मर्यादित वाचन क्षमता असलेल्यांना शिकवा
१. सेवाकार्य करताना आपल्याला कोणत्या आव्हनाला तोंड द्यावे लागू शकते?
१ सेवाकार्य करताना कधीकधी, फारसे वाचता येत नसणाऱ्या लोकांना सत्य शिकवण्याचे आव्हान आपल्यापुढे येऊ शकते. अशा वेळी आपण काय करू शकतो?
२. फारसे वाचता येत नसलेल्या लोकांना आपण आदर का दाखवला पाहिजे व हे आपण कसे करू शकतो?
२ त्यांचा आदर करा: एका व्यक्तीचे शिक्षण किती झाले आहे हे यहोवा पाहत नाही, तर तिचे अंतःकरण कसे आहे हे पाहतो. (१ शमु. १६:७; नीति. २१:२) म्हणून, अशा लोकांना आपण कमी लेखू नये. आपण त्यांना आदर दाखवतो व धीराने त्यांच्याशी वागतो, तेव्हा ते आपली मदत स्वीकारण्याची दाट शक्यता असते. (१ पेत्र ३:१५) यामध्ये, त्या व्यक्तीने वचन किंवा परिच्छेद वाचावा म्हणून तिला आग्रह न करणे हे समाविष्ट आहे. एखादी व्यक्ती जसजशी बायबलचे सत्य शिकत जाते, तसतशी देवाच्या वचनावर ‘रात्रंदिवस मनन करण्याचा’ आनंद घेण्यासाठी, तिची स्वतःची वाचन क्षमता सुधारण्याची इच्छा अधिक प्रबळ होत जाते.—स्तो. १:२, ३.
३. ज्यांना फारसे वाचता येत नाही अशांना शिकवण्यासाठी आपण कोणत्या पद्धतींचा वापर करू शकतो?
३ बायबल अभ्यासादरम्यान शिकवण्याच्या पद्धती: लोकांना शिकवण्यासाठी व शिकवलेली माहिती लोकांच्या लक्षात राहण्यासाठी चित्रांचा उपयोग होऊ शकतो. तुम्ही वापरत असलेल्या प्रकाशनातील एखाद्या चित्राचे निरीक्षण करायला तुम्ही विद्यार्थ्याला सांगू शकता, आणि त्या चित्रात त्याला काय दिसते हे त्याला विचारू शकता. मग, त्या चित्रातून काय शिकायला मिळते हे समजण्यास त्याला मदत करण्यासाठी विशिष्ट प्रश्नांचा उपयोग करा. चित्रातील विशिष्ट गोष्टींबद्दल शिकवणाऱ्या शास्त्रवचनांचा उपयोग करा. पाठाची उजळणी करण्यासाठी देखील तुम्ही चित्रांचा वापर करू शकता. एकाच अभ्यासात पुष्कळ माहिती सांगू नका. मूळ विषय व मुख्य मुद्यांवर भर द्या, आणि चर्चा करत असलेल्या विषयाशी संबंधित नसलेली माहिती देण्याचे टाळा. थेट बायबलमधून वचन वाचून दाखवा व वाचलेले समजले की नाही हे पाहण्यासाठी विद्यार्थ्याला प्रश्न विचारा. यामुळे, बायबलमध्ये असलेल्या इतर सत्यांची माहिती करून घेण्याच्या हेतूने, विद्यार्थी आपली वाचन क्षमता वाढवण्यास अधिक उत्सुक होईल.
४. आपल्या विद्यार्थ्याची वाचन क्षमता सुधारण्यासाठी आपण त्याला कशा प्रकारे मदत करू शकतो?
४ वाचन सुधारण्यासाठी साधने: मर्यादित वाचन क्षमता असलेले किंवा न अडखळता वाचायला शिकण्याची संधी न लाभलेले लोक शिकत असलेल्या गोष्टी चांगल्या प्रकारे समजू शकतात व आठवणीत ठेवू शकतात. त्यामुळे, एखादा चांगला वाचक वाचन करत असतो तेव्हा लक्ष देऊन ऐकण्याचे व आपल्याजवळ असलेल्या प्रकाशनात पाहून हळू आवाजात शब्दांचा पुनरुच्चार करण्याचे प्रोत्साहन तुम्ही त्यांना देऊ शकता. असे केल्याने त्यांची वाचन क्षमता सुधारेल. काही भागांत, वडीलजन मंडळीत वाचन कौशल्ये वाढवण्यासाठी वाचन वर्गांचे आयोजन करू शकतात. या व्यावहारिक सूचना, ज्यांना फारसे वाचता येत नाही अशा लोकांना, ‘पवित्र शास्त्र’ समजून घेण्यास व त्याद्वारे ज्ञान मिळवून तारण प्राप्त करण्यासाठी ते समर्थ व्हावे यासाठी त्यांची मदत करण्यास आपल्याला साहाय्यक ठरू शकतात.—२ तीम. ३:१५.