“तू एक चांगला पायनियर बनशील!”
१. एका बहिणीच्या आपल्या पायनियर सेवेबद्दल काय भावना आहेत?
१ “पायनियरिंगमुळे मला यहोवासोबत एक जवळचा नातेसंबंध टिकवून ठेवायला मदत होते. यहोवानं आणि त्याच्या पुत्रानं आपल्यासाठी जे काही केलं त्याबद्दल माझी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मला जी संधी मिळाली आहे ती संधी एक बहुमान आहे, असं मी समजते. यामुळे मला माझ्या जीवनात आनंद व समाधान मिळालं आहे,” असे मेरी म्हणतात. भगिनी मेरी यांनी निःस्वार्थपणे, भारताच्या विविध भागांत पायनियर म्हणून सेवा केली आहे. पूर्णवेळेच्या सेवेत असलेल्यांना किती आशीर्वाद मिळतात हे लक्षात घेऊन कोणीतरी कदाचित तुम्हालाही, “तू एक चांगला पायनियर बनशील!” असे म्हणून प्रोत्साहन दिले असेल.
२. आध्यात्मिक कार्यांमुळे खरे समाधान मिळते असे का म्हणता येईल ते स्पष्ट करा.
२ जीवनाचा समाधानकारक मार्ग: आपला आदर्श असलेल्या येशूला त्याच्या पित्याची इच्छा पूर्ण करण्यात नेहमी आनंद वाटायचा. (योहा. ४:३४) त्यामुळेच स्वतःच्या अनुभवावरून त्याने त्याच्या शिष्यांना असे शिकवले की यहोवाच्या उपासनेशी संबंधित कार्य केल्यामुळे खरे समाधान मिळते. यहोवाची कृपापसंती मिळेल अशी कार्ये करण्यात स्वतःला झोकून दिल्याने आपले जीवन समाधानी बनते. शिवाय, इतरांच्या मदतीसाठी आपला वेळ, शक्ती व साधनसंपत्ती आपण जितकी खर्च करू तितकाच आपला आनंद वाढत जाईल.—प्रे. कृत्ये २०:३१, ३५.
३. सेवेसाठी जास्त वेळ दिल्याने आपल्याला कोणता आनंद मिळू शकतो?
३ आपण सेवेत जितक्या जास्त प्रमाणात वेळ घालवतो तितक्या जास्त प्रमाणात बायबल अभ्यास सुरू करण्याचा व चालवण्याचा आनंद अनुभवण्याच्या संधी आपल्याला मिळतात. आपल्या क्षेत्रातील बहुतेक लोक थंड प्रतिसाद देत असले तरीही सेवेत आपण जसजसा अनुभव व कौशल्य मिळवतो तसतसे आपले क्षेत्र आपल्याला अधिक फलदायी वाटू लागण्याची शक्यता आहे. किमान वर्षभर पायनियरिंग केल्यानंतर पायनियर सेवा प्रशालेतून पायनियरांना भरपूर मार्गदर्शन मिळते. या बहुमोल प्रशिक्षणाचा उपयोग ते आपल्या सेवेत करू शकतात. (२ तीम. २:१५) आपण धीराने प्रयत्न करत राहिल्यास आपण पेरलेले सत्याचे बी भविष्यात फलदायी ठरू शकते.—उप. ११:६.
४. ज्यांचे मूलभूत शिक्षण लवकरच पूर्ण होणार आहे असे तरुण कशाचा विचार करू शकतात?
४ तरुणांनो: तुमचे मूलभूत शिक्षण पूर्ण करत असताना तुम्ही आपल्या भविष्याचा गांभीर्याने विचार केला आहे का? सध्या तुमचा बराच वेळ अभ्यासात जात असेल. पण, शिक्षण संपल्यानंतर तुम्ही तुमचा रिकामा वेळ कसा घालवणार? एखाद्या करिअरमध्ये आपली तरुणपणची सर्व शक्ती पणाला लावण्यापेक्षा सामान्य पायनियर बनण्याबद्दल प्रार्थनापूर्वक विचार करण्यास काय हरकत आहे? पायनियरिंग केल्यामुळे, वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना साक्ष देणे, वैयक्तिक कमतरतांवर मात करणे, स्वतःला शिस्त लावणे, आणि एक चांगला शिक्षक बनणे अशी अनेक कौशल्ये तुम्ही आत्मसात करू शकता. या सर्व कौशल्यांचा फायदा तुम्हाला आयुष्यभर होईल.
५. पालक व मंडळीतील सर्वजण पायनियरिंग करण्याचे उत्तेजन कसे देऊ शकतात?
५ पालकांनो, आपल्या मुलांचे लक्ष पूर्णवेळेच्या सेवेकडे वळवण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात का? राज्य हिताच्या गोष्टी प्रथमस्थानी ठेवण्यास त्यांना तुमच्या बोलण्यामुळे व सकारात्मक उदाहरणामुळे बरीच मदत मिळेल. (मत्त. ६:३३) बारावी झाल्यानंतर पायनियरिंग सुरू करणारा संजय नावाचा बांधव म्हणतो: “पायनियरिंग हा जीवनात समाधान मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे असं माझ्या आईवडिलांना नेहमी वाटायचं.” मंडळीतील सर्वच जण आपल्या बोलण्याद्वारे व मदत देण्याद्वारे पायनियर सेवेला प्रोत्साहन देऊ शकतात. स्पेन येथील होसे म्हणतो: “माझ्या मंडळीतील सर्वांना पायनियरिंग करणं तरुणांसाठी सर्वात उत्तम करियर आहे असं वाटायचं. पायनियर सेवेबद्दल त्यांचं उत्तेजनपर बोलणं व त्यांना असलेली कदर यासोबतच त्यांनी पुरवलेली व्यावहारिक मदत यामुळे पायनियरिंग सुरू करणं मला सोपं गेलं.”
६. सध्या जर आपल्या मनात पायनियरिंग करायची इच्छा नसेल तर आपण काय करू शकतो?
६ अडथळे पार करणे: ‘मला पायनियरिंग करायची इच्छा नाही,’ असे तुमचे म्हणणे असल्यास काय? सुरुवातीला तुम्हालाही असेच वाटले असेल तर यहोवाला हे प्रार्थनेत सांगा. ‘मी पायनियरिंग करू शकतो की नाही हे मला ठरवता येत नाहीए, पण मला तुझं मन आनंदित करायचं आहे,’ असे तुम्ही यहोवाला सांगू शकता. (स्तो. ६२:८; नीति. २३:२६) त्यानंतर मग त्याच्या वचनातून व संघटनेकडून त्याचे मार्गदर्शन मिळवा. अनेक सामान्य पायनियरांनी आधी सहायक पायनियरिंग करण्याद्वारे पायनियरिंगचा “अनुभव” घेऊन पाहिला, त्यात मिळणाऱ्या आनंदाचा उपभोग घेतल्यानंतर त्यांनी पूर्णवेळेच्या सेवेत करियर करायचे ठरवले.—स्तो. ३४:८.
७. आपण महिन्याला ७० तास पूर्ण करू शकतो का अशी जर तुमची शंका असेल तर तुम्ही काय करू शकता?
७ महिन्याला ७० तास तुम्ही पूर्ण करू शकणार नाही असे जर तुम्हाला वाटत असेल तर काय? तुमच्यासारखीच परिस्थिती असलेल्या पायनियरांशी याबद्दल तुम्ही बोलू शकता. (नीति. १५:२२) तास कसे पूर्ण करणार याची वेगवेगळी वेळापत्रके लिहून काढा. असे केल्याने अनावश्यक असलेल्या गोष्टींत जो वेळ तुम्ही आधी घालवत होता तो वेळ आता सेवेत घालवून तुम्ही वेळेचा सदुपयोग करू शकता. तुम्हाला वाटले होते त्यापेक्षा हे अधिक सोपे आहे असे तुम्हाला कळून येईल.—इफिस. ५:१५, १६.
८. आपण वेळोवेळी आपल्या परिस्थितीचे परीक्षण का केले पाहिजे?
८ तुमच्या परिस्थितीचा पुन्हा विचार करा: वैयक्तिक परिस्थिती नेहमी बदलत असते. त्यामुळे वेळोवेळी आपल्या परिस्थितीचे परीक्षण करणे चांगले ठरेल. उदाहरणार्थ, तुम्ही लवकरच सेवानिवृत्त होणार आहात का? पायनियरिंग करण्यासाठी नोकरी सोडणारे बंधू कृष्णन म्हणतात: “या निर्णयामुळे मला माझ्या पत्नीसोबत सामान्य पायनियरिंग करणं शक्य झालं आणि अधिक गरज असलेल्या क्षेत्रात जाऊन सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली. इतर कोणतंही काम आध्यात्मिक अर्थानं इतकं प्रतिफलदायी किंवा आनंददायी असू शकत नाही.”
९. विवाहित जोडप्यांनी कशाचा विचार केला पाहिजे?
९ आपल्या परिस्थितीचा काळजीपूर्वक आढावा घेतल्यानंतर काही जोडप्यांच्या असे लक्षात आले की दोघांनीही पूर्णवेळ काम करणे गरजेचे नाही. यामुळे त्यांच्या कुटुंबाला आपली जीवनशैली साधी करावी लागेल हे खरे, पण त्यांच्या या त्यागामुळे त्यांना अनेक आशीर्वाद मिळतील. जॉन, यांच्या पत्नीने सेवेत सहभाग वाढवण्याकरता आपली पूर्णवेळेची नोकरी सोडून दिली. ते असे म्हणतात: “माझी पत्नी दिवसभर देवाच्या सेवेत असते या भावनेसारखी दुसरी सुखदायक भावना नाही!”
१०. कोणकोणत्या कारणांमुळे ख्रिस्ती बंधू भगिनी पायनियरिंग करायला प्रवृत्त होतात?
१० तुमचे प्रेम व विश्वास प्रदर्शित करा: यहोवाने दिलेले प्रचार कार्य आपल्यातील प्रत्येकाच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचे काम आहे. लवकरच ही जुनी व्यवस्था नष्ट होणार आहे व यहोवाच्या नावाचा धावा करणारेच फक्त बचावले जातील. (रोम. १०:१३) यहोवाबद्दल प्रेमाने भरलेल्या अंतःकरणाने व त्याने आपल्यासाठी जे काही केले आहे त्याबद्दलच्या कृतज्ञतेने प्रेरित होऊन, आपण त्याच्या पुत्राने दिलेल्या प्रचार करण्याच्या आज्ञेचे आवेशाने पालन करू. (मत्त. २८:१९, २०; १ योहा. ५:३) यासोबतच, आपण शेवटल्या दिवसांमध्ये जगत आहोत या विश्वासामुळे आपण जगाचा उपयोग पूर्णपणे न करता, वेळ आहे तोपर्यंत जास्तीत जास्त सेवा करण्यासाठी प्रवृत्त होऊ.—१ करिंथ. ७:२९-३१.
११. तू एक चांगला पायनियर बनशील, असे जेव्हा कोणी तुम्हाला म्हणते तेव्हा त्याचा अर्थ तुम्ही कसा घेतला पाहिजे?
११ सामान्य पायनियरिंग करणे म्हणजे केवळ सेवेत जास्तीत जास्त तास घालणे नव्हे, तर या सेवेद्वारे आपण देवाबद्दलचे आपले प्रेम व्यक्त करू शकतो. त्यामुळे, तू एक चांगला पायनियर बनशील, असे कोणी तुम्हाला म्हणते तेव्हा ती तुमची प्रशंसा समजा. आणि सेवेच्या या समाधानकारक मार्गात असलेल्यांपैकी एक बनण्याचा प्रार्थनापूर्वक विचार करा.
[२ पानांवरील संक्षिप्त आशय]
पालकांनो, आपल्या मुलांचे लक्ष पूर्णवेळेच्या सेवेकडे वळवण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात का?
[३ पानांवरील संक्षिप्त आशय]
यहोवाने दिलेले प्रचार कार्य आपल्यातील प्रत्येकाच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचे काम आहे.