्यक्रमातील ठळक मुद्द्यांची उजळणी करा.
• निसर्गाचे निरीक्षण करा आणि निसर्गात दिसणाऱ्या गोष्टी आपल्याला यहोवाबद्दल काय शिकवतात त्यांची चर्चा करा.
• कुटुंब मिळून एक प्रकल्प घ्या; जसे की, बायबलमध्ये उल्लेखण्यात आलेल्या वास्तुची प्रतिकृती तयार करा, नकाशा काढा, तक्ता बनवा.