प्रगतीशील बायबल अभ्यास संचालित करणे—विद्यार्थ्यांना तयारी करण्यास शिकवणे
जो विद्यार्थी, अभ्यासाच्या आधी पाठाचे वाचन करतो, उत्तरे अधोरेखीत करतो आणि स्वतःच्या शब्दांत उत्तरे कशी द्यायची त्याचा विचार करतो तो सहसा लवकर आध्यात्मिक प्रगती करतो. यास्तव, तुम्ही एखाद्याबरोबर नियमित बायबल अभ्यास सुरू केला असेल तर, अभ्यासाची तयारी कशी करता येईल हे दाखवण्यासाठी त्याच्याबरोबर मिळून एका पाठाची तयारी करा. बहुतेक विद्यार्थ्यांसोबत तुम्ही एका संपूर्ण अध्यायाचा किंवा संपूर्ण पाठाचा एकत्र अभ्यास करू शकता.
२ उत्तरे अधोरेखीत करणे आणि टिपणी लिहिणे: छापील प्रश्नांची थेट उत्तरे कशी शोधायची ते विद्यार्थ्याला समजावून सांगा. तुम्ही ज्यात, फक्त मुख्य शब्द, वाक्ये अधोरेखीत केली आहेत ते तुमचे अभ्यासाचे प्रकाशन त्याला दाखवा. मग, तुम्ही एकत्र अभ्यास करता तेव्हा तो तुमचे अनुकरण करून पाहील, आपल्या व्यक्तिगत प्रतीवर त्याला उत्तर आठवण्याकरता मोजकेच शब्द किंवा वाक्ये तो अधोरेखीत करेल. (लूक ६:४०) यानंतर त्याला स्वतःच्या शब्दांत उत्तर देण्यास सांगा. यामुळे, त्याला माहिती कितपत समजली आहे हे तुम्हाला कळेल.
३ अभ्यासाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने, ज्या शास्त्रवचनांचा केवळ उल्लेख करण्यात आला आहे अशा वचनांचे बारकाईने परीक्षण करणे महत्त्वाचे आहे. (प्रे. कृत्ये १७:११) प्रत्येक उल्लेखित शास्त्रवचन परिच्छेदातील एखाद्या मुद्द्याला कसे लागू होते, हे पाहायला त्याला मदत करा. तो ज्या प्रकाशनाचा अभ्यास करत आहे, त्या प्रकाशनाच्या समासात तो संक्षिप्त टिपणी कशी लिहू शकतो ते त्याला दाखवा. तो जे काही शिकत आहे ते बायबलवर आधारित आहे, या वस्तुस्थितीवर सतत जोर द्या. अभ्यासाच्या वेळी उत्तरे देताना शास्त्रवचनांचा मुबलकपणे उपयोग करण्याचे उत्तेजन त्याला द्या.
४ ओझरती नजर आणि उजळणी: अभ्यास साहित्याची सविस्तर तयारी करण्याआधी विद्यार्थ्याने त्या पाठावर किंवा अध्यायावर ओझरती नजर टाकल्यास त्याला मदत होईल. पाठाचे शीर्षक, पोटमथळे, चित्रे, चित्रांखालील माहिती या सर्वांवर एक नजर टाकण्यास विद्यार्थ्याला सांगा. मग तयारीच्या शेवटी, धड्यातील मुख्य मुद्द्यांची आणि उजळणी प्रश्न असतील तर त्या प्रश्नांची उजळणी केल्याने देखील त्याला फायदा होऊ शकेल. यामुळे त्याला ही माहिती लक्षात ठेवण्यास मदत होईल.
५ अभ्यासाची चांगली तयारी करण्यास विद्यार्थ्याला प्रशिक्षण दिल्यामुळे तो, मंडळीच्या सभेत अर्थपूर्ण उत्तरे देऊ शकेल. शिवाय, त्याचा बायबल अभ्यास संपल्यावरही तो व्यक्तिगत अभ्यासाची सवय विकसित करू शकेल.