आपल्या क्षेत्रातील योग्य लोकांना शोधून काढणे
१ आमची राज्य सेवा याच्या जानेवारी २००८ च्या अंकातील एका खास पुरवणीत आपल्याला, आपल्या देशात आपल्या संदेशाप्रती लोकांच्या बदलत चाललेल्या मनोवृत्तीविषयी जागृत करण्यात आले होते. आणि या बदलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास मदत करण्याकरता देवाच्या वचनातील काही तत्त्वे आपल्या निर्देशनास आणून देण्यात आली होती. तुमच्या क्षेत्रात तुम्हाला हा बदल दिसून आला आहे का? आपला विरोध करणाऱ्या बहुतेक लोकांना असे वाटते, की आपण बळजबरीने लोकांचे धर्मांतर करण्याच्या कार्यात गोवलेलो आहोत व आपणही ख्रिस्ती धर्मजगतातील धर्मवेड्या लोकांसारखे आहोत. यामुळे ते लोकांना जमवून गोंधळ माजवतात आणि बंधूभगिनींना अटक करतात. पण आपण या सर्व गोष्टी होण्याचे कसे टाळू शकतो, निदान कमी करू शकतो? आपण ज्याप्रकारे लोकांबरोबर संभाषण सुरू करत होतो त्यात फेरबदल करण्याद्वारे आपण असे करू शकतो.
२ आपण लोकांबरोबर स्वतःहून आधी संभाषण सुरू करतो. मग ते घरोघरचे कार्य असो, दुकानांमधील साक्षकार्य असो किंवा अनौपचारिक साक्षकार्य असो लोकांनी आपल्याला बोलवलेले नसते. त्यामुळे, समोरच्या व्यक्तीला खरोखरच आपला संदेश ऐकून घेण्यात आवड आहे किंवा नाही, की आपण अशा व्यक्तीबरोबर तर बोलत नाही जी हिंसक बनू शकेल किंवा आपल्या विरुद्ध लोकांना भडकवेल, हे आधी आपण पाहिले पाहिजे. तुमच्या क्षेत्रात सर्रासपणे लोक विरोध करत असतील तर असे करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे आपण विनाकारण त्रास ओढवून घेणार नाही. देवाचे वचन देखील आपल्याला असे करण्याचे प्रोत्साहन देते.—लूक १०:५, ६.
३ ज्यांना आध्यात्मिक मदत हवी आहे अशांना आपण कशा प्रकारे ओळखू शकतो? संभाषणाच्या सुरुवातीला आपण एखादा प्रश्न विचारू शकतो किंवा एखाद्या विषयाची सुरुवात करू शकतो आणि मग समोरच्या व्यक्तीची प्रतिक्रिया काय आहे ते पाहू शकतो. संभाषण सुरू केल्याबरोबर आपण थोड्या वेळापुरते तरी, बायबलचा किंवा कोणत्याही प्रकाशनाचा उल्लेख करू नये. तुम्ही ज्या व्यक्तीशी बोलत आहात तिला तुम्ही ख्रिस्ती आहात हे न सांगता, ती नेमकी कोणत्या प्रकारची व्यक्ती आहे हे तुम्हाला या वेळात ओळखता येईल. आणि संभाषणातच मध्यंतरी कधीतरी तुम्ही त्या व्यक्तीला, तिला संभाषण पुढे चालू ठेवायला आवडेल का, असे विचारू शकता. तिच्या हावभावांवरून किंवा ती जे काही बोलेल त्यावरून तुम्हाला जर समजले, की तिला संभाषण पुढे चालू ठेवायची इच्छा नाही तर तुम्हीही संभाषण तिथेच थांबवले पाहिजे. (मत्त. ७:६) तुम्ही लगेच संभाषण थांबवून, तुम्हाला तिने वेळ दिल्याबद्दल तिचे आभार मानून तेथून निघाले पाहिजे.
४ भविष्यात, आमची राज्य सेवा यात येणाऱ्या सादरता, सेवेमध्ये आपल्याला जो बदल करावा लागणार आहे त्यानुसार असतील. मंडळ्यांतील वडील वर्गांना असे उत्तेजन देण्यात आले आहे, की त्यांनी, हा बदल कितपत आवश्यक आहे याबाबतीत मंडळीतील इतर प्रचारकांचे काय मत आहे ते विचारावे. कारण, तुमच्या क्षेत्रात तुम्ही कितपत विरोधाचा सामना करता त्यावर हा बदल अवलंबून आहे.
५ येशूने आपल्या प्रेषितांना सेवेत पाठवण्याआधी त्यांना सांगितले: “ज्या ज्या नगरात किंवा गावात तुम्ही जाल त्यात कोण योग्य आहे हे शोधून काढा.” (मत्त. १०:११) लोक आपल्या संदेशाप्रती जी प्रतिक्रिया दाखवतात त्यावरून आपण पाहू शकतो, की सर्वच जण योग्य नाहीत. काही जण आपले बोलणे शांतीने ऐकून घेणार नाहीत. हे असे घडेलच याची येशूला खात्री होती त्यामुळे त्याने मत्तय १०:१२-१४ मध्ये लिहून ठेवलेल्या सूचना दिल्या. या सूचनांच्या अनुषंगाने, कोणत्याही प्रकारची चर्चा पुढे चालू ठेवण्याऐवजी आपण शांतीने तिथून निघाले पाहिजे; कारण, चर्चा चालू ठेवून समोरची व्यक्ती आणखीनच भडकू शकेल. त्या व्यक्तीचा न्याय यहोवाच्या धार्मिक स्तरांनुसार करण्याचे काम आपण यहोवाच्या हाती पूर्ण भरवशाने सोडून देऊ शकतो.