मंडळीच्या पुस्तक अभ्यासासाठी बायबल कथांचं माझं पुस्तक
१ देवाच्या लिखित वचनातील संदेशामुळे जगभरातील कोट्यवधी लोकांच्या जीवनात परिवर्तन झाले आहे. (इब्री ४:१२) आपण जेव्हा बायबल अहवालांचे वाचन करतो व वाचलेल्या गोष्टींची कल्पना करतो तेव्हा देवाच्या वचनाचा आपल्या व्यक्तिगत जीवनावर प्रभाव होऊ लागतो. कारण देवाच्या वचनातील अहवाल कल्पकथा नव्हे तर खरा इतिहास आहे. त्यातील शब्द जिवंत आहेत व कोणीही त्यांना पूर्ण होण्यापासून रोखू शकत नाहीत. मंडळीच्या पुस्तक अभ्यासात, बायबल कथांचं माझं पुस्तक या पुस्तकाचा उपयोग करून देवाच्या लिखित वचनाचा कसून अभ्यास केल्याने आपल्याला खूप फायदा होऊ शकतो.
२ बायबल कथांचं माझं पुस्तक यात बायबलचे मूलभूत ज्ञान अगदी रोचक व सोप्या भाषेत मांडलेले आहे. बायबलमधील अहवाल क्रमानुसार सांगण्यात आले आहेत. या पुस्तकातील अनेक रंगीबेरंगी चित्रांचा शिकवण्यासाठी उपयोग केला जाऊ शकतो. तसेच या चित्रांमुळे आपण बायबल अहवालांवर मननही करू शकतो. (स्तो. ७७:१२) खरे पाहता, या पुस्तकातील कथा आपल्याला, अब्राहाम, इसहाक, याकोब यांसारख्या देवाला भिऊन वागणाऱ्या कुलपित्यांबरोबर ‘चालण्यास’ मदत करतील. सारा, रिबका, एकनिष्ठ मवाबी रूथ यांसारख्या भक्तिमान स्त्रियांना आपण “पाहू” शकू. एवढेच नव्हे तर आपण येशू ख्रिस्ताला बोलताना “ऐकू” शकू. उदाहरणार्थ, त्याचे डोंगरावरील प्रवचन. मंडळीच्या पुस्तक अभ्यासासाठी आपण जंगी तयारी केल्यास पवित्र शास्त्रवचनांतील भव्य प्रशिक्षणाचा लाभ घेऊ शकू. या अभ्यासामुळे, देवाचे वचन वाचण्याचा आपला दृढनिश्चय आणखी पक्का होईल आणि असे केल्याने आपल्याला खरोखरच खूप आनंद मिळेल व आपला अभ्यास अर्थपूर्ण बनेल, यात काही शंकाच नाही.
३ बायबल कथा पुस्तकात, प्रत्येक धड्यासाठी दोन प्रकारचे प्रश्नसंच आहेत. पहिला प्रश्नसंच, कथेच्या उजळणीकरता व कथेतील घटनांचे वर्णन देण्याकरता आहे. संपूर्ण कथा वाचल्यानंतर, अभ्यास संचालक हे उजळणी प्रश्न विचारतील. श्रोत्यांनी कथेवर आधारित थोडक्यात व नेमकी उत्तरे द्यावीत. पण प्रश्न नेहमीच कथेतील घटनांच्या क्रमानुसार विचारण्यात आलेले नाहीत, याची कृपया नोंद घ्यावी.
४ नंतर संचालक, कथेतून शिकलेल्या धड्यांवर जोर देण्याकरता दुसऱ्या संचातील प्रश्न विचारतील. प्रत्येक अतिरिक्त प्रश्नाअगोदर शास्त्रवचने उद्धृत करण्यात आली आहेत. यातील काही शास्त्रवचने बरीच मोठी आहेत. श्रोत्यांनी पुस्तक अभ्यासाची तयारी करताना ही शास्त्रवचने वाचावीत. प्रत्येक अतिरिक्त प्रश्नानंतरही तुम्हाला अनेक शास्त्रवचने उद्धृत करण्यात आल्याचे आढळेल. या उद्धृत शास्त्रवचनांमध्ये तुम्हाला उत्तरे सापडतील. उल्लेखीत शास्त्रवचने कथेतील मुख्य मुद्द्यांशी कशा प्रकारे संबंधित आहेत यावर अर्थभरीत टिपणी करण्यास संचालकाने श्रोत्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. कथेतील बायबलचा आशय आणि बायबलच्या शिकवणींचे पालन कसे करता येईल, हे समजण्यास संचालकाने श्रोत्यांना मदत केली पाहिजे.
५ पुस्तकातील प्रत्येक भागाची प्रस्तावना एका स्वतंत्र धड्याप्रमाणे पुस्तक अभ्यासात अभ्यासली जाईल. प्रत्येक भागाची प्रस्तावना वाचल्यावर संचालक, प्रस्तावनेवर त्याने तयार केलेले प्रश्न विचारेल. प्रस्तावनेवरील अशा चर्चेमुळे श्रोते, पुढील कथांसाठी तयार होतील. या पुस्तकाच्या अभ्यासामुळे तुमच्या मनामध्ये व हृदयामध्ये आध्यात्मिक गुण बाणवले जावोत व आपला महान स्वर्गीय पिता यहोवा याच्या आणखी जवळ येण्यास तुम्हाला मदत होवो.—याको. ४:८.