तटबंदी जमीनदोस्त करणे
१ कित्येक शतकांपासून सैतानाने खोट्या शिकवणींचा प्रसार करून व लोकांची फसवणूक करून त्यांच्या मनाभोवती जणू अभेद्य भिंती उभारल्या आहेत. त्रैक्य, आत्म्याचे अमरत्व, नरकाग्नी यांसारख्या सिद्धान्तांना त्याने खतपाणी घातले आहे. तसेच, सृष्टिकर्त्याच्या अस्तित्वाविषयी व बायबल खरोखरच देवाचे वचन आहे किंवा नाही याविषयी तो लोकांच्या मनात संदेह निर्माण करतो. जातीयवाद व राष्ट्राभिमान देखील अशाच अभेद्य भिंती आहेत. त्या सत्याच्या प्रकाशाला लोकांच्या मनात प्रवेश करू देत नाहीत. (२ करिंथ. ४:४) लोकांच्या मनात तटबंदीसारख्या पक्क्या बसलेल्या या समजुती व धारणा आपण कशा प्रकारे जमीनदोस्त करू शकतो?—२ करिंथ. १०:४, ५.
२ लोकांच्या श्रद्धेचे विषय: लोक आपले धार्मिक विश्वास वर्षानुवर्षे अगदी श्रद्धापूर्वक मानत आलेले असतात. काही जणांनी बालपणापासून अशा चुकीच्या धारणा व समजुती बाळगल्या आहेत. अशा लोकांना मदत करण्याकरता आपण त्यांच्या भावना जपून, त्यांच्या मतांना आदर देऊन त्यांच्याशी बोलले पाहिजे.—१ पेत्र ३:१५.
३ लोकांना त्यांच्या विश्वासांबद्दल व ते विशिष्ट गोष्टी का मानतात हे समजावून सांगण्याची संधी देण्याद्वारे आपण त्यांच्याबद्दल आदर दाखवतो. (याको. १:१९) कदाचित त्यांच्या एखाद्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे व त्या व्यक्तीला पुन्हा पाहण्याची उत्कट इच्छा असल्यामुळे ते आत्मा अमर आहे या शिकवणीवर विश्वास ठेवत असतील. किंवा, सणावारांच्या निमित्ताने कुटुंबातील सर्वांना एकत्र येण्याची संधी मिळते म्हणून कदाचित ते सणवार साजरे करत असतील. लोकांनी व्यक्त केलेले विचार आपण लक्षपूर्वक ऐकून घेतो तेव्हा आपल्याला जणू त्यांच्या मनात डोकावून त्यांच्या भावना जाणून घेण्याची संधी मिळते. आणि असे केल्यामुळे, विनाकारण त्यांचे मन न दुखवता, त्यांना परिणामकारक रीतीने मदत करणे आपल्याला शक्य होते. काहींच्या बाबतीत, नंतर कधीतरी या विषयावर आपण चर्चा करण्याचे ठरवू.—नीति. १६:२३.
४ येशूचे अनुकरण करा: नियमशास्त्रात पारंगत असलेल्या एकाने प्रश्न विचारले तेव्हा येशूने त्याला ज्या प्रकारे उत्तर दिले त्यावरून आपल्याला बरेच काही शिकायला मिळते. येशूने त्या माणसाच्या प्रश्नांना सरळसरळ उत्तरे दिली नाहीत. कदाचित मनात पक्क्या बसलेल्या समजुतींमुळे त्या मनुष्याने ती उत्तरे स्वीकारली नसती. म्हणून सरळसरळ उत्तरे देण्याऐवजी येशूने त्याचे लक्ष शास्त्रवचनांकडे वेधले, त्याला आपला दृष्टिकोन व्यक्त करण्याचे प्रोत्साहन दिले आणि एक दृष्टान्त सांगून त्याला तर्कशुद्ध रीतीने विचार करण्यास मदत केली.—लूक १०:२५-३७.
५ लोकांच्या मनात चुकीचे धार्मिक विचार कितीही खोलवर रुजलेले असोत, देवाच्या वचनातील सत्य मात्र त्यांपेक्षा प्रबळ आहे. (इब्री ४:१२) तेव्हा, धीराने आणि सावधगिरीने लोकांच्या मनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न केल्यास आपल्याला त्यांना खोट्या शिकवणींचा त्याग करण्यास व बंधमुक्त करणाऱ्या सत्याचा स्वीकार करण्यास साहाय्य करणे शक्य होईल.—योहा. ८:३२.