प्रश्न पेटी
▪ मंडळीच्या सभा टेलिफोनने जोडण्याबद्दल विचारपूर्वक निर्णय घेणे का आवश्यक आहे?
आजारपणामुळे किंवा टाळता न येणाऱ्या परिस्थितीमुळे सभागृहात मंडळीच्या सभांना उपस्थित न राहू शकणाऱ्या व्यक्ती टेलिफोनच्या साहाय्याने आपल्या घरात सभा ऐकू शकतात अशी व्यवस्था काही मंडळ्यांनी केली आहे. ज्यांना खरोखरच गरज आहे फक्त अशाच व्यक्ती या व्यवस्थेचा फायदा घेतील हे ठरवण्याकरता, विचारपूर्वक निर्णय घेण्याची व काळजीपूर्वक नियोजन करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे ज्या वडिलांना हे काम सोपवले आहे ते या व्यवस्थेची नीट देखरेख करतील जेणेकरून “सर्व काही शिस्तवार व व्यवस्थितपणे” होईल.—१ करिंथ. १४:४०.
वडील जन या गोष्टीकडे लक्ष देतील की ही व्यवस्था मंडळीतील अशा प्रचारकांना देण्यात येईल ज्यांना काही गंभीर आजारामुळे किंवा इतर काही कारणांमुळे घरातच राहावे लागते. तात्पुरत्या काळासाठी आजारी अथवा जखमी प्रचारकाला किंवा प्रगतीशील बायबल विद्यार्थ्याकरता देखील ही व्यवस्था करता येईल व त्यांची उपस्थिती मोजली जाईल. पण पुरेशा टेलिफोन लाईनच्या सुविधा उपलब्ध नसतील तिथे अशा गरजू व्यक्तिंसाठी कदाचित इतर योजना केल्या जातील. जसे की त्यांना सभेचा कार्यक्रम रेकॉर्ड करून देता येईल.
पण सभेला स्वतः उपस्थित राहिल्याने जे फायदे होतात त्यांची सर इतर कशालाच येणार नाही. सभागृहात उपस्थित राहिल्याने आपल्या बांधवांबरोबरच्या सहवासामुळे एकमेकांना “उत्तेजन प्राप्त” होते व नवीन लोकांना सभेला उपस्थित राहण्याचे महत्त्वही समजते. आपण सभेला उपस्थित राहतो तेव्हा तेथे सादर करण्यात आलेल्या प्रात्यक्षिकांपासून आपण खूप काही शिकतो. तेथे वडील आपल्याला वैयक्तिक मदत देऊ शकतात व आपल्या बांधवांचे प्रेम आपण अनुभवू शकतो. एक वयस्कर बहीण राज्य सभागृहातून बाहेर पडत असताना तिला आलिंगन दिल्यावर तिने ज्या भावना व्यक्त केल्या त्या किती खऱ्या आहेत. तिने म्हटले: “टेलिफोन लाईनवर तुम्हाला हे मिळत नाही!”—रोम. १:११, १२.
प्राचीन काळातील हन्ना ‘मंदिर सोडून’ कधी गेली नाही. तिच्याप्रमाणेच आपले अनेक वयस्कर बंधू-भगिनी त्यांच्या तब्येतीनुसार व परिस्थितीनुसार ख्रिस्ती सभांना नियमित उपस्थित राहतात. (लूक २:३६, ३७) ते गरजेच्या वेळी टेलिफोन लाईन्सचा उपयोग करतात खरे, पण सभेला उपस्थित राहण्याचा हाच एक चांगला पर्याय आहे असे ते समजत नाही. त्यांच्या उत्तम उदाहरणाचे अनुकरण करून आपणही आपला महान देव यहोवा याची उपासना करण्यासाठी सभेला उपस्थित राहण्यासाठी कितीही मेहनत करावी लागली तरी आनंदाने ती करू.—स्तो. ९५:१-३, ६; १२२:१.