व्यक्तिगत आणि कौटुंबिक बायबल अभ्यास अत्यावश्यक!
१. आज नियमन मंडळाला आपली कोणती खास काळजी लागली आहे व का?
१ पहिल्या शतकात होते तसेच आजही नियमन मंडळाला यहोवाच्या लोकांच्या आध्यात्मिक कल्याणाची खूप काळजी आहे. (प्रे. कृत्ये १५:६, २८) मोठ्या संकटाचे काळे ढग दाटत चालल्यामुळे प्रत्येक राज्य प्रचारकाने यहोवाबरोबर घनिष्ठ नातेसंबंध जोडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मंडळीच्या पुस्तक अभ्यासासाठी पूर्वी आपण जो वेळ खर्च करायचो तो आता कसा वापरू शकतो? हा वेळ कौटुंबिक उपासनेसाठी वापरावा, असे सर्वांना उत्तेजन दिले जात आहे. वेळेचा असा सदुपयोग केल्यामुळे आपण देवाच्या ईश्वरप्रेरित वचनात आणखी खोलवर शिरून अभ्यास करू शकू व त्यांतील जीवनदायक पाणी काढू शकू.—स्तो. १:१-३; रोम. ११:३३, ३४.
२. आपल्या कौटुंबिक उपासनेच्या संध्याकाळचे आपण सर्व जण नियोजन कसे करू शकतो?
२ कौटुंबिक उपासनेची संध्याकाळ: आपल्या कुटुंबात कौटुंबिक बायबल अभ्यासाचा अर्थपूर्ण, नियमित कार्यक्रम अनुसरण्याची यहोवाकडून मिळालेली जबाबदारी सर्व कुटुंब प्रमुखांनी गांभीर्याने घ्यावी, असे त्यांना उत्तेजन दिले जाते. (अनु. ६:६, ७) कौटुंबिक जबाबदाऱ्या नसलेले अविवाहित बंधू व भगिनी, व्यक्तिगत बायबल अभ्यास आणि संशोधन यासाठी या वेळेचा उपयोग करू शकतात. आजच्या ‘वाईट दिवसांत’ लागणारी आध्यात्मिक शक्ती टिकवून ठेवण्याकरता आपण सर्वांनी, अभ्यास व मनन यांकरता “वेळेचा सदुपयोग” करणे अत्यावश्यक आहे.—इफिस. ५:१५, १६.
३, ४. अभ्यासात आपण कोणकोणत्या साहित्यांचा उपयोग करू शकतो आणि कोणत्या हेतूने?
३ कशाचा अभ्यास करू शकतो?: तुमचा बायबल अभ्यास अधिक रोचक बनविण्याकरता लागणारी माहिती तुम्हाला सहजगत्या मिळावी म्हणून, वॉचटावर पब्लिकेशन्स इंडेक्स किंवा सीडी-रॉमवरील वॉचटावर लायब्ररीचा तुम्ही उपयोग करू शकता. कुटुंबे, टेहळणी बुरूज मासिकात “कौटुंबिक सौख्यानंदाच्या गुरुकिल्ल्या,” “आपल्या मुलांना शिकवा,” व “आमच्या तरुण मित्रांकरता,” असे शीर्षक असलेल्या नेहमीच्या सदरांतील लेखांची चर्चा करू शकतात. तसेच, सावध राहा! मासिकात “तरुणांचे प्रश्न” ही लेखमाला आणि सृष्टीच्या किमयांचे विस्मयकारक लेख आहेत.
४ निवांतपणे केलेल्या बायबल वाचनामुळे, कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या मनावर व हृदयावर देवाचे नीतिनियम व देव शिकवत असलेले धडे कोरले जातील. (इब्री ४:१२) इतर प्रसंगी तुम्ही संघटनेने बनवलेले व्हिडिओ पाहू शकता व त्यावर चर्चा करू शकता. कशाचा अभ्यास करायचा किंवा तो कसा करायचा याबाबतीत कल्पक व सर्जनशील असण्यास तुमच्याजवळ खूप वाव आहे. कोणत्या विषयाची जरा खोलात जाऊन तुम्हाला अधिक माहिती घ्याविशी वाटते, असे आपल्या कुटुंबातील सदस्यांनाच विचारले तर?
५. आज आपण व्यक्तिगत व कौटुंबिक अभ्यासाला जास्त महत्त्व का दिले पाहिजे?
५ आज हे इतके महत्त्वाचे का आहे?: यहोवाबरोबरचा नातेसंबंध जर आपण आज बळकट केला तर ‘परमेश्वर जे आपले तारण करणार आहे ते पाहण्यास’ तयार राहू. (निर्ग. १४:१३) “ह्या कुटिल व विपरीत पिढीत” आपल्या मुलांना वाढवण्याकरता पालकांना देवाच्या मार्गदर्शनाची गरज आहे. (फिलिप्पै. २:१५) आजच्या शाळांमधल्या बिघडत चाललेल्या नैतिक वातावरणात सुरक्षित राहण्याकरता आपल्या मुलांना मदतीची गरज आहे. (नीति. २२:३, ६) पतीपत्नीने यहोवाबरोबर जोडलेली त्यांची “तीनपदरी दोरी” अधिक घट्ट केली पाहिजे. (उप. ४:१२) तेव्हा, “आपल्या परमपवित्र विश्वासावर स्वतःची रचना” करण्यास उरलेल्या वेळेचा आपण सर्वजण सदुपयोग करूया.—यहू. २०.