नियमन मंडळाकडून पत्र
आमच्यासह यहोवाची उपासना करणाऱ्या प्रिय बांधवांनो:
तुम्हा प्रिय बांधवांना पत्र लिहिण्यास आम्हाला मनस्वी आनंद होत आहे. प्रेषित योहानाला वाटले तसेच आम्हालाही वाटते. आपल्या सहविश्वासू बांधवांवर योहानाची “खरी प्रीती” होती व ते “सत्याने चालत” आहेत हे जाणून त्याला अत्यानंद झाला असे त्याने म्हटले. (२ योहा. १, ४) आपल्याला मिळालेले सत्य हे देवाकडून आलेले एक वरदानच आहे. बायबलच्या सत्याने आपल्याला मोठ्या बाबेलमधून तसेच देवाचा अनादर करणाऱ्या तिच्या खोट्या सिद्धांतांपासून व सांप्रदायांपासून मुक्त केले आहे. सत्यानुसार चालल्यामुळे आपण प्रेमळ, कृपाळू व दयाळू बनलो आहोत. आणि देवाच्या नजरेत शुद्ध राहण्याची व सार्वकालिक जीवनाची आशा बाळगण्याची संधीही आपल्याला सत्यामुळेच लाभली आहे.
याशिवाय, यहोवाचा आत्मा पावलोपावली आपले मार्गदर्शन करतो व आपल्याला बळ देतो याबद्दल आपण किती कृतज्ञ आहोत! यहोवाने प्रेमळपणे दिलेल्या देणगीच्या अर्थात पवित्र आत्म्याच्या विविध पैलूंचे परीक्षण करण्याची उत्तम संधी अलीकडेच झालेल्या “देवाच्या आत्म्याने मार्गदर्शित” या अधिवेशनात तुम्हाला मिळाली याची आम्हाला खात्री आहे. जगाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत असताना, या खडतर काळातून यशस्वी रीत्या वाटचाल करण्यासाठी आपण यहोवाच्या शक्तीशाली आत्म्याच्या मार्गदर्शनावर विसंबून राहिले पाहिजे.
आपल्या विश्वासाखातर आपल्या बांधवांना कोणकोणत्या भयंकर परीक्षांचा सामना करावा लागला याबद्दल वार्षिक पुस्तकातील रोमांचक अहवाल वाचून तुम्ही नक्कीच हेलावून गेला असाल. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, यांपैकी बऱ्याच बांधवांचा बाप्तिस्मा होऊन थोडाच काळ झाला होता व काहींचा तर बाप्तिस्मासुद्धा झाला नव्हता. त्यांच्या एकनिष्ठेमुळे व नीतिमत्त्वासाठी त्यांनी घेतलेल्या खंबीर भूमिकेमुळे आपल्या मनात त्यांच्याबद्दल अपार प्रेम दाटून येत नाही का? खरोखर त्यांच्या या अप्रतिम उदाहरणावरून, आपल्याही वाटेत येणाऱ्या समस्यांचा निश्चयपूर्वक सामना करून देवाच्या राज्याप्रती एकनिष्ठ राहण्याची प्रेरणा आपल्याला मिळते.—१ थेस्सलनी. १:६-८.
प्रिय बंधूभगिनींनो, आपल्या कुटुंबांना प्रेमाच्या बंधनात एकत्र ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असताना तुम्हाला आर्थिक व इतर असंख्य समस्यांना तोंड द्यावे लागते याची आम्हाला जाणीव आहे. तुमच्यापैकी काहींना तर राज्य प्रचाराच्या कार्यात व मंडळीतील इतर आवश्यक कार्यांत नियमितपणे व निष्ठेने सहभाग घेणे देखील कठीण जाते. म्हणूनच, अनेकदा प्रार्थनापूर्वक चर्चा करून, जानेवारी १, २००९ पासून मंडळीच्या सभांमध्ये आम्ही काही फेरबदल केले आहेत. या योजनेचा तुम्ही पूर्ण फायदा घ्याल व या वेळेचा आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक अभ्यासासाठी उपयोग कराल असा आमचा विश्वास आहे.
या वर्षी झालेल्या अनेक संमेलनांमध्ये व अधिवेशनांमध्ये, अनेकांनी बाप्तिस्म्याचे पाऊल उचलले ही खरोखरच अतिशय आनंदाची गोष्ट आहे. यांपैकी बरेच जण अगदी कोवळ्या वयातले होते. आपल्या मुलांच्या मनात सत्याविषयीचे प्रेम निर्माण करणाऱ्या व लहान वयातच यहोवाला आपले जीवन समर्पित करण्यास त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या पालकांची आम्ही प्रशंसा करतो. या लहान मुलांना शाळेत असंख्य आव्हानांना तोंड द्यावे लागते. असे असतानाही ते बाप्तिस्मा घेण्यास पात्र ठरले यावरून घरी त्यांच्यावर किती चांगले संस्कार झाले असतील हे दिसून येते.—स्तो. १२८:१-६.
त्याचवेळी बायबल अभ्यासाच्या कार्यात झालेल्या उल्लेखनीय प्रगतीचाही आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. या कार्यात, आपल्या कष्टाळू मिशनऱ्यांचा व खास पायनियरांचा मोलाचा वाटा आहे. प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना ‘या’ व “जीवनाचे पाणी फुकट” घ्या असे आमंत्रण देण्याच्या महत्त्वपूर्ण कार्यात सहभाग घेणाऱ्या जगभरातील आमच्या बंधूभगिनींची, नियमन मंडळात सेवा करणारे आम्ही सर्व जण मनापासून कदर करतो. (प्रकटी. २२:१७) गेल्या वर्षी, यहोवाला आपले जीवन समर्पित करून पाण्याने बाप्तिस्मा घेतलेल्या २,८९,६७८ जणांचे आमच्या विश्वव्यापी बंधूवर्गात आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत!
प्रेषित योहानाने लिहिलेल्या शब्दांची आपण वेळोवेळी स्वतःला आठवण करून दिली पाहिजे. त्याने लिहिले: “जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहेत; पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो.” (१ योहा. २:१७) हे जग ‘नाहीसे’ होईल त्या काळाच्या अगदी जवळ आपण पोहचलो आहोत. तेव्हा, ‘जागृत राहून’ देवाच्या इच्छेनुसार जीवन जगणे अत्यंत सुज्ञतेचे आहे. (मत्त. २४:४२) अशा प्रकारचे जीवन जगल्याचा आपल्याला कधीच पस्तावा होणार नाही व यहोवाच्या प्रेमळ दयेचा आपण सतत लाभ घेत राहू.—यश. ६३:७.
या वर्षाच्या वार्षिक पुस्तकात दिलेले अनेक देशांचे उत्तेजनपर अहवाल वाचून तुम्हालाही आपल्या जीवनात देवाच्या राज्याला प्रथम स्थान देण्याचे प्रोत्साहन मिळेल अशी आम्ही आशा करतो. आमच्या प्रार्थनांमध्ये व इतर वेळीसुद्धा आम्ही नेहमी तुमची आठवण करतो आणि तुम्हा सर्वांवर आमचे अपार प्रेम आहे याची तुम्ही खात्री बाळगू शकता. यहोवा तुमच्यावर अनंत आशीर्वादांचा वर्षाव करो.
आपले बांधव,
यहोवाच्या साक्षीदारांचे नियमन मंडळ