‘सुवार्ता निश्चितार्थाने सांगा’
१. आपण कोणत्या सुवार्तेची घोषणा करतो?
१ क्वचितच सुवार्ता ऐकायला मिळणाऱ्या जगात, आपल्याला ‘देवाच्या कृपेची सुवार्ता निश्चितार्थाने सांगण्याचा’ विशेषाधिकार मिळाला आहे. (प्रे. कृत्ये २०:२४) सुवार्ता सांगताना आपण लोकांना हेही सांगतो, की ‘शेवटल्या दिवसांनंतर’ यहोवाचे धार्मिक नवे जग येईल ज्यात “पहिल्या गोष्टी” अर्थात दुष्ट जगाच्या गोष्टी नसतील. (२ तीम. ३:१-५; प्रकटी. २१:४) या नवीन जगात आजारपण नसेल. (यश. ३३:२४) मृत प्रिय जन कबरांतून बाहेर येतील आणि ज्यांच्यापासून त्यांची ताटातूट झाली होती त्या आपल्या कुटुंबांना व मित्रपरिवाराला पुन्हा भेटतील. (योहा. ५:२८, २९) संपूर्ण पृथ्वीचे एका सुंदर नंदनवनात रूपांतर होईल. (यश. ६५:२१-२३) अनेक चांगल्या गोष्टींचा समावेश असलेल्या सुवार्तेतील या फक्त काही गोष्टी आहेत ज्यांची आपल्याला घोषणा करायची आहे!
२. स्मारकविधीचा काळ सुवार्तेची साक्ष देण्याकरता उत्तम संधी का आहे?
२ मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यांत सुवार्तेची घोषणा करण्याच्या उत्तम संधी उपलब्ध आहेत. या महिन्यांतील हवामान चांगले असल्यामुळे व दिवस मोठा असल्यामुळे, जगातील अनेक भागातील बंधूभगिनींना अधिक वेळ सेवा करणे शक्य होते. शिवाय, वर्षाचा सर्वात महत्त्वाचा प्रसंग अर्थात स्मारकविधी संपूर्ण जगभर शनिवार, मार्च २२ रोजी सूर्यास्तानंतर साजरा केला जाईल. सेवेमध्ये अधिक सहभाग घेण्याकरता योजना करण्यास आतापासूनच सुरुवात केलेली बरी.
३. कुटुंब या नात्याने सेवेतील सहभाग आपण कसा वाढवू शकतो?
३ साहाय्यक पायनियरींग: एक अथवा दोन्ही महिन्यांसाठी साहाय्यक पायनियरींग करता यावी म्हणून तुम्ही आपल्या वेळापत्रकात काही फेरबदल करू शकाल का? तुमच्या पुढील कौटुंबिक अभ्यासाच्या वेळी यावर विचारविमर्श करायला काय हरकत आहे? कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांना उत्तमरीत्या सहकार्य दिल्यास घरातील एक अथवा अधिक सदस्य कदाचित साहाय्यक पायनियरींग करू शकतील. (नीति. १५:२२) याबाबतीत प्रार्थना करा आणि यहोवा तुमच्या प्रयत्नांवर कसा आशीर्वाद देईल ते पाहा. (नीति. १६:३) कुटुंबातील कोणीही साहाय्यक पायनियरींग करू शकत नसेल तर कुटुंबातील सर्वजण, जे पायनियरींग करू शकतात त्यांच्याबरोबर सेवेत जाऊन सेवेमधील आपला सहभाग वाढवण्याकरता विशिष्ट ध्येये ठेवू शकतात.
४. आपण जर पूर्ण वेळेची नोकरी करत असू तर साहाय्यक पायनियरींग करता यावी म्हणून आपण आपल्या वेळेचे नियोजन कसे करू शकतो?
४ तुम्ही जर पूर्ण वेळेची नोकरी करत असाल तर तुमच्या वेळेचे योग्य नियोजन तुम्हाला साहाय्यक पायनियरींग करण्यास मदत करू शकेल. कदाचित तुम्ही तुमच्या जेवणाच्या सुटीतील काही वेळ प्रचारकार्यासाठी वापरू शकता. किंवा, तुम्ही तुमच्या घराच्या जवळील किंवा नोकरीच्या जवळील एखादे स्वतंत्र क्षेत्र मागू शकता व कामाच्या आधी किंवा नंतर एखाद-दोन तास तिथे सेवा करू शकता. अथवा, तुम्ही तुमच्या वेळेमध्ये फेरबदल करू शकता जसे की जास्त महत्त्वाची नसलेली कामे दुसऱ्या महिन्यात करण्याची व्यवस्था करू शकता व शनिवार-रविवारी क्षेत्र सेवेत जास्त वेळ घालवू शकता. काही जण, क्षेत्र सेवेत भाग घेता यावा म्हणून महिन्यातून एक अथवा दोन दिवसांची रजा घेऊ शकले आहेत.
५. वृद्ध अथवा आजारी बंधूभगिनींना तुम्ही साहाय्यक पायनियरींग करण्याकरता कशा प्रकारे मदत करू शकता?
५ तुम्ही जर वृद्ध आहात किंवा आजारी आहात किंवा दुर्बल आहात तर दररोज थोडा वेळ क्षेत्र सेवेत खर्च करून तुम्ही साहाय्यक पायनियरींग करू शकाल. ‘पराकोटीचे सामर्थ्य’ देण्याकरता यहोवाला विनंती करा. (२ करिंथ. ४:७) एक भगिनी वयाच्या १०६ व्या वर्षी साहाय्यक पायनियरींग करू शकली! तिच्या ख्रिस्ती नातेवाईकांच्या व मंडळीतील इतर बंधूभगिनींच्या साहाय्याने ती घरोघरचे प्रचार कार्य करू शकली, पुनर्भेटी व बायबल अभ्यासांना जाऊ शकली आणि क्षेत्र सेवेच्या इतर पैलूंमध्ये भाग घेऊ शकली. तिने दहा लोकांबरोबर बायबल अभ्यास सुरू करण्यास मदत केली. “माझ्यासारख्या म्हातारीला साहाय्यक पायनियरींग करण्याचा अद्भुत विशेषाधिकार मिळाल्याबद्दल माझं हृदय, यहोवा, त्याचा पुत्र आणि यहोवाची प्रेमळ संघटना यांच्याबद्दल प्रेमानं व कृतज्ञतेनं उचंबळून येतं. मला मनापासून, ‘यहोवा बाप्पा तुझे आभार मानते,’ असं म्हणावसं वाटतं.”
६. शाळेत जाणाऱ्या बाप्तिस्मा घेतलेल्या तरुणांना साहाय्यक पायनियरींग करणे कसे शक्य आहे?
६ तुम्ही जर शाळेत जाणारे बाप्तिस्मा घेतलेले तरुण असाल तर तुम्ही देखील साहाय्यक पायनियरींग करू शकता. पूर्ण वेळ नोकरी करणाऱ्यांप्रमाणे तुम्हीसुद्धा कदाचित शनिवार-रविवार क्षेत्र सेवेसाठी खास वापरू शकता. इतर दिवशी कदाचित शाळेनंतर एखाद-दोन तास तुम्ही सेवेत जाऊ शकाल. शाळेत एखादा सुटीचा दिवस येतोय का? त्या दिवशी तुम्ही क्षेत्र सेवेत जाऊ शकता. तुमची साहाय्यक पायनियरींग करण्याची इच्छा असेल तर आईवडिलांना त्याविषयी सांगा.
७. स्मारकविधीच्या काळात सेवेत सहभाग घेण्याकरता बंधूभगिनींचा उत्साह वाढवण्यासाठी वडील जन काय करू शकतात?
७ उत्साह वाढवा: वडील जन स्वतःच्या उदाहरणाद्वारे मंडळीतील बंधूभगिनींचा उत्साह वाढवू शकतात. (१ पेत्र ५:२, ३) पहाटे, शाळेनंतर किंवा कामानंतर जे क्षेत्रात जाऊ इच्छितात अशांसाठी जादा क्षेत्र सेवा सभांच्या योजना करण्याचे ते ठरवतील. क्षेत्र सेवेत पुढाकार घेण्यास योग्य प्रचारकांना नेमण्यात आले आहे, क्षेत्र सेवेसाठी पुरेसे क्षेत्र आहे, महिन्यातील या खास कार्यात भाग घेणाऱ्यांसाठी पुरेशी मासिके, प्रकाशने आहेत यांची सेवा पर्यवेक्षक खात्री करतील.
८. एका मंडळीच्या उदाहरणावरून आपण काय शिकतो?
८ एका मंडळीतील वडिलांनी, अनेक महिन्यांच्या आधीपासूनच साहाय्यक पायनियरींग करण्याचे प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. किती प्रचारकांना साहाय्यक पायनियरींग करण्याची अनुमती देण्यात आली आहे त्यांची संख्या ते दर आठवडी मंडळीत सांगत असत. यामुळे, जे सेवेमध्ये आपला सहभाग वाढवू इच्छित होते त्यांना चांगले सहकार्य मिळेल याची खातरी मिळाली. पहाटे व संध्याकाळी जे क्षेत्र सेवा करू इच्छितात अशांसाठी क्षेत्र सेवा सभेच्या योजना करण्यात आल्या. परिणामतः, त्या मंडळीतील ५३ प्रचारक म्हणजे, निम्याहून अधिक प्रचारक एप्रिल महिन्यात साहाय्यक पायनियरींग करू शकले! ज्या ठिकाणी आपल्या कार्याचा विरोध होतो तेथील बांधवांना वडिलांकडील प्रोत्साहनाची खूप गरज असेल. एखाद्या सेवा सभेत पत्र, टेलिफोन वगैरे पद्धतींद्वारे सुवार्तेची साक्ष देण्याच्या पर्यायी मार्गांचे प्रदर्शन केले जाऊ शकते.
९. स्मारकविधीचा काळ हा, सुवार्तेचा प्रचार करण्यास पात्र ठरत असलेल्यांसाठी प्रचारक होण्यास उत्तम का आहे?
९ प्रचार करण्यास इतरांना मदत करा: नवीन जन व तरुण, प्रचारक बनण्यास पात्र ठरतात तेव्हा त्यांना अनुभवी प्रचारकांसोबत क्षेत्र सेवेत जाण्यास बोलवता येईल. ही संधी स्मारकविधीच्या काळात मंडळीतील बहुतेक जन क्षेत्र सेवेतील आपला सहभाग वाढवतात तेव्हा मिळू शकते. प्रगती करत असलेला तुमचा कोणी बायबल विद्यार्थी आहे का ज्याने यहोवाच्या दर्जांनुरूप आपल्या जीवनात बदल केले आहेत? तुमची, सद्वर्तनी व उत्तम प्रगती करणारी मुले आहेत का की ज्यांचा अद्याप बाप्तिस्मा झालेला नाही? अशांनी जर बाप्तिस्मा न घेतलेले प्रचारक होण्याची इच्छा व्यक्त केली असेल आणि ते तसे होण्यास पात्र आहेत, असे तुम्हाला वाटत असेल तर याविषयी एखाद्या वडिलांना सांगा. अध्यक्षीय पर्यवेक्षक याबाबत तुमच्यासोबत, तुमच्या मुलासोबत किंवा तुमच्या विद्यार्थ्यासोबत चर्चा करण्यास दोन वडिलांची योजना करतील.
१०. निष्क्रिय बनलेल्यांना मदत करण्याकरता वडील जन काय करू शकतात?
१० येणारे महिने, निष्क्रिय बनलेल्या प्रचारकांनी मंडळीत पुन्हा सक्रिय बनण्यासही उत्तम आहेत. मंडळीच्या पुस्तक अभ्यास पर्यवेक्षकांनी व इतर वडिलांनी अशा निष्क्रिय बंधूभगिनींना भेटून त्यांच्यासोबत सेवेत येण्याचे प्रेमळ आमंत्रण देण्याचा मेहनतीने प्रयत्न केला पाहिजे. हे बंधूभगिनी दीर्घकाळापासून निष्क्रिय असल्यास, दोन वडिलांनी आधी त्यांच्याशी बोलून, ते प्रचारात भाग घेण्यास पात्र आहेत किंवा नाही हे ठरवावे.—km-MR ११/०० पृ. ३.
११. कोणत्या तरतूदीद्वारे ‘देवाने आपली [अपात्र] कृपा’ मोठ्या उदारतेने दाखवली?
११ स्मारकविधीची तयारी: खंडणी बलिदानाची तरतूद करून ‘देवाने आपली [अपात्र] कृपा’ मोठ्या उदारतेने दाखवली. (प्रे. कृत्ये २०:२४) संपूर्ण जगभरातील कृतज्ञ लोक शनिवार, मार्च २२ रोजी सूर्यास्तानंतर ख्रिस्ताच्या मृत्यूचा स्मारकविधी साजरा करण्यासाठी एकत्र जमतील. मानवजातीवर यहोवाने केलेल्या अपात्र कृपेची प्रचिती आपल्या डोळ्यांनी पाहावी म्हणून सर्व प्रामाणिक मनाच्या लोकांना या महत्त्वपूर्ण प्रसंगाचे आमंत्रण देऊन त्यांना उपस्थित राहण्यास मदत करण्याची आपली इच्छा आहे.
१२. स्मारकविधीसाठी आपण कोणाकोणाला आमंत्रण दिले पाहिजे?
१२ आमंत्रितांची एक यादी तयार करा. या यादीत नक्कीच तुमच्या नातेवाईकांची, शेजाऱ्यांची, तुमच्याबरोबर काम करणाऱ्यांची किंवा शाळेतील तुमच्या मित्रमैत्रिणींची, पूर्वी व सध्या बायबल अभ्यास करत असलेल्यांची आणि तुम्ही ज्यांना नियमाने भेट देता त्यांची नावे असतील. तुम्ही ज्यांना आमंत्रण देता त्यांपैकी काही जण तुम्हाला स्मारकविधीविषयी प्रश्न विचारतील. तेव्हा तुम्ही, बायबल काय शिकवते पुस्तकाच्या पृष्ठे २०६-८ वरील परिशिष्टात प्रभूच्या सांज भोजनाविषयी असलेल्या लेखातील माहितीचा उपयोग करू शकता. यामुळे कदाचित तुम्हाला त्यांच्याबरोबर बायबल अभ्यास सुरू करता येईल. कारण, बायबल अभ्यास करण्यासाठी आपण ज्या प्रकाशनाचा उपयोग करतो ते प्रकाशन त्यांना दाखवण्याची तुम्हाला संधी मिळते.
१३. दोन प्रचारकांनी इतर लोकांना स्मारकविधीचे आमंत्रण देण्याकरता जे प्रयत्न केले त्यावर यहोवाने आशीर्वाद कसा दिला?
१३ एका भगिनीने ४८ कुटुंबांची यादी बनवली. ज्यांना ती आमंत्रण द्यायची तेव्हा यादीतील त्यांच्या नावापुढे ती फुली मारायची व तिने कोणत्या तारखेला त्यांना आमंत्रण दिले ते लिहायची. तिने आमंत्रण दिलेल्या लोकांपैकी २६ लोक स्मारकविधीसाठी आले तेव्हा तिला किती आनंद झाला! एका बांधवाने त्याच्या दुकानात काम करणाऱ्या एका मनुष्याला स्मारकविधीचे आमंत्रण दिले. हा मनुष्य पूर्वी एक पाळक होता. स्मारकविधीला तो उपस्थित राहिला आणि नंतर असे म्हणाला: “मी कॅथलिक चर्चमध्ये ३० वर्षांपासून होतो. या तीस वर्षांत मी जितकं शिकलो नाही तितकं मी बायबलविषयी या एका तासात शिकलो.” स्मारकविधीनंतर लगेच त्याने बायबल काय शिकवते पुस्तकातून अभ्यास करण्याची तयारी दाखवली.
१४. मार्च १ तारखेपासून संपूर्ण जगभरात कोणती मोहीम सुरू होईल?
१४ मोहीम: शनिवार, मार्च १ पासून सुरू होऊन मार्च २२ पर्यंत संपूर्ण जगभरात स्मारकविधीसाठी एक खास आमंत्रणपत्रिका वाटली जाईल. या महत्त्वपूर्ण मोहीमेत भाग घेण्याची सर्व प्रचारकांची इच्छा असेल. घरमालकाच्या दारात ही आमंत्रणपत्रिका टाकून देण्याऐवजी ती त्याच्या हातात दिलेली बरी. परंतु, तुमचे क्षेत्र खूप मोठे असेल तर घरी नसलेल्यांच्या दारात या पत्रिका इतरांना लगेच दिसणार नाहीत अशा प्रकारे ठेवण्याविषयी तुमच्या मंडळीतील वडील निर्णय घेतील. आणि शनिवार-रविवारी आपण नवीन नियतकालिके देऊ.
१५. आपण स्मारकविधीची आमंत्रणपत्रिका कशी देऊ शकतो?
१५ आपल्याजवळ आमंत्रणपत्रिकांचे वाटप करण्यासाठी जास्त वेळ नसल्यामुळे, संक्षिप्त शब्दांत घरमालकांबरोबर बोलणे उचित ठरेल. चेहऱ्यावर स्मित हास्य राहू द्या व उत्साहाने बोला. घरमालक आपले बोलणे ऐकून घेण्यास इच्छुक आहे असे दिसल्यावर तुम्ही कदाचित असे म्हणू शकता: “आम्ही तुमच्या कुटुंबाला व तुमच्या मित्रपरिवाराला मार्च २२ रोजी होणाऱ्या एका महत्त्वपूर्ण प्रसंगाचे आमंत्रण देण्याकरता आलो आहोत. ही तुमची पत्रिका. सविस्तर माहिती पत्रिकेवर आहे.” घरमालकाच्या मनात प्रश्न असतील. किंवा कदाचित तो आमंत्रणपत्रिका स्वीकारेल आणि आपण जरूर येऊ, असेही म्हणेल. त्याचे नाव व पत्ता लिहून घ्या व त्याला पुन्हा भेटण्याची योजना करा.
१६. स्मारकविधीचे आपल्या क्षेत्रातील लोकांना आमंत्रण देण्याचे महत्त्व कोणत्या अनुभवातून दिसून येते?
१६ गेल्या वर्षी एका सैनिकाला त्याच्या दाराजवळ स्मारकविधीची आमंत्रणपत्रिका दिसली. त्याला येण्याची इच्छा होती, पण त्याला त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून परवानगी घ्यावी लागणार होती. त्याने जेव्हा त्याच्या अधिकाऱ्याला ही पत्रिका दाखवली तेव्हा तो अधिकारी शांत झाला आणि मग म्हणाला, की त्याचे स्वतःचे आईवडील साक्षीदार आहेत आणि तो त्यांच्याबरोबर सभांना जात असे. त्याने या सैनिकाला फक्त परवानगीच दिली नाही तर तो स्वतःही त्याच्याबरोबर स्मारकविधीसाठी गेला!
१७. आपण देवाच्या अपात्री कृपेचा स्वीकार व्यर्थ होऊ देत नाही हे आपण कसे दाखवून देतो?
१७ तुमची कृतज्ञता कार्यातून दाखवा: जसजसा २००८ सालचा स्मारकविधीचा काळ जवळ येतो तसतसे आपण, यहोवाने आपल्या प्रत्येकाला दाखवलेल्या अपात्री कृपेवर मनन करू या. प्रेषित पौलाने असे लिहिले: “तुम्ही देवाच्या कृपेचा स्वीकार व्यर्थ होऊ देऊ नये.” (२ करिंथ. ६:१) आपण देवाच्या अपात्री कृपेचा स्वीकार व्यर्थ होऊ देत नाही हे आपण कसे दाखवून देतो? पौलाने लिहिले: “सर्व गोष्टींत देवाचे सेवक म्हणून आम्ही आपली लायकी पटवून देतो.” (२ करिंथ. ६:४) तेव्हा, यहोवाने दिलेल्या देणगीबद्दल आपण आपली कृतज्ञता, आपल्या उत्तम आचरणाद्वारे व सुवार्तेचा आवेशाने प्रचार करण्याद्वारे व्यक्त करतो. यंदाच्या स्मारकविधीच्या काळात आपल्याला क्षेत्र सेवेतील आपला सहभाग वाढवण्याची व ‘सुवार्ता निश्चितार्थाने सांगण्याची’ उत्तम संधी आहे.
[७ पानांवरील चौकट]
साहाय्यक पायनियरींग कोणकोण करू शकतील?
▪ कुटुंबे
▪ पूर्ण वेळेची नोकरी करणारे
▪ वृद्ध आणि आजारी असलेले
▪ शाळेत जाणारे
[८ पानांवरील चौकट]
स्मारकविधीची आमंत्रणपत्रिका देताना:
▪ थोडक्यात परंतु उत्साहाने बोला
▪ लोक आवड दाखवतात तेव्हा त्यांचे नाव, पत्ता लिहून घ्या आणि त्यांना भेटायला परत जा
▪ शनिवार-रविवारी नियतकालिके द्या