शिकवण्यास पूर्णपणे तयार असा
१. बायबल अभ्यास चालवताना, विद्यार्थ्याला तो शिकत असलेल्या बायबल सत्याबद्दल कदर बाळगायला आपण मदत का केली पाहिजे?
१ विद्यार्थ्याला आपण यहोवाची सेवा करण्यास प्रवृत्त करू इच्छित असू तर बायबल अभ्यास चालवताना आपण पूर्णपणे तयार असले पाहिजे. आपला विद्यार्थी बायबलमधून जे सत्य शिकतो त्याबद्दल त्याला कदर बाळगायला आपण मदत करू शकतो. असे केल्यास यहोवाची सेवा करायला तो प्रेरित होईल. (अनु. ६:५; नीति. ४:२३; १ करिंथ. ९:२६) आपण विद्यार्थ्याला ही कदर बाळगायला कशी मदत करू शकतो?
२. बायबल अभ्यास घेण्याची तयारी करताना प्रार्थना केल्याने आपल्याला कशी मदत मिळते?
२ प्रार्थनापूर्वक तयारी करा: विद्यार्थ्याच्या मनात सत्याचे बीज वाढवण्याचे काम यहोवा करतो. त्यामुळे अभ्यास घेण्याची तयारी करताना विद्यार्थी व त्याच्या विशिष्ट गरजांबद्दल यहोवाला प्रार्थना करणे योग्य आहे. (१ करिंथ. ३:६; याको. १:५) अशा प्रकारे प्रार्थना केल्याने विद्यार्थ्याचे हृदय यहोवाच्या “इच्छेसंबंधीच्या पूर्ण ज्ञानाने” अर्थात अचूक ज्ञानाने कसे भरता येईल, हे समजायला आपल्याला मदत होईल.—कलस्सै. १:९, १०.
३. बायबल अभ्यासाची तयारी करताना आपण विद्यार्थ्याचा विचार कसा करू शकतो?
३ विद्यार्थ्याचा विचार करा: प्रभावीपणे शिकवण्यासाठी आपल्या श्रोत्यांचा विचार केला पाहिजे हे येशूला माहीत होते. येशूला निदान दोन प्रसंगी तरी, “काय केल्याने मला सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल?” हा एकच प्रश्न विचारण्यात आला होता. दोन्ही प्रसंगी या प्रश्नाचे उत्तर त्याने वेगवेगळ्या पद्धतीने दिले. (लूक १०:२५-२८; १८:१८-२०) आपणही बायबल अभ्यासाची तयारी करताना आपल्या विद्यार्थ्याने काय शिकायची गरज आहे याचा विचार केला पाहिजे. अध्यायातील कोणती वचने आपण त्याच्यासोबत वाचणार आहोत? एकावेळी आपण त्याच्याबरोबर किती अभ्यास करणार आहोत? अध्यायातील कोणता मुद्दा कदाचित त्याला समजायला किंवा स्वीकारायला कठीण जाईल? तो कदाचित कोणते प्रश्न विचारेल याचा अंदाज आधीच लावला तर त्यांची उत्तरे आपण प्रभावीपणे देऊ शकू.
४. चांगली तयारी करण्यात कशाचा समावेश होतो?
४ अभ्यासाच्या आधी अध्यायाची उजळणी करा: याआधी कदाचित आपण एखाद्या अध्यायाचा अभ्यास अनेकदा केला असेल पण आपल्या विद्यार्थ्याबरोबर आपण पहिल्यांदाच त्या अध्यायाचा अभ्यास करणार आहोत. आपल्याला जर त्याच्या हृदयापर्यंत पोहचायचे असेल तर आपण प्रत्येक अभ्यास घेण्यापूर्वी चांगली तयारी करणे आवश्यक आहे. याचा अर्थ आपण आपल्या विद्यार्थ्याला जे करायचे प्रोत्साहन देतो ते करणे. विद्यार्थ्याला लक्षात ठेवून अध्यायात उद्धृत केलेल्या वचनांची उजळणी करा. तुम्ही कदाचित मुख्य मुद्देही अधोरेखीत करू शकता.—रोम. २:२१, २२.
५. आपण यहोवाचे अनुकरण कसे करू शकतो?
५ प्रत्येक बायबल विद्यार्थ्याच्या प्रगतीत यहोवाला आस्था आहे. (२ पेत्र ३:९) बायबल अभ्यासाची तयारी करण्यासाठी वेळ काढल्याने आपणही यहोवाप्रमाणेच प्रेमळ काळजी दाखवतो.