कुटुंब मिळून यहोवाची उपासना करणे
१ बायबल काळांत, कौटुंबिक सदस्य अनेक गोष्टी एकत्र मिळून करत असत. दैनंदिन कामे आणि यहोवाची उपासना ते कुटुंब मिळून करत असत. (लेवी. १०:१२-१४; अनु. ३१:१२) आज, अनेक ठिकाणी कौटुंबिक सदस्य फार क्वचित अशी एकत्रितपणे काम करतात. परंतु, यहोवा देवाच्या उपासकांना, कुटुंब मिळून एकत्र काम करणे खासकरून यहोवा देवाची उपासना कुटुंब मिळून करणे किती महत्त्वाचे आहे याची जाणीव आहे. कुटुंबे ऐक्याने यहोवाची उपासना करत असल्याचे जेव्हा तो पाहतो तेव्हा त्याला किती आनंद वाटत असेल, नाही का?
२ प्रचार कार्याला एकत्र जाणे: सुवार्तेच्या प्रचार कार्याला कुटुंब एकत्र गेल्यामुळे कुटुंबातील बंधने आणखी मजबूत होतात. त्यामुळे एक वडील, मंडळीतल्या इतरांबरोबर प्रचार कार्याला जाण्यासोबतच, आपली पत्नी व आपल्या मुलांबरोबरही नियमितरीत्या प्रचार कार्यात जातात. (१ तीम. ३:४, ५) प्रवासी पर्यवेक्षकांचा सप्ताहाचा आराखडा अगदी जाम असला तरीसुद्धा ते आपल्या पत्नीसोबत प्रचार कार्यात जाण्याची योजना करतात.
३ आपल्या मुलांबरोबर प्रचार कार्याला जाणारे पालक त्यांना सुवार्तिक बनण्यास मदत करू शकतात. पालकांना सेवेद्वारे किती आनंद व समाधान मिळत आहे केवळ हीच गोष्ट मुले पाहणार नाहीत तर, यहोवा आणि सहमानवांबद्दल आपल्या पालकांना किती प्रेम आहे हेही त्यांना दिसून येईल. (अनु. ६:५-७) या गोष्टीचा फायदा मुले मोठी झाल्यावरही होतो. एका जोडप्याला १५ ते २१ या वयोगटातील तीन मुले आहेत. ते नियमितरीत्या या तिघांना सेवेमध्ये आपल्यासोबत घेऊन जातात. या कुटुंबातील पित्याने म्हटले: “आम्ही प्रत्येक वेळी त्यांना काहीतरी नवीन असे शिकवतो. आणि सेवेत भाग घेणे हा त्यांच्यासाठी आनंदविणारा, प्रोत्साहनदायक अनुभव ठरेल, याची आम्ही खात्री करत असतो.”
४ एकत्र मिळून तयारी करणे: सेवेची तयारी एकत्र केल्याने देखील फायदा होतो, असे अनेक कुटुंबांच्या पाहण्यात आले आहे. मुलांना, कुटुंबातील सदस्यांबरोबर घरमालक बनून सराव करणे अतिशय आवडते. काही कुटुंबात, कौटुंबिक अभ्यासानंतर काही मिनिटांसाठी असा सराव केला जातो.
५ आपण ज्यांच्यावर प्रेम करतो अशांबरोबर जेव्हा आपण महत्त्वाच्या व समाधान देणाऱ्या कार्यांत भाग घेतो तेव्हा आपला आनंद द्विगुणित होतो. कुटुंब मिळून सेवा कार्याला जाणे, घरोघरच्या कार्यात भाग घेणे तसेच पुनर्भेटींना व बायबल अभ्यासांना जाणे खरोखरच किती आनंदविणारे आहे. तुम्ही जेव्हा तुमच्या कुटुंबाबरोबर अशाप्रकारे यहोवाची उपासना करता तेव्हा तुम्ही आनंदाने असे म्हणू शकता: “मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार.”—यहो. २४:१५.