यहोवाच्या अद्भुत कार्यांचे वर्णन करीत राहा
१. यहोवाच्या अद्भुत कार्यांपैकी कोणती कार्ये तुम्हाला सर्वात जास्त बहुमोल वाटतात?
१ आपला महान देव यहोवा याच्या तुलनेत कोणीही नाही. दावीदाने लिहिले: “हे परमेश्वरा, माझ्या देवा, तू आम्हासाठी केलेली अद्भुत कृत्ये व आमच्याविषयीचे तुझे विचार पुष्कळ आहेत; तुझ्यासमोर कशाचीही तुलना करिता येणार नाही.” (स्तो. ४०:५, NW) यहोवाच्या अद्भुत कार्यांमध्ये, विश्वाची सृष्टी, मशीही राज्य, आपल्या लोकांप्रती त्याने केलेली प्रेमळ-दयेची कार्ये आणि संपूर्ण जगभरात होणारे प्रचारकार्य यांचा समावेश होतो. (स्तो. १७:७, ८; १३९:१४; दानी. २:४४; मत्त. २४:१४) यहोवाबद्दलचे प्रेम आणि त्याने आपल्यासाठी जे सर्व केले आहे त्याच्याबद्दलची कदर यांमुळे आपण त्याच्याबद्दल इतरांना सांगायला प्रवृत्त होतो. (स्तो. १४५:५-७) मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात आपल्याला असे अधिक प्रमाणात करण्याची संधी मिळेल.
२. साहाय्यक पायनियरींग केल्यामुळे स्वतःला फायदा कसा होतो?
२ साहाय्यक पायनियर या नात्याने: अधिक कार्य करण्याच्या या एक किंवा अनेक खास महिन्यांदरम्यान ५० तास सेवेत खर्च करण्याकरता तुम्ही तुमच्या आराखड्यात फेरफार करू शकाल का? तुमच्या नित्यक्रमात तुम्ही कोणताही फेरफार केला तर तो नक्कीच योग्य असेल. (इफिस. ५:१६) पुष्कळांना असे दिसून आले आहे, की साहाय्यक पायनियरींगमुळे त्यांना आपल्या सेवेत सुधारणा करण्यास मदत मिळते. ते घरमालकासमोर अधिक आत्मविश्वासाने बोलू शकतात आणि त्यांना बायबलचा उपयोग करण्याची अनेकदा संधी मिळते. सेवेमध्ये अधिक वेळ खर्च केल्याने त्यांना आवड दाखवणाऱ्या लोकांना भेट द्यायला सोपे जाते; शिवाय, आधी ज्यांनी बायबल अभ्यास संचालित केला नाही त्यांना साहाय्यक पायनियरींगच्या वेळी एक अभ्यास सुरू करता आला आहे. साहाय्यक पायनियरींग करण्यात, इतरांना मदत करणे समाविष्ट असल्यामुळे हे मनास आनंद देणारे कार्य आहे.—प्रे. कृत्ये २०:३५.
३. अशक्य वाटणाऱ्या परिस्थितीतही काहींनी साहाय्यक पायनियरींग कशी केली आहे?
३ माझ्या परिस्थितीमुळे मला पायनियरींग करणे शक्य नाही, असा लगेच निष्कर्ष काढू नका. गेल्या वर्षी एका वडिलांनी साहाय्यक पायनियरींग केली ज्यांना दोन मुले आहेत आणि त्यांना पूर्णवेळ नोकरी करावी लागते. इतके काम असूनही त्यांनी पायनियरींग कशी केली? आठवड्यादरम्यान त्यांना काम करावे लागत असल्यामुळे शनिवार-रविवारी त्यांनी सेवा लवकर सुरू करण्याचे ठरवले; शनिवारच्या दिवशी त्यांनी सकाळी ७ वाजताच रस्त्यावरील साक्षकार्याने सुरवात केली. या बांधवासारखीच मंडळीतील इतर अनेकांची परिस्थिती असलेल्यांनी देखील पायनियरींग केली, त्या सर्वांनी एकमेकांना साथ आणि उत्तेजन दिले. दुसऱ्या एका मंडळीत एका ९९ वर्षीय भगिनीने आपल्या मुलीच्या सांगण्यावरून मे महिन्यात तिच्यासोबत पायनियरींग करण्याचे ठरवले. मंडळीतील इतरांनी या भगिनीला तिच्या व्हीलचेअरवरून तिला घरोघरी जाण्यास व बायबल अभ्यासासाठी जाण्यास मदत केली. तिने टेलिफोनवरील साक्षकार्य, रस्त्यावरील साक्षकार्य, पत्राद्वारे साक्षकार्य देखील केले. तिची खात्री पटली की ती हे कार्य आपल्या शक्तीने नव्हे तर केवळ यहोवाच्या मदतीने करू शकली.—यश. ४०:२९-३१.
४. साहाय्यक पायनियरींग करण्यासाठी आराखडा तयार करताना आपण कोणकोणत्या गोष्टींचा विचार करू शकतो?
४ तुमच्या परिस्थितीनुसार एक आराखडा बनवण्याचा प्रयत्न करा. या अंकातील आराखड्यांचे नमुने कदाचित तुम्हाला साहाय्यक ठरू शकतील. तुम्ही पूर्ण-वेळ नोकरी करता किंवा शाळेला जाता का? मग, खासकरून शनिवार रविवार या दिवशी वेळेचा चांगला उपयोग करणारा आराखडा तुमच्याकरता सर्वात सोयीस्कर ठरेल. तुम्हाला आरोग्य समस्या असतील आणि तुम्हाला जास्त दिवस सेवेमध्ये घालवण्याची शक्ती नसेल तर दररोज थोडा वेळ सेवेमध्ये घालवता येईल असा आराखडा तयार करा. तुम्हाला साहाय्यक पायनियरींग करण्याची इच्छा आहे हे इतरांना बोलून दाखवा. तेही कदाचित साहाय्यक पायनियरींग करण्याचे ध्येय ठेवतील.
५. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांसाठी युवक कोणते ध्येय ठेवू शकतात?
५ कोणकोणत्या मार्गांनी युवकही भाग घेऊ शकतील: युवक जेव्हा आपल्या अद्भुत कार्यांचे वर्णन करतात तेव्हा यहोवाला खूप आनंद होतो. (स्तो. ७१:१७; मत्त. २१:२६) तुम्ही तरुण असाल व तुमचा बाप्तिस्मा झाला असेल तर तुम्ही कदाचित सुटीच्या वेळी एखादा महिना साहाय्यक पायनियरींग करू शकता. तुम्ही साहाय्यक पायनियरींग करू शकत नसाल तर या महिन्यांदरम्यान तुम्ही सेवेमध्ये अधिक भाग घेऊ शकाल का आणि तुमच्या सेवेचा दर्जा वाढवू शकाल का? तुम्ही कदाचित तुमच्या पालकांबरोबर सेवेमध्ये भाग घेत असाल; परंतु जर तुम्ही अद्याप बाप्तिस्मा न घेतलेले प्रचारक झाला नसाल तर आता त्यासाठी ही उचित वेळ आहे. तुम्हाला बायबलच्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देता आली पाहिजेत किंवा बाप्तिस्मा झालेल्या प्रौढांइतके तुम्हालाही ज्ञान असले पाहिजे, असा तुम्ही विचार करण्याची गरज नाही. तुम्हाला बायबलच्या मूलभूत शिकवणी समजतात का? तुम्ही बायबलच्या नैतिक दर्जांनुरूप जगत आहात का? तुम्हाला स्वतःची ओळख यहोवाचा साक्षीदार या नात्याने देण्याची इच्छा आहे का? मग याविषयी आपल्या पालकांबरोबर बोला. तुम्ही सर्व अपेक्षा पूर्ण करत आहात की नाही हे पाहण्यासाठी तुमचे पालक मंडळीतील वडिलांना सांगतील.—आमची सेवा पुस्तकाचे पृष्ठे ९८-९ पाहा.
६. बायबल विद्यार्थ्यांना सुवार्तेचा प्रचारक होण्यास आपण मदत कशी करू शकतो?
६ प्रचार करायला इतरांना साहाय्य करणे: प्रगती करणारे बायबल विद्यार्थी, खास कार्यांच्या आगामी महिन्यांदरम्यान प्रचारक या नात्याने आपल्यात सामील होऊ शकतात. तुमचा बायबल विद्यार्थी चांगली प्रगती करत असेल तर तुमच्या पुस्तक अभ्यास पर्यवेक्षकांची किंवा सेवा पर्यवेक्षकांची मदत घ्या. दोघांपैकी कोणीतरी, विद्यार्थ्याची प्रगती पाहण्याकरता तुमच्याबरोबर अभ्यासाला येऊ शकतील. विद्यार्थी पात्र असेल आणि प्रचारक होण्याची इच्छा बाळगत असेल तर अध्यक्षीय पर्यवेक्षक दोन वडिलांना तुम्हाला आणि तुमच्या विद्यार्थ्याला भेटण्यास सांगू शकतात. (टेहळणी बुरूज ऑगस्ट १, १९८९, पृष्ठ २० पाहा.) विद्यार्थ्याला मान्यता मिळाली की लगेचच त्याला तुमच्याबरोबर सेवेसाठी प्रशिक्षित करण्यास सुरवात करा.
७. निष्क्रिय व अनियमित प्रचारकांना कशाप्रकारे मदत केली जाऊ शकते?
७ पुस्तक अभ्यास पर्यवेक्षकांनी, त्यांच्या गटातील निष्क्रिय किंवा अनियमित असलेल्या प्रचारकांकडे खास लक्ष दिले पाहिजे. तुमच्याबरोबर सेवेमध्ये काम करण्यासाठी त्यांना व्यक्तिगत आमंत्रण द्या. ते खूप काळापासून अक्रियाशील असतील तर, ते सेवेमध्ये भाग घेण्याच्या योग्यतेचे आहेत की नाही हे पाहण्यासाठी दोन वडिलांनी आधी त्यांच्याशी बोलणे उचित ठरेल. (आमची राज्य सेवा नोव्हेंबर २००० अंकातील प्रश्न पेटी पाहा.) खास कार्यांच्या या महिन्यांदरम्यान मंडळीचा आवेश पाहून त्यांना सेवेमध्ये नियमित भाग घेण्याची प्रेरणा मिळू शकेल.
८, ९. खास कार्यासाठी बांधवांचा उत्साह वाढवण्याकरता वडील काय करू शकतात?
८ अधिक सहभाग घेण्याकरता आताच तयारी करा: वडिलांनो, साहाय्यक पायनियरींग करण्याकरता मंडळीचा आतापासूनच उत्साह वाढवण्यास सुरवात करा. तुमच्या प्रोत्साहक टिपणींद्वारे आणि उत्तम उदाहरणाद्वारे तुम्ही पुष्कळ काही करू शकता. (१ पेत्र ५:३) मंडळीचा मागील साहाय्यक पायनियरांचा उच्चांक किती होता? या वर्षी तो वाढवता येऊ शकतो का? पुस्तक अभ्यास पर्यवेक्षक आणि त्यांचे साहाय्यक यांनी, आपल्या गटातील सर्वांना सेवेमध्ये अधिक भाग घेण्यास उत्तेजन देण्याकरता विविध मार्ग शोधले पाहिजेत. सेवा पर्यवेक्षक जादा क्षेत्र सेवेच्या सभांचा आराखडा तयार करू शकतात. केलेल्या व्यवस्थेविषयी मंडळीला आगाऊ सांगा. सुयोग्य प्रचारक पुढाकार घेतील आणि सेवेच्या सभा वेळेवर सुरू होऊन समाप्त होतील याची खात्री करा. (आमची राज्य सेवा, सप्टेंबर २००१ अंकातील प्रश्न पेटी पाहा.) सेवा पर्यवेक्षकांनी क्षेत्र सेवेसाठी पुरेसे क्षेत्र, नियतकालिके, साहित्ये यांची व्यवस्था करावी.
९ गेल्या वर्षी एका मंडळीतील वडिलांनी साहाय्यक पायनियरींग करण्याचे उत्तेजन पूर्ण उत्साहाने देण्याचे खूपच आधीपासून सुरू केले; याचा परिणाम असा झाला की पुष्कळांनी पायनियरींगचे अर्ज भरून दिले. त्यांनी क्षेत्र सेवेच्या जादा सभांचे आयोजन केले—रस्त्यावरील साक्षकार्यासाठी सकाळी ५:३० वाजता एक सभा, शाळेतून घरी येणाऱ्यांकरता दुपारी ३:०० वाजता दुसरी सभा आणि कामाहून घरी आलेल्यांकरता संध्याकाळी ६:०० वाजता आणखी तिसरी सभा. याशिवाय, शनिवारच्या दिवशी क्षेत्र सेवेच्या तीन सभांचे आयोजन करण्यात आले. याचा परिणाम असा झाला, की एप्रिल महिन्यात मंडळीतील ६६ जणांनी साहाय्यक पायनियरींग केली!
१०. कुटुंबे, सेवेमध्ये सहभाग वाढवण्याची तयारी कशी करू शकतात?
१० येणाऱ्या महिन्यांसाठी वास्तविक ध्येये ठेवण्याकरता तुम्ही, आपल्या पुढील कौटुंबिक अभ्यासादरम्यान वेळ काढू शकता. उत्तम सहकार्य आणि योजना, यांमुळे कुटुंबातील काही किंवा कदाचित सर्वजण साहाय्यक पायनियरींग करू शकतील. तसे शक्य नसेल तर, अधिक वेळ सेवा करण्याद्वारे किंवा अधिक प्रसंगी प्रचाराला जाण्याद्वारे तुम्ही सेवेमध्ये सहभाग वाढण्याचे ध्येय ठेवू शकता. कुटुंब या नात्याने याविषयी प्रार्थना करा. यहोवा तुमच्या प्रयत्नांवर आशीर्वाद देईल, ही खात्री तुम्ही बाळगू शकता.—१ योहा. ३:२२.
११. (अ) ख्रिस्ताच्या बलिदानामुळे कोणकोणत्या अद्भुत गोष्टी साध्य करता आल्या? (ब) स्थानीय स्मारक विधीची वेळ आणि ठिकाण कोणते आहे?
११ देवाचे सर्वात अद्भुत कार्य: यहोवाच्या प्रेमाची सर्वात मोठी अभिव्यक्ती, त्याने आपल्याकरता दिलेल्या त्याच्या पुत्राच्या खंडणीची देणगी होय. (१ योहा. ४:९, १०) खंडणी बलिदान, पाप आणि मृत्यूपासून मानवजातीची सुटका करण्याकरता कायदेशीर आधार पुरवते. (रोम. ३:२३, २४) येशूने ओतलेल्या रक्तामुळे नवा करार खरा सिद्ध झाला आणि यामुळे अपरिपूर्ण मानवांना देवाचे पुत्र म्हणून दत्तक घेता आले व त्यांना स्वर्गीय राज्यात राज्य करण्याची आशा मिळाली. (यिर्म. ३१:३१-३४; मार्क १४:२४) सर्वात महत्त्वाचे म्हणजे, येशू पूर्णपणे आज्ञाधारक राहिल्यामुळे यहोवाचे नाव पवित्र झाले. (अनु. ३२:४; नीति. २७:११) रविवारी एप्रिल ४ रोजी सूर्यास्तानंतर संपूर्ण जगभरात ख्रिस्ताच्या मृत्यूचा स्मारकविधी साजरा केला जाईल.
१२. प्रभूचे सांजभोजन साजरे करताना आस्थेवाईक लोक उपस्थित राहिल्यास त्यांना फायदा कसा होऊ शकतो?
१२ प्रभूचे सांजभोजन साजरे केल्यामुळे यहोवाच्या अद्भुत कार्यांची महिमा होते. भाषणामुळे, खंडणी देण्याकरता यहोवाने काय काय केले त्याबद्दल कृतज्ञता वाढते. श्रोत्यांमधील आस्था दाखवणाऱ्या लोकांना देवाची इतर अद्भुत कार्ये पाहायला मिळतील. यहोवाने आपल्या लोकांना जी एकता आणि जे प्रेम प्रदर्शित करायला शिकवले आहे ते त्यांना पाहता येईल. (इफिस. ४:१६, २२-२४; याको. ३:१७, १८) या महत्त्वपूर्ण प्रसंगी उपस्थित राहिल्याने एखाद्या व्यक्तीच्या मनावर खोलवर प्रभाव पडू शकतो, त्यामुळे होता होईल तितक्या लोकांनी उपस्थित राहावे अशी आपली इच्छा आहे.—२ करिंथ. ५:१४, १५.
१३, १४. स्मारकविधीला तुम्ही कोणाला आमंत्रण दिले पाहिजे व का?
१३ इतरांना उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित करणे: तुम्ही ज्यांना आमंत्रण देऊ इच्छिता त्या सर्वांच्या नावाची यादी आताच तयार करा. यांत, सत्यात नसलेल्या नातेवाईकांची, शेजाऱ्यांची, शाळा किंवा कामाच्या ठिकाणी असलेल्या ओळखीच्या लोकांची, पूर्वी तुम्ही ज्यांच्याबरोबर बायबलचा अभ्यास केला होता किंवा सध्या करत आहात अशा विद्यार्थ्यांची, तुम्ही ज्यांना पुनर्भेटी दिल्या आहेत अशांची नावे असली पाहिजेत. पुस्तक अभ्यास पर्यवेक्षकांनी आपल्या यादीत, निष्क्रिय प्रचारकांच्या नावांचा समावेश करावा.
१४ छापील आमंत्रण पत्रिकांचा उपयोग करा आणि सुवाच्य अक्षरात त्यावर स्मारकविधीची वेळ आणि ठिकाण लिहावे. किंवा टेहळणी बुरूज मार्च १५, २००४ अथवा सावध राहा! मार्च २२, २००४ अंकांच्या मागील पृष्ठावरील आमंत्रणाचा तुम्ही उपयोग करू शकता. एप्रिल ४ तारीख जसजशी जवळ येते तसतसे तुमच्या यादीतील लोकांना व्यक्तीशः जाऊन अथवा टेलिफोनवरून आठवण करून द्या.
१५. स्मारकविधीच्या रात्री तुम्ही आदरातिथ्य कसे दाखवू शकाल?
१५ स्मारकविधीच्या प्रसंगी: स्मारकविधीच्या दिवशी लवकर येण्याचा प्रयत्न करा. नवीन आलेल्यांचे प्रेमाने अभिवादन करून त्यांना आदरातिथ्य दाखवा. (रोम. १२:१३) तुम्ही ज्यांना आमंत्रण दिले आहे त्यांच्याप्रती तुमची खास जबाबदारी आहे. त्यांचे प्रेमाने स्वागत करा आणि मंडळीतील इतरांशी त्यांची ओळख करून द्या. तुम्ही कदाचित त्यांना आपल्याजवळ बसवू शकता. त्यांच्याजवळ बायबल अथवा गीतपुस्तक नसेल तर तुमच्या किंवा दुसऱ्या कोणाच्या तरी बायबलमध्ये किंवा गीतपुस्तकात त्यांना पाहता येईल अशी व्यवस्था करा. स्मारकविधीनंतर, त्यांना काही प्रश्न विचारायचे असतील तर उत्तरे द्यायला तयार राहा. कोणी पहिल्यांदाच आले असेल तर त्यांना देवाच्या वचनाविषयी आणि उद्देशाविषयी आणखी माहिती हवी आहे का असे तुम्ही विचारू शकता. त्यांच्याबरोबर तुम्ही बायबलचा अभ्यास करू शकता हे त्यांना सांगा.
१६. स्मारकविधीला उपस्थित राहिलेल्यांना आध्यात्मिक प्रगती करण्यास मदत करण्याकरता काय केले जाऊ शकते?
१६ उपस्थित राहिलेल्यांना मदत करीत राहा: स्मारकविधीच्या नंतरच्या आठवड्यांमध्ये, जे उपस्थित राहिले होते त्यांना मदतीची आवश्यकता असेल. यामध्ये अशा लोकांचा समावेश असू शकेल जे पूर्वी सभांना नियमित उपस्थित राहत होते पण आता मंडळीबरोबर इतका सहवास राखत नाहीत. अशा लोकांकडे दुर्लक्ष होणार नाही याची वडीलजन खात्री करतील. या लोकांनी आध्यात्मिक प्रगती करण्याचे का थांबवले हे वडीलजन ठरवण्याचा प्रयत्न करतील. त्यांना काळाच्या निकडीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करा. (१ पेत्र ४:७) देवाच्या लोकांबरोबर नियमित सहवास राखण्याच्या संबंधाने शास्त्रवचनांत केलेल्या आर्जवाचे पालन केल्याने मिळणारे फायदे पाहण्यास सर्वांना मदत करा.—इब्री १०:२४, २५.
१७. आपण यहोवाच्या अद्भुत कार्यांविषयी लोकांना का सांगत राहिले पाहिजे?
१७ आपण चिरकाल जगणार असलो तरी, आपण यहोवाची अद्भुत कार्ये पूर्णपणे समजू शकणार नाही. (ईयो. ४२:२, ३; उप. ३:११) तेव्हा, यहोवाची स्तुती करण्याकरता आपल्याजवळ कारणे उरणार नाहीत असे कधीच होणार नाही. येणाऱ्या स्मारकविधीच्या काळात, सेवेत अधिक सहभाग घेण्याचा खास प्रयत्न करण्याद्वारे आपण यहोवाच्या अद्भुत कार्यांबद्दलची आपली कृतज्ञता व्यक्त करू शकतो.
[५ पानांवरील चार्ट]
यांपैकी कोणत्याही एका आराखड्याचा उपयोग करून तुम्ही साहाय्यक पायनियरींग करू शकता का?
मार्च रवि सोम* मंग* बुध* गुरू शुक्र शनि महिना एकूण
दररोज २ १ १ १ १ १ ५ ५१
दोन दिवशी ० ५ ० ५ ० ० ० ५०
फक्त शनिवारी -रविवारी ५ ० ० ० ० ० ८ ५२
शनिवारी-रविवारी आणि सप्ताहांतील दोन दिवशी २ ० ० २ ० २ ६ ५०
एप्रिल रवि सोम मंग बुध गुरू* शुक्र* शनि महिना एकूण
दररोज २ १ १ १ १ १ ५ ५०
दोन दिवशी ० ० ० ० ५ ५ ० ५०
फक्त शनिवारी -रविवारी ५ ० ० ० ० ० ८ ५२
शनिवारी-रविवारी आणि सप्ताहांतील दोन दिवस २ ० ० २ ० २ ६ ५०
मे रवि* सोम* मंग बुध गुरू शुक्र शनि* महिना एकूण
दररोज २ १ १ १ १ १ ४ ५१
दोन दिवशी ० ५ ० ० ० ० ५ ५०
फक्त शनिवारी -रविवारी ३ ० ० ० ० ० ७ ५०
शनिवारी-रविवारी आणि सप्ताहांतील दोन दिवस २ ० ० २ ० २ ५ ५१
* महिन्यातील पाच