बायबल शिकवते पुस्तकाचा अधिकाधिक उपयोग करा
१. येशूने आपल्या शिष्यांना कोणती आज्ञा दिली?
१ संपूर्ण जगभरात “शिष्य” बनवण्याच्या कार्यात मार्गदर्शन करण्याचा “सर्व अधिकार” येशू ख्रिस्ताला देण्यात आला आहे. (मत्त. २८:१८, १९) स्वर्गात जाण्याच्या काही दिवसांआधी त्याने आपल्या शिष्यांना एक तातडीचे कार्य करण्याची आज्ञा दिली. आणि आज, ही कामगिरी पूर्ण करण्याकरता आपण अधिकाधिक प्रयत्न करणे पहिल्या पेक्षा अधिक तातडीचे आहे.—योहा. ४:३५.
२. बायबल शिकवते पुस्तक एक प्रभावी साधन आहे असे आपण का म्हणतो?
२ बायबल नेमके काय शिकवते? पुस्तकात एकूण १९ अध्याय आहेत. तसेच एक परिशिष्टही आहे ज्यात विषयवार सविस्तर माहिती स्पष्ट आणि सोप्या भाषेत मांडलेली आहे. हे पुस्तक सेवेसाठी जणू काय एक वरदानच आहे. एका विभागीय पर्यवेक्षकांनी म्हटले, की बायबल शिकवते पुस्तक “इतके आकर्षक आहे की घरमालक लगेच संभाषणास तयार होतात.” ते पुढे म्हणाले, की हे पुस्तक वापरायला देखील खूप सोपे असल्यामुळे “पुष्कळ राज्य प्रचारक अधिक आत्मविश्वासाने व आनंदाने सेवेत भाग घेत आहेत.”
३. हे पुस्तक आपण कशा प्रकारे सादर करू शकतो?
३ बायबल शिकवते पुस्तकाचा परिणामकारक उपयोग करा: बायबल नेमके काय शिकवते? हे पुस्तक सादर करण्याची एक सोपी पद्धत ही आहे: (१) घरमालकाला आपले मत व्यक्त करायला लावणारा प्रश्न विचारा, (२) विषयाशी संबंधित एक योग्य शास्त्रवचन वाचा, आणि (३) त्या विषयाबद्दल पुस्तकातील ज्या अध्यायात चर्चा केली आहे तो उघडून शीर्षकाखालील प्रश्नांकडे घरमालकाचे लक्ष वेधा. जर घरमालकाने आवड व्यक्त केली तर तुम्ही त्याच अध्यायातील सुरुवातीच्या परिच्छेदांच्या साहाय्याने बायबल अभ्यासाचे प्रात्यक्षिक दाखवू शकता. ही पद्धत पहिल्या भेटीतच किंवा पुनर्भेट करताना बायबल अभ्यास सुरू करण्यासाठी वापरली जाऊ शकते.
४. प्रचार करण्यात व शिकवण्यात काय फरक आहे?
४ आवड दाखवणाऱ्या लोकांना बायबल शिकवते पुस्तक दिल्यानंतर, येशूने आज्ञापिलेल्या सर्व गोष्टी ‘त्यांस पाळायला शिकवण्याकरता’ आपण त्यांच्याकडे पुन्हा गेले पाहिजे. (मत्त. २८:२०) प्रचार करण्यात व शिकवण्यात फरक आहे. कोणालाही शिकवताना, शिक्षक फक्त प्रचार करत नाही तर तो शिक्षण देतो, गोष्टी समजावून सांगतो आणि पुरावे सादर करतो.
५. बायबल अभ्यास प्रभावीपणे घेण्याकरता आपण चांगल्या प्रकारे तयारी कशी करू शकतो?
५ बायबल अभ्यास घेण्याआधी चांगली तयारी करा: बायबल शिकवते पुस्तकाचा उपयोग करून प्रभावी शिक्षक होण्यासाठी: (१) आपण अभ्यासाआधी चांगली तयारी केली पाहिजे. स्वतःला विचारा: ‘यहोवाबरोबर चांगला नातेसंबंध जोडण्यासाठी माझ्या विद्यार्थ्याने कोणत्या गोष्टींचा आपल्या जीवनात अवलंब केला पाहिजे?’ (२) अभ्यासादरम्यान शास्त्रवचनांवर अधिक जोर द्या. आपले धार्मिक विश्वास बायबलमधल्या ज्या वचनांवर आधारित आहेत त्या वचनांतील मुख्य शब्द शोधायला विद्यार्थ्याला मदत करा. (इब्री ४:१२) (३) अध्यायाच्या सुरुवातीला असलेल्या प्रश्नांचा, पुस्तकाच्या शेवटी असलेल्या परिशिष्टाचा व अध्यायाच्या शेवटी उजळणीकरता दिलेल्या चौकोनाचा उपयोग करा. (४) अभ्यास अगदी साधा-सोपा असू द्या. मुख्य मुद्द्यांवर चर्चा करा. जास्त बोलण्याचे टाळा व अभ्यासाच्या वेळी अनावश्यक माहिती देऊ नका.—योहा. १६:१२.
६. येशूच्या कोणत्या शब्दांमुळे आपल्याला सेवेमध्ये अधिक भाग घेण्याचे बळ मिळते?
६ येशूने आज्ञा दिल्यानंतर शेवटी असे म्हटले: “पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.” (मत्त. २८:२०) येशूच्या या शब्दांमुळे आपल्याला किती बळ मिळते, नाही का? ज्याला ‘स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार’ देण्यात आला आहे तो आपला नेता अर्थात येशू आपल्या पाठीशी आहे! तेव्हा, शिष्य बनवण्याची देवाच्या पुत्राकडून आपल्याला मिळालेली आज्ञा पूर्ण करताना आपण बायबल शिकवते पुस्तकाचा अधिकाधिक उपयोग करू या.