प्रश्न पेटी
◼ बायबलमधून संशोधन करण्याकरता किंवा बायबलमधील विषयांवर वादविवाद करण्याकरता एकत्र येणाऱ्या साक्षीदारांच्या स्वतंत्र गटांना ‘विश्वासू व बुद्धिमान दासाची’ संमती आहे का?—मत्त. २४:४५, ४७.
नाही. पण तरीसुद्धा, जगातल्या अनेक भागांत आपल्या संघटनेच्या काही सदस्यांनी बायबलशी संबंधित विषयांवर स्वतंत्रपणे संशोधन करण्याकरता स्वतंत्र गट निर्माण केले आहेत. नवे जग भाषांतर कितपत अचूक आहे याचे विश्लेषण करण्यासाठी काहींनी बायबलमध्ये वापरलेल्या हिब्रू व ग्रीक भाषेचा सामुहिकरित्या अभ्यास करण्यासाठी गट निर्माण केले आहेत. इतर काहीजण बायबलशी संबंधित असलेल्या विज्ञानाच्या विषयांवर संशोधन करतात. आपल्या मतांची देवाणघेवाण करण्यासाठी व त्यांवर वादविवाद करण्यासाठी त्यांनी इंटरनेटवर संकेतस्थळे व चॅट रूम्स निर्माण केल्या आहेत. तसेच स्वतःच्या संशोधनातून काढलेले निष्कर्ष सादर करण्यासाठी त्यांनी ख्रिस्ती सभा व साहित्य यांतून पुरवल्या जाणाऱ्या माहितीच्या व्यतिरिक्त, स्वतंत्र चर्चासत्रे आयोजित केली आहेत व साहित्य देखील प्रकाशित केले आहे.
सबंध पृथ्वीवर यहोवाच्या लोकांना मंडळीच्या सभा, संमेलने, व अधिवेशने तसेच यहोवाच्या संघटनेच्या प्रकाशनांतून मुबलक प्रमाणात आध्यात्मिक मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले जाते. यहोवा आपल्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली व आपल्या सत्य वचनाच्या आधारावर देवाच्या लोकांना आवश्यक असलेले ज्ञान पुरवतो, जेणेकरून त्यांनी “एकचित्ताने व एकमताने जोडलेले व्हावे” व “विश्वासात दृढ” व्हावे. (१ करिंथ. १:१०; कल. २:६, ७) नक्कीच या शेवटल्या काळात यहोवाने पुरवलेल्या सर्व आध्यात्मिक आशीर्वादांबद्दल आपण कृतज्ञ आहोत. म्हणूनच कोणतेही साहित्य, चर्चासत्रे किंवा संकेतस्थळे जी ‘विश्वासू व बुद्धिमान दासाच्या’ देखरेखीखाली निर्माण किंवा आयोजित करण्यात आलेली नाहीत त्यांना ‘विश्वासू व बुद्धिमान दासाची’ संमती नाही.—मत्त. २४:४५-४७.
काही व्यक्तींना आपल्या वैचारिक क्षमतेचा उपयोग सुवार्तेच्या वाढीकरता करावासा वाटतो हे कौतुकास्पद आहे. पण येशू ख्रिस्त आज पृथ्वीवर आपल्या मंडळीच्या माध्यमाने जे साध्य करत आहे त्याचे महत्त्व कोणाच्याही वैयक्तिक प्रयत्नांमुळे कमी होता कामा नये. पहिल्या शतकात प्रेषित पौलाने ताकीद दिली होती की “जी ईश्वरी व्यवस्था विश्वासाच्या द्वारे आहे तिच्या उपयोगी न पडणाऱ्या, पण वाद मात्र उत्पन्न करणाऱ्या कहाण्यांकडे व अनंत वंशावळ्यांकडे” लक्ष देऊ नये. अशाप्रकारचे वादविवाद थकवणारे तर असतातच पण त्यांमुळे अमूल्य वेळही वाया जातो. (१ तीम. १:३-७) सर्व ख्रिश्चनांनी “मूर्खपणाचे वाद, वंशावळ्या, कलह व नियमशास्त्राविषयीची भांडणे ह्यांपासून दूर [राहावे] कारण ती निरूपयोगी व व्यर्थ आहेत.”—तीत ३:९.
ज्यांना सखोल बायबल अभ्यास व संशोधन करण्याची इच्छा आहे त्यांना आम्ही असा सल्ला देतो की त्यांनी शास्त्रवचनांवरील सूक्ष्मदृष्टी, “प्रत्येक शास्त्रवचन ईश्वरप्रेरित व लाभदायक” (इंग्रजी), तसेच दानीएल, यशया व प्रकटीकरण यांसारख्या बायबल पुस्तकांतील भविष्यवाण्यांवर चर्चा करणाऱ्या प्रकाशनांचा अभ्यास करावा. या प्रकाशनांत बायबल अभ्यास व मनन करण्याकरता भरपूर साहित्य आहे व त्याचा लाभ घेण्याद्वारे आपण “सर्व आध्यात्मिक ज्ञान व बुद्धी ह्यांच्याद्वारे [देवाच्या] इच्छेसंबंधीच्या पूर्ण ज्ञानाने भरले जावे; अशा हेतूने की, [आपण] सर्व प्रकारे प्रभूला संतोषविण्याकरिता त्याला शोभेल असे वागावे, म्हणजे प्रत्येक प्रकारच्या सत्कार्यांचे फळ द्यावे आणि देवाच्या पूर्ण ज्ञानाने [आपली] वृद्धि व्हावी.”—कलस्सै. १:९, १०.