प्रश्न पेटी
◼ कोणत्या व्यावहारिक मार्गांनी आपण पायनियरांना मदत करू शकतो?
सन २००९ च्या सेवा वर्षादरम्यान जगभरात जवळजवळ ८,००,००० बंधू व भगिनींनी सामान्य आणि खास पायनियर म्हणून सेवा केली. राज्याचा संदेश सांगण्याकरता पूर्ण वेळेच्या या सेवकांनी आपल्या वेळेचे, आपल्या शक्तीचे व साधनसंपत्तीचे प्रथम फळ अर्पण केले. (नीति. ३:९) त्यांचे प्रयत्न पाहून यहोवा किती खूश झाला असेल! कोणत्या मार्गांनी आपण यहोवासारखा दृष्टिकोन ठेवू शकतो व पायनियरांना त्यांच्या सेवेत आनंद मिळवण्यास व धीर धरण्यास मदत करू शकतो?
आपल्या विचारपूर्वक शब्दांमुळे पायनियरांना त्यांची सेवा नियमितपणे करण्यास प्रोत्साहन मिळेल. (नीति. २५:११) त्यांच्यासोबत सेवेत काम करण्यासाठी आपण आपल्या आठवड्याच्या आराखड्यात फेरफार करू शकतो का? जर आपण त्यांच्याबरोबर काम करणार असू आणि त्यांच्याकडे व आपल्याकडे गाडी असेल तर आपण त्यांना आपल्या गाडीत घेऊ शकतो किंवा मग त्यांचेही गाडी भाडे देऊ शकतो. (१ करिंथ. १३:५; फिलिप्पै. २:४) त्यांचा पाहुणचार करून आणि अधूनमधून त्यांना आपल्या घरी जेवायला बोलावून आपण आपला प्रेमळ आधार व्यक्त करू शकतो.—१ पेत्र ४:८, ९.
जे राज्याला आपल्या जीवनात पहिले स्थान देतात त्यांना बायबल ही खात्री देते की यहोवा त्यांच्या गरजा पूर्ण करेल. (स्तो. ३७:२५; मत्त. ६:३३) एक मार्ग आहे ज्याद्वारे तो असे करतो. तो म्हणजे, प्रेमळ ख्रिस्ती बंधूसमाजाद्वारे तो आपल्या गरजा पूर्ण करतो. (१ योहा. ३:१६-१८) दुसऱ्यांनी त्यांची आर्थिक जबाबदारी घ्यावी अशी अपेक्षा पायनियर करत नाहीत. आणि जेव्हा त्यांना कशाची गरज असते तेव्हा ते कदाचित स्वतःहून तसे सांगणार नाहीत. तरीसुद्धा, जागरूक व तत्पर राहून आपण काही व्यावहारिक मार्गांनी विश्वासू पायनियरांची ‘गरज भागवू’ शकतो.—२ करिंथ. ८:१४, १५.
पहिल्या शतकातील किंख्रिया मंडळीतील फीबी नावाची एक आवेशी प्रचारक रोमला गेली, तेव्हा रोममधील बांधवांना पौलाने असे प्रोत्साहन दिले: “तुम्ही पवित्र जनांस योग्य असा तिचा प्रभूमध्ये स्वीकार करावा. आणि ज्या ज्या कामात तिला तुमची गरज लागेल त्यात तिला साहाय्य करावे.” (रोम. १६:१, २) आपल्या मंडळीत सामान्य व खास पायनियर यानात्याने जे राज्याची सुवार्ता निरंतर घोषित करतात त्यांना आपण असाच प्रेमळ आधार देऊ शकतो.—प्रे. कृत्ये ५:४२.