प्रश्न पेटी
▪ यहोवाच्या सेवेसाठी वापरली जाणारी ठिकाणे जसे की राज्य सभागृह, संमेलन गृह, बेथेल गृह व शाखा दफ्तर येथे आपण जातो तेव्हा कोणत्या प्रकारचा पोषाख उचित आहे?
संपूर्ण जगभरात राज्य सभागृहे, संमेलन गृहे, बेथेल गृहे आणि शाखा दफ्तरे यहोवाच्या सेवेसाठी समर्पित केलेली खास ठिकाणे आहेत. ही ठिकाणे साधी, स्वच्छ आणि चांगल्या स्थितीत असल्यामुळे प्रतिष्ठित दिसतात. सैतानाच्या व्यवस्थीकरणातील उपासना स्थळांपेक्षा ती अगदी वेगळी आहेत. त्यामुळे यहोवाच्या सेवेसाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या या ठिकाणांना आपण जेव्हा भेट देतो तेव्हा आपण यहोवाचे उपासक आहोत व त्याची इच्छा पूर्ण करणारे आहोत हे आपल्या पेहराव्यावरून दिसून आले पाहिजे.
ख्रिस्ती या नात्याने आपण प्रत्येक बाबतीत अर्थात आपल्या उचित व सभ्य वेशभूषेद्वारे व केशभूषेद्वारे “आपली लायकी पटवून देतो.” (२ करिंथ. ६:३, ४) आपले वर्तन योग्य असले पाहिजे, अशीही आपल्याकडून अपेक्षा केली जाते. यहोवाच्या सेवकांनी सर्व प्रसंगी आपल्या वेशभूषेवरून व केशभूषेवरून, देवाच्या सेवकांना शोभेल असा मर्यादशीलपणा व प्रतिष्ठा दाखवली पाहिजे. मुख्यालयाला भेट देताना तसेच जगभरातील इतर कोणत्याही शाखेला भेट देताना आपण वरील गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.
आपण जेव्हा सेवेत जातो व ख्रिस्ती सभांना उपस्थित राहतो तेव्हा शारीरिक स्वच्छता, सभ्य पेहराव आणि उचित केशरचना करण्याची गरज का आहे याच्या महत्त्वावर जून २००७ आमची राज्य सेवा अंकातील पुरवणीत चर्चा करण्यात आली आहे. त्यानंतर, पृष्ठ ४ वरील दुसऱ्या रकान्यातील परिच्छेद ३ मध्ये असे म्हटले आहे: “आठवणीत असू द्या, बेथेल या शब्दाचा अर्थ ‘देवाचे घर’ असा होतो. त्याअर्थी तेथे जाताना आपला पेहराव, केशभूषा आणि वागणूक राज्य सभागृहात उपासनेकरता एकत्र येताना जशी अपेक्षित असते तशीच असावी.” स्थानीय किंवा दूरच्या ठिकाणांहून बेथेल पाहायला येणाऱ्या राज्य प्रचारकांनी या उच्च दर्जांचे पालन केले पाहिजे. असे केल्याने भेट द्यायला येणारे कृतज्ञता व आदर दाखवतात.—स्तो. २९:२.
‘देवभक्ती स्वीकारलेल्यांना शोभते’ असा आपला पेहराव आहे हे आपल्या कपड्यांवरून दिसून आले पाहिजे. (१ तीम. २:१०) आपला सभ्य पेहराव व केशरचना पाहून इतर जण यहोवाच्या खऱ्या उपासनेबद्दल आदर बाळगतील. परंतु असे पाहण्यात आले आहे, की यहोवाच्या सेवेसाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या ठिकाणांना भेट देणारे काही बंधू व भगिनी अगदीच कॅज्यूअल, गबाळ्या किंवा अंगप्रदर्शक वेशात येतात. अशा प्रकारचा पेहराव ख्रिश्चनांसाठी केव्हाही उचित नाही. आपल्या ख्रिस्ती जीवनाच्या इतर पैलूंप्रमाणे कपड्यांच्या बाबतीतही आपण ज्याने देवाचा गौरव होतो असा उच्च दर्जा बाळगू इच्छितो.—रोम १२:२; १ करिंथ. १०:३१.
तुम्ही मुख्यालयाला किंवा इतर शाखा दफ्तरांना भेट देण्याची योजना करता किंवा पर्यटन स्थळे पाहण्याच्या निमित्ताने सुटीवर असताना या ठिकाणांना भेट देण्याचे ठरवता तेव्हा पुढील प्रश्न स्वतःला विचारा: ‘मी ज्या ठिकाणांना भेट द्यायला जाणार आहे त्या ठिकाणांबद्दल मला मनापासून आदर आहे हे माझ्या कपड्यांवरून व केशरचनेवरून दिसून येते का? माझा पेहराव मी ज्याची उपासना करतो त्या देवाविषयी उत्तम साक्ष देतो का? मला पाहून इतर जण विचलित होतील किंवा अडखळतील का?’ आपला पेहराव आणि केशरचना यावरून आपण “सर्व गोष्टीत आपला तारणारा देव ह्याच्या शिक्षणास शोभा आणावी.”—तीत २:१०.