मन वळवण्याच्या कलेचा उपयोग करून शिकवा
१ प्रेषित पौलासारखे प्रभावी असलेले सेवक हे जाणतात, की ‘सत्याचे वचन नीट सांगण्यात’ फक्त शास्त्रवचन उघडून दाखवणेच नाही तर आणखीनही काही गोवलेले आहे. (२ तीम. २:१५) तर मग, शिकवताना शास्त्रवचन उघडून दाखवण्यासोबतच आपण ‘मन वळवण्याच्या’ कलेचा वापर कसा करू शकतो?—प्रे. कृत्ये २८:२३, NW.
२ देवाच्या वचनाला बोलू द्या: सर्वप्रथम, देवाच्या वचनाकडे घरमालकाचे लक्ष अशा पद्धतीने आकर्षित करा जेणेकरून त्याला हे समजेल की त्यात देवाची बुद्धी आहे व तो त्याचा आदर करेल. देवाच्या वचनाबद्दल आपण भरवसा व्यक्त केल्यास आपण वचन वाचत असताना लक्षपूर्वक ऐकण्यास घरमालकाला प्रेरणा मिळू शकते. (इब्री ४:१२) आपण असे म्हणू शकतो: “याविषयावर देवाचे काय मत आहे हे समजून घेतल्यामुळे मला खूप फायदा झाला आहे. त्याचे वचन काय म्हणते याकडे लक्ष द्या.” संधी मिळेल तेव्हा वचन वाचून दाखवण्याद्वारे देवाच्या वचनाला बोलू द्या.
३ दुसरे, वचनाचा अर्थ सांगा. अनेक लोकांना एखादे वचन पहिल्यांदा वाचल्यावर लगेच त्याचा अर्थ कळत नाही. आपण ज्या विषयावर बोलत आहोत त्याच्याशी वचनाचा काय संबंध आहे हे समजावून सांगावे लागते. (लूक २४:२६, २७) वचनातील मुख्य शब्दांकडे लक्ष वेधा. वचन समजले आहे की नाही हे कळण्यासाठी तुम्ही प्रश्नांचा वापर करू शकता.—नीति. २०:५; प्रे. कृत्ये ८:३०.
४ वचनावर तर्क करा: तिसरे, ऐकणाऱ्यांच्या मनापर्यंत व अंतःकरणापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करा. घरमालकाला हे पाहायला मदत करा की वाचलेले वचन त्याला स्वतःला कसे लागू होते. वचनावर तर्क केल्यामुळे एखादी व्यक्ती आपली विचारशैली बदलण्यास तयार होऊ शकते. (प्रे. कृत्ये १७:२-४; १९:८) उदाहरणार्थ, स्तोत्र ८३:१८ वाचल्यानंतर तुम्ही असा तर्कवाद करू शकता, की एखाद्यासोबत जवळचा नातेसंबंध जोडण्यासाठी त्याचे नाव माहीत असणे गरजेचे आहे. नंतर तुम्ही त्याला विचारू शकता, “देवाचे नाव माहीत झाल्यामुळे तुमच्या प्रार्थना अधिक अर्थपूर्ण होतील असे तुम्हाला वाटते का?” अशा प्रकारे वाचलेले वचन घरमालकाला वैयक्तिक रित्या लागू केल्यामुळे त्याला त्याचे मूल्य कळेल. अशा रितीने मन वळवण्याच्या कलेचा वापर करून देवाचे वचन शिकवल्यामुळे नम्र अंतःकरणाचे लोक सत्य व जिवंत देव यहोवा याची उपासना करण्यास आकर्षित होतील.—यिर्म. १०:१०.
[अभ्यासाचे प्रश्न]
१. सेवेमध्ये देवाच्या वचनाचा प्रभावीपणे उपयोग करण्यात काय गोवलेले आहे?
२. देवाच्या वचनाबद्दल लोकांचा आदर तुम्ही कसा वाढवू शकता?
३. वचन वाचल्यानंतर ऐकणाऱ्याला त्याचा अर्थ समजण्याकरता आपण कशी मदत करू शकतो?
४. शिकवताना मन वळवण्याच्या कलेचा वापर करण्यासाठी कोणती शेवटची गोष्ट करणे आवश्यक आहे?