प्रश्न पेटी
▪ श्रोत्यांनी ईश्वरशासित सेवा प्रशाला आणि सेवा सभेतील प्रत्येक भागानंतर टाळ्या वाजवणे उचित आहे का?
सृष्टीकर्त्या यहोवाने पृथ्वीची निर्मिती केल्यानंतर, “प्रभात नक्षत्रांनी मिळून गायन केले व सर्व देवकुमारांनी जयजयकार केला.” (ईयो. ३८:७) यहोवाची उल्लेखनीय सृष्टी पाहिल्यावर स्वर्गातील ते देवकुमार जयजयकार करण्यास प्रवृत्त झाले. ही सृष्टी यहोवाची बुद्धी, त्याचे चांगुलपण आणि शक्ती यांचे नवीन प्रदर्शन होते.
मंडळीत आपले बंधूभगिनी एखादे भाषण किंवा प्रात्यक्षिक सादर करतात तेव्हा त्यांच्या प्रयत्नांबद्दल आणि सादर केलेल्या माहितीबद्दल मनापासून कदर व्यक्त करणे चांगली गोष्ट आहे. उदाहरणार्थ, खास प्रसंगी जसे की संमेलने आणि अधिवेशांमधील प्रत्येक भाषणानंतर अथवा प्रात्यक्षिकानंतर आपण सहसा टाळ्या वाजवतो. या भागाची तयारी करण्याकरता अधिक वेळ द्यावा लागला आहे आणि मेहनत घ्यावी लागली आहे. पण आपण टाळ्या वाजवून जी कदर व्यक्त करतो ती केवळ वक्त्याने घेतलेल्या मेहनतीबद्दलच नव्हे तर यहोवा, त्याचे वचन बायबल व त्याच्या संघटनेच्या वतीने जे मार्गदर्शन पुरवतो याकरता देखील असते.—यश. ४८:१७; मत्त. २४:४५-४७.
मग ईश्वरशासित सेवा प्रशाला आणि सेवा सभेत सादर केल्या जाणाऱ्या प्रत्येक भागानंतर टाळ्या वाजवण्याविषयी काय? टाळ्या न वाजवण्याविषयी कोणतेही नियम नाहीत. पण एखादा विद्यार्थी/विद्याथ्यीनी प्रशालेत पहिल्यांदा आपला भाग प्रस्तुत करतो/करते तेव्हा टाळ्या वाजवणे गैर नाही. पण प्रत्येक भागानंतर टाळ्या वाजवत राहिल्याने कालांतराने ती केवळ एक प्रथा बनेल आणि यामुळे टाळ्या वाजवण्याला काही अर्थ राहणार नाही. म्हणून, प्रत्येक भागानंतर आपण सहसा टाळ्या वाजवत नाही.
ईश्वरशासित सेवा प्रशाला आणि सेवा सभेतील बहुतेक भागानंतर आपण टाळ्या वाजवत नसलो तरीसुद्धा, मिळणारा बोध आणि आपले भाग हाताळण्यासाठी बंधूभगिनींनी केलेल्या प्रयत्नांबद्दल आपण इतर मार्गांनी कदर दाखवू शकतो. दक्ष राहून व सादर केला जाणारा भाग लक्षपूर्वक ऐकून आपण ही कदर दाखवू शकतो. याशिवाय, सभेनंतर भाग सादर करणाऱ्यांकडे जाऊन, त्यांचा भाग चांगला होता हे त्यांना सांगू शकतो.—इफिस. १:१५, १६.