आध्यात्मिक अन्नाचा आस्वाद घेण्याची एक आनंददायक संधी
१. यहोवा आपल्या सेवकांच्या आध्यात्मिक गरजा कशा प्रकारे पुऱ्या करतो?
१ यहोवा आपल्या सेवकांच्या आध्यात्मिक गरजा प्रेमाने पुऱ्या करतो. जगातील लोक आध्यात्मिक दृष्ट्या उपाशी आहेत असे म्हणायला हरकत नाही. पण, आपण मात्र आध्यात्मिक रीत्या तृप्त आहोत. (यश. ६५:१३) यहोवा ज्याद्वारे आपल्याला आध्यात्मिक पोषण पुरवतो असा एक मार्ग म्हणजे दर वर्षी होणारी आपली प्रांतीय अधिवेशने. येऊ घातलेल्या “देवाच्या आत्म्याने मार्गदर्शित” प्रांतीय अधिवेशनाच्या सर्व सत्रांना उपस्थित राहण्यासाठी तुम्ही आतापासूनच तयारीला लागला आहात का? या अधिवेशनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांकरता अतिशय रुचकर व पौष्टिक अशा आध्यात्मिक अन्नाची मेजवानी आयोजित करण्यात आली आहे.
२. अधिवेशनाकरता आधीपासूनच योजना करण्यात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो?
२ आधीपासूनच योजना करा: “काळजीपूर्वक केलेल्या योजनांमुळे फायदा होतो.” (नीति. २१:५, ईझी टू रीड व्हर्शन) अधिवेशनाच्या तिन्ही दिवसांच्या कार्यक्रमाला हजर राहण्याकरता जर तुम्हाला रजा घ्यावी लागणार असेल, तर याविषयी आपल्या वरिष्ठांशी बोलण्याचे लांबणीवर टाकू नका. जर तुम्हाला अधिवेशनाच्या शहरात मुक्काम करावा लागणार असेल तर त्याची व्यवस्था तुम्ही केली आहे का? तसेच, तुम्हाला दुपारसाठी साधेसे जेवण आपल्यासोबत घेऊन जाण्याची व्यवस्था करावी लागेल, ज्यामुळे जेवायला बाहेर जावे लागणार नाही, तर अधिवेशनाच्या ठिकाणीच सर्व बांधवांसोबत तुम्हाला जेवता येईल. आसने शोधण्याकरता पुरेसा वेळ मिळावा आणि सुरुवातीचे गीत व प्रार्थना यात सहभागी होता यावे म्हणून दररोज अधिवेशनाला लवकर पोचण्याचीही व्यवस्था करायला विसरू नका.
३. अधिवेशनाकरता आपण कशा प्रकारचे कपडे निवडावेत?
३ आपला पेहराव शालीन व साजेसा असला पाहिजे. (१ तीम. २:९, १०) प्रांतीय अधिवेशनांच्या वेळी लोकांना साक्ष देण्याची उत्तम संधी आपल्याला मिळते. अधिवेशनाच्या शहरात असताना, आपला पेहराव आदरणीय असल्यामुळे व अधिवेशनाचे बॅजकार्ड लावलेले असल्यामुळे आपण इतर लोकांमध्ये उठून दिसू आणि यामुळे आपल्याकडे पाहणाऱ्या लोकांचे आपल्याबद्दल चांगले मत बनेल.
४. आपल्याला व आपल्या कुटुंबालाही कार्यक्रमाचा पुरेपूर फायदा कसा घेता येईल?
४ लक्षपूर्वक ऐका: या मेजवानीत वाढल्या जाणाऱ्या आध्यात्मिक अन्नाचा एकही घास आपण वाया घालवू इच्छित नाही! (नीति. २२:१७, १८) म्हणूनच, बायबल वचने वाचली जात असताना जर आपणही आपले बायबल उघडून ते वचन वाचले आणि भाषणातील ठळक मुद्दे आपल्या वहीत नोंदून घेतले तर आपले लक्ष सहजासहजी भरकटणार नाही आणि कार्यक्रमावर लक्ष केंद्रित करणे आपल्याला सोपे जाईल. मग, दररोज संध्याकाळी आपण आपल्या वहीत घेतलेल्या नोंदींच्या साहाय्याने इतरांसोबत कार्यक्रमातील ठळक मुद्द्यांवर चर्चा करू शकतो. कार्यक्रम सुरू असताना, काही तरुण अधिवेशनात आपल्या मित्रमैत्रिणींसोबत बसून किंवा बाहेर उभे राहून एकमेकांशी बोलतात किंवा मोबाईल फोनवर एकमेकांना एसएमएस करतात, असे अलीकडे पाहण्यात आले आहे. जर आपल्याला मुले असतील, (यात किशोरवयीन मुलांचाही समावेश होतो) तर त्यांना इतर मुलांसोबत दुसरीकडे बसू देण्याऐवजी पूर्ण कुटुंबाने एकत्र बसून कार्यक्रम ऐकणे जास्त फायद्याचे ठरेल.
५. आपण अधिवेशनातून जास्तीत जास्त आनंद कसा मिळवू शकतो?
५ बांधवांच्या सहवासाचा आनंद घ्या: स्वादिष्ट भोजनाच्या जोडीला मित्रांचा सहवासही लाभला तर ते आणखीनच बहारदार होते. (नीति. १५:१७) त्याच प्रकारे, बंधूभगिनींच्या सहवासामुळे आपला अधिवेशनाचा आनंद द्विगुणित होतो. म्हणूनच, कार्यक्रम सुरू असतो तेवढा वेळ वगळता इतर वेळी, अधिवेशनाला आलेल्या बांधवांशी स्वतः पुढाकार घेऊन भेटणे, बोलणे व त्यांच्या सहवासाचा आनंद घेणे किती उत्तम ठरेल! (स्तो. १३३:१) संगीत सुरू होण्याआधी कार्यक्रमाचे अध्यक्ष सर्वांना आपापल्या जागी बसायला सांगतात, तेव्हा मात्र आपण आपले संभाषण थांबवून आपल्या जागी येऊन बसले पाहिजे.
६. अधिवेशनाच्या शहरात आपण कशा प्रकारे लोकांना साक्ष देऊ शकतो याविषयी तुमचा एखादा अनुभव सांगा.
६ साक्ष देण्याची एकही संधी गमावू नका: अधिवेशनाच्या निमित्ताने आपल्याला साक्ष देण्याच्या अनेक उत्तम संधी मिळतात. कार्यक्रमानंतर बंधू-भगिनी उपाहार गृहांत चहापानाकरता जातात तेव्हा बरेचदा वेटर्स व इतर जण त्यांचे बॅजकार्ड पाहून त्याविषयी चौकशी करतात. यामुळे बऱ्याच बांधवांना अशा लोकांशी बोलण्याची व त्यांना सत्याविषयी साक्ष देण्याची अतिशय उत्तम संधी मिळाली. चौकशी करणाऱ्या काहींना अधिवेशनाला उपस्थित राहण्याचे आमंत्रण देण्यात आले आणि काही जण आले देखील.
७. अधिवेशनाच्या ठिकाणी ख्रिश्चनांना शोभेलसे वागण्यास बायबलमधील कोणते तत्त्व आपल्याला साहाय्यक ठरेल?
७ ख्रिस्ती आचरण, देवाचा आत्मा आपले मार्गदर्शन करत असल्याचे एक चिन्ह: असे पाहण्यात आले आहे की अधिवेशनाला आलेल्या काही प्रतिनिधींनी अटेंडंट्सना सहकार्य करण्यास नकार दिला आहे. काही जण तर, ख्रिश्चनांना शोभणार नाही अशा भाषेत त्यांच्याशी बोलले. निश्चितच, स्वार्थी प्रवृत्तीमुळे, भले करणारे म्हणून आपली ओळख होत नाही. आणि यामुळे यहोवा देवाचीही स्तुती होत नाही. याउलट, आपण प्रेमळ, सहनशील, व सहकार्य करणारे असावे आणि आपण देवाच्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार चालतो हे आपल्या चांगल्या आचरणाने दाखवावे. (गल. ५:२२, २३, २५) शिवाय, जागा राखून ठेवण्याची समस्याही तशीच कायम आहे. सकाळी ८:०० वाजता जेव्हा अधिवेशनाचे दरवाजे खुले होतात, तेव्हा काही बंधूंना आणि बहिणींना “सर्वात चांगल्या” जागा पकडण्यासाठी धावताना, धक्काबुक्की आणि रेटारेटी करताना पाहण्यात आले आहे. अशा प्रकारच्या गैरवर्तनामुळे काही जणांना दुखापत झाल्याचीही उदाहरणे आहेत. काही बांधवांनी कळवले की ते आपल्या कुटुंबासोबत अधिवेशनाला लवकरच पोहचले, तरी त्यांना जागा मिळाल्या नाहीत, कारण बहुतेक जागा आधीपासूनच राखून ठेवण्यात आल्या होत्या. अधिवेशनाचे दरवाजे खुले होतात, तेव्हा कोणीतरी एक व्यक्ती येऊन आपल्या कुटुंबासाठी आणि मित्रांसाठी पूर्णच्या पूर्ण रांगा राखून ठेवते असे बरेचदा पाहण्यात आले आहे. प्रेम खरेतर निःस्वार्थपणाची अभिव्यक्ती आहे. आणि येशू ख्रिस्तानेही म्हटले होते की निःस्वार्थ प्रेम हे त्याच्या अनुयायांचे ओळखचिन्ह असेल. (योहा. १३:३५) पण, खूप साऱ्या जागा राखून ठेवणे हे आपण प्रेमाने वागत असल्याचे चिन्ह आहे का? ख्रिस्ती प्रेमामुळे आपल्याला ख्रिस्ताच्या या शब्दांनुसार वागण्याची प्रेरणा मिळाली पाहिजे: “ह्याकरिता लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही त्यांच्याशी वागा.”—मत्त. ७:१२.
८. येत्या प्रांतीय अधिवेशनाला आपण का उपस्थित राहिले पाहिजे?
८ अधिवेशनाचा कार्यक्रम तयार करण्याकरता, सभागृहांची व्यवस्था करण्याकरता, निरनिराळ्या विभागांचे कार्य नियोजित करण्याकरता, तसेच, अधिवेशनातील भाषणांची व इतर भागांची तयारी करण्याकरता अक्षरशः हजारो तास खर्च करण्यात आले आहेत. ही आध्यात्मिक मेजवानी आयोजित करण्याकरता बांधवांनी घेतलेले प्रेमपूर्वक परीश्रम खरेतर, यहोवाला त्याच्या लोकांबद्दल वाटणाऱ्या प्रेमाचा व काळजीचाच पुरावा आहे. तेव्हा, या मेजवानीला उपस्थित राहून आपण तिचा पुरेपूर आस्वाद घेऊ या! म्हणजे, या जगातील आध्यात्मिक रीत्या उपाशी लोकांप्रमाणे न होता, आपल्याला ‘हर्षित चित्ताने जयजयकार करता येईल.’—यश. ६५:१४.
[५ पानांवरील चित्र]
प्रांतीय अधिवेशनाच्या सूचना
▪ कार्यक्रमाची वेळ: तिन्ही दिवशी कार्यक्रम सकाळी ९:२० वाजता सुरू होईल. सभागृहाचे दरवाजे सकाळी ८:०० वाजता उघडले जातील. सुरुवातीचे राज्य संगीत सुरू होते तेव्हा सर्वांनी आपापल्या जागेवर बसावे जेणेकरून कार्यक्रमाची सुरुवात आदरणीय पद्धतीने होईल. कार्यक्रम, शुक्रवारी व शनिवारी संध्याकाळी ४:५५ वाजता आणि रविवारी ४:०० वाजता संपेल.
▪ पार्किंग: पार्किंगची जागा सभागृहाच्या व्यवस्थापनाने आपल्या ताब्यात दिली असल्यास, गाड्या जसजशा येतील तसतसे त्यांना पार्किंगसाठी जागा दिली जाईल. अधिवेशनाचा बॅज कार्ड, पार्किंगसाठी ओळखपत्र असेल.
▪ आसने राखणे: तुमच्यासोबत एकाच कारमधून आलेल्या किंवा एकाच घरात तुमच्याबरोबर राहणाऱ्या व्यक्तींसाठीच केवळ आसने राखून ठेवली जावीत.
▪ दुपारचे भोजन: दुपारच्या जेवणासाठी अधिवेशन स्थळ सोडून बाहेर जाण्याऐवजी कृपया सोबत साधे जेवण आणा. तुमच्या आसनाखाली बसेल अशाच आकाराची पाण्याची बाटली आणावी. पिकनिकसाठी असलेल्या पाण्याचे मोठे कूलर, बाटल्या किंवा मद्य अधिवेशनाच्या ठिकाणी आणण्यास मनाई आहे.
▪ देणग्या: आपल्या राज्य सभागृहात किंवा अधिवेशनात जगभरात चाललेल्या कार्यासाठी असलेल्या देणग्यांच्या पेट्यांमध्ये देणग्या टाकून आपण अधिवेशनाच्या व्यवस्थेकरता कृतज्ञता व्यक्त करू शकतो. अधिवेशनात दिलेले चेक “वॉच टावर”ला देय केले पाहिजे.
▪ अपघात आणि आपत्कालीन प्रसंग:आणीबाणीची वैद्यकीय परिस्थिती निर्माण झाल्यास कृपया जवळच्या अटेन्डेंटला कळवावे. तो लगेच प्राथमिक उपचार विभागाशी संपर्क साधेल. आमचे प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी परिस्थिती किती गंभीर आहे हे ठरवतील आणि त्यानुसार मदत देतील. आवश्यकता असल्यास १०२ क्रमांकाशी संपर्क साधला जाईल.
▪ कर्णबधिर: कोइम्बतूर आणि कोची येथील अधिवेशनांत, तसेच बेंगळूरू येथील इंग्रजी अधिवेशनात सांकेतिक भाषेत कार्यक्रम सादर केला जाईल.
▪ बाबागाड्या: अधिवेशनाच्या ठिकाणी बाबागाड्या आणण्याची परवानगी नाही. पण, आईवडिलांनी बाळांसाठी असलेल्या चाईल्ड-सेफ्टी सीट्स आपल्या बाजूच्या खुर्चीला अडकवल्यास हरकत नाही.
▪ अत्तरे: काही अधिवेशने बंद ठिकाणी होत असल्यामुळे यंत्राच्या साहाय्याने हवा खेळती ठेवण्याची सोय केली जाते. त्यामुळे, अशा ठिकाणी आपण खूपच उग्र अत्तरे, कोलोन व परफ्यूम वापरण्याचे टाळून इतरांप्रती दया दाखवतो; ज्यांना श्वसनाचे व श्वसनसंबंधित इतर विकार आहेत त्यांना उग्र स्वरूपाच्या वासांमुळे त्रास होण्याची शक्यता आहे.—१ करिंथ. १०:२४.
▪ पुनर्भेटींचे फॉर्म्स: अधिवेशनाच्या वेळी आपण अनौपचारिक साक्ष दिल्यानंतर जर कोणी आस्था दाखवली तर त्या व्यक्तीविषयीची माहिती देण्याकरता प्लीज फॉलो अप (S-43) फॉर्मचा उपयोग केला पाहिजे. प्रचारकांनी अधिवेशनाला येताना एक किंवा दोन पुनर्भेटींचे फॉर्म्स सोबत आणावेत. पूर्ण भरलेले फॉर्म एकतर बुकरूमला दिले जाऊ शकतात किंवा अधिवेशनाहून परतल्यावर तुमच्या मंडळीतल्या सचिवांना दिले जाऊ शकतात.—आमची राज्य सेवा फेब्रुवारी २००५, पृ. ६ पाहा.
▪ रेस्टॉरंट: रेस्टॉरंट्समध्ये गेल्यास, आपल्या उत्तम वागणुकीद्वारे यहोवाच्या नावाला गौरव आणा. अनेक ठिकाणी, रेस्टॉरंटमध्ये दिल्या जाणाऱ्या सेवेसाठी १० टक्के टिप्स देण्याची प्रथा आहे.
▪ हॉटेल्स: (१) तुम्हाला जितक्या खोल्या लागणार आहेत त्याच्यापेक्षा अधिक खोल्यांचे कृपया आरक्षण करू नका; आणि जितक्या लोकांना एका खोलीत राहण्याची परवानगी आहे त्याच्यापेक्षा अधिक लोकांना खोलीत राहायला घेऊ नका. (२) तुम्हाला जर तुमचे आरक्षण रद्द करायचे असेल तर कृपया हॉटेलला लवकरात लवकर कळवा. (३) तुम्हाला लागेल तेव्हाच लगेज कार्ट घ्या आणि काम झाल्यावर लगेच परत द्या म्हणजे इतरांची गैरसोय होणार नाही. (४) स्वयंपाक करण्याची परवानगी नसलेल्या खोल्यांमध्ये स्वयंपाक करू नका. (५) प्रत्येक दिवशी हाऊसकीपरला बक्षीस द्या. (६) हॉटेलमध्ये पाहुण्यांकरता नाश्ता, कॉफी किंवा बर्फ यांसारख्या मोफत दिल्या जाणाऱ्या सोयींचा गैरफायदा घेऊ नका. या सोयी फक्त हॉटेलमध्ये असताना वापरण्याकरता असतात. (७) हॉटेलच्या कर्मचाऱ्यांशी वागताना सर्ववेळी आत्म्याचे फळ प्रदर्शित करा. (८) हॉटेलांच्या नावांच्या यादीत दाखवलेले खोल्यांचे भाडे हे दर दिवसाचे भाडे आहे, पण यात टॅक्सचा समावेश नाही. जर हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी, तुम्ही न मागवलेल्या किंवा न वापरलेल्या गोष्टींचे अतिरिक्त पैसे मागितल्यास ते देऊ नका आणि लवकरात लवकर अधिवेशनातील रूमिंग विभागाला याविषयी कळवा. (९) जर तुमच्या हॉटेलच्या खोलीसंबंधी काही समस्या निर्माण झाली तर रूमिंग विभागाला अधिवेशनातच याविषयी सांगा.