आदरयुक्त वर्तनाद्वारे ख्रिस्ताचे अनुकरण करा
१. या वर्षीच्या अधिवेशनाच्या मुख्य विषयाचा आदरयुक्त वर्तनाशी काय संबंध आहे?
१ बायबलमध्ये विश्वाच्या सार्वभौम प्रभू यहोवाबद्दल असे म्हटले आहे की “तू मान व महिमा ह्यांनी मंडित आहेस.” (स्तो. १०४:१) येशू नेहमी अशाचप्रकारे वागला व बोलला की जेणेकरून त्याच्या पित्याचा व त्याच्या पित्याने केलेल्या तरतुदींचा सन्मान व आदर व्हावा. (योहा. १७:४) “ख्रिस्ताचे अनुकरण करा!” या येत्या प्रांतीय अधिवेशनांदरम्यान आपल्याला येशूचे अनुकरण करण्याच्या व यहोवाचा सन्मान करण्याच्या अनेक संधी मिळतील.
२. अधिवेशनाच्या प्रत्येक सत्राला उपस्थित राहण्याकरता आपण जी तयारी करतो त्यामुळे आपण यहोवाचा कशाप्रकारे सन्मान करू शकतो?
२ आदरयुक्त उपासना: यहोवाने आपल्याकरता तयार केलेल्या मेजवानीचा आस्वाद घेण्याकरता उपस्थित राहण्याद्वारे आपण त्याचा सन्मान करू शकतो. अधिवेशनाच्या तिन्ही दिवशी, शुक्रवारीसुद्धा, उपस्थित राहता यावे म्हणून तुम्ही आपल्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आहे का आणि इतर आवश्यक व्यवस्था केल्या आहेत का? बसायला जागा मिळण्याकरता आणि सुरुवातीच्या गीत व प्रार्थनेकरता उपस्थित राहण्याकरता वेळेवर अधिवेशनाच्या ठिकाणी पोचता यावे म्हणून तुम्ही आवश्यक व्यवस्था केली आहे का? दुपारी अधिवेशनाच्या ठिकाणीच बांधवांच्या सहवासात दुपारचे भोजन करता यावे म्हणून तुम्ही योग्य व्यवस्था व नियोजन केले आहे का? प्रत्येक सत्राच्या सुरुवातीला संगीत सुरू होण्याअगोदर कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्याला आपापल्या जागेवर बसायला सांगतात. ही सूचना मिळताच आपण लगेच आपले संभाषण संपवून आपल्या जागेवर बसले पाहिजे.
३. कार्यक्रमाकडे एकाग्र होऊन लक्ष दिल्याने आपण आपल्या उपासनेबद्दल आदर कशाप्रकारे व्यक्त करतो?
३ कार्यक्रमाकडे एकाग्र होऊन लक्ष देण्याद्वारेही आपण आपल्या स्वर्गीय पित्याविषयी आदर व्यक्त करतो. एका ठिकाणी प्रांतीय अधिवेशनाला उपस्थित राहिल्यानंतर एका पत्रकाराने असे लिहिले की या अधिवेशनाला जाणारी कोणतीही व्यक्ती “तेथे उपस्थित असलेल्यांची आदर्श वागणूक पाहून, चाललेल्या कार्यक्रमाकडे ते कशाप्रकारे शांतपणे व आदरपूर्वक लक्ष देतात हे पाहून व त्यांच्यामध्ये सहज दिसून येणारी आध्यात्मिक वृत्ती पाहून” निश्चितच प्रभावित झाल्याशिवाय राहणार नाही. या पत्रकाराने असेही लिहिले की “आश्चर्याची गोष्ट म्हणजे येथे बरीच लहान मुले देखील उपस्थित होती . . . आणि गंमत म्हणजे इतकी मुले असूनही कोठेही दंगामस्ती चाललेली नव्हती. उलट, बरीच मुले पवित्र बायबलमधून वचने उघडण्यात दंग होती.” कार्यक्रम सुरू असताना, गरज नसताना इतरांशी बोलणे, फोनवरून एकमेकांना एसएमएस पाठवणे, खाणे, इकडे-तिकडे फिरणे योग्य नाही. मुलांना आईवडिलांनी स्वतःजवळ बसवले पाहिजे. यामुळे ते आपल्या मुलांना कार्यक्रमापासून पूर्ण फायदा करून घेण्यास मदत करू शकतील. (अनु. ३१:१२; नीति. २९:१५) या सर्व सूचनांचे आपण पालन करतो तेव्हा आपण हे दाखवतो की आपल्याला इतरांबद्दल, तसेच अधिवेशनात पुरवल्या जाणाऱ्या महत्त्वपूर्ण आध्यात्मिक अन्नाबद्दल आदर वाटतो.
४. अधिवेशनाला जाताना आपण आदरयुक्त पेहराव का करावा?
४ आदरयुक्त पेहराव: “सर्व प्रसंगी आदरयुक्त वर्तन राखा” या मागच्या वर्षीच्या प्रांतीय अधिवेशनातील भाषणाबद्दल बऱ्याच जणांनी प्रशंसा व्यक्त केली. या भाषणात देवाच्या सेवकांना आपल्या पेहरावातून व केशभूषेतूनही कशाप्रकारे ख्रिस्ती आदर व्यक्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे यावर भर देण्यात आली. या वर्षीही आपण या विषयाकडे गांभिर्याने लक्ष दिले पाहिजे. आपल्या पेहरावावरून यहोवाबद्दल व त्याचे साक्षीदार असण्याच्या बहुमानाबद्दल आपल्याला किती कदर आहे हे आपण दाखवतो. आपण नेहमी असाच पेहराव करावा की जो “देवभक्ति स्वीकारलेल्या” व्यक्तींना शोभेल.—१ तीम. २:९, १०.
५. अधिवेशनाच्या शहरात असताना कार्यक्रमानंतरच्या वेळेतही आपण आदरयुक्त पेहराव कशाप्रकारे करू शकतो?
५ आपला पेहराव फक्त अधिवेशनाला उपस्थित राहतानाच आदरयुक्त असावा का? आपण अधिवेशनाच्या शहरात असू तेव्हा बरेच जण आपले अधिवेशनाचे बॅज कार्ड पाहतील. आपल्या पेहरावावरून आपण सर्वसामान्य लोकांत उठून दिसले पाहिजे. तेव्हा अधिवेशनानंतरही, उदाहरणार्थ आपण बाहेर जेवायला जातो तेव्हा आपला पेहराव देवाच्या सेवकांना व अधिवेशनाला उपस्थित राहण्याच्या उद्देशाने त्या शहरात आलेल्या व्यक्तींना शोभणाराच असावा. हे लक्षात घेऊन आपण जीन्स, शॉट्र्स, किंवा टी-शट्र्स घालू नयेत. आपल्या उत्तम पेहरावामुळे शहरातील लोकांना आपण किती चांगली साक्ष देऊ शकू! आपला पेहराव आपण देवाचे सेवक आहोत हे सिद्ध करतो तेव्हा यहोवाला आनंद वाटतो.
६. आदरयुक्त ख्रिस्ती वर्तनामुळे कोणते समाधानदायक परिणाम घडून येतात?
६ समाधानदायक परिणाम: अधिवेशनादरम्यान आदरयुक्त ख्रिस्ती वर्तनामुळे आपल्याला अनौपचारिकरित्या साक्ष देण्याच्या संधी मिळतात व आपल्याला पाहणाऱ्या लोकांवर यामुळे चांगला प्रभाव पडतो. एका अधिवेशनाच्या शेवटी एका अधिकाऱ्याने असे म्हटले: “इतके सुस्वभावी लोक आम्ही पहिल्यांदाच पाहतोय. देवाला आपल्या सर्वांकडून जशी अपेक्षा आहे तसेच तुमचे वर्तन आहे.” आदरयुक्त वर्तनाने आपण एकमेकांबद्दल सन्मान व प्रेम व्यक्त करतो आणि यहोवाचे गौरव करतो. (१ पेत्र २:१२) यातून आपल्याला देवाचे भय आहे आणि आपल्या पित्याकडून शिक्षण दिल्या जाण्याच्या बहुमानाची आपल्याला कदर वाटते हे दिसून येते. (इब्री १२:२८) या वर्षीच्या “ख्रिस्ताचे अनुकरण करा!” प्रांतीय अधिवेशनाची वाट पाहात असताना आपण आदरयुक्त वर्तन राखण्याचा प्रयत्न करू या.
[५ पानांवरील चौकट]
प्रांतीय अधिवेशनाच्या सूचना
▪ कार्यक्रमाची वेळ: तिन्ही दिवशी कार्यक्रम सकाळी ९:२० वाजता सुरू होईल. सभागृहाचे दरवाजे सकाळी ८:०० वाजता उघडले जातील. सुरुवातीचे राज्य संगीत सुरू होते तेव्हा सर्वांनी आपापल्या जागेवर बसावे जेणेकरून कार्यक्रमाची सुरुवात आदरणीय पद्धतीने होईल. कार्यक्रम, शुक्रवारी व शनिवारी संध्याकाळी ५:०५ वाजता आणि रविवारी ४:१० वाजता संपेल.
▪ पार्किंग: अधिवेशन होणाऱ्या सर्व ठिकाणी, पार्किंगची सोय असेल; गाड्या जसजशा येतील तसतसे त्यांना पार्किंगसाठी जागा दिली जाईल. अधिवेशनाचा बॅज कार्ड पार्किंगसाठी ओळखपत्र असेल. केवळ अपंग व्यक्तींच्या गाड्यांनाच त्यांच्याकरता आरक्षित असलेल्या ठिकाणी पार्क करू दिले जाईल. पार्किंगची जागा सहसा मर्यादित असते त्यामुळे, ज्या बंधूभगिनींकडे स्वतःच्या कार आहेत ते कारपूलिंग करू शकतात. म्हणजे, फक्त एकाने किंवा दोघांनी स्वतःच्या कारने येण्याऐवजी, ज्या इतर बंधूभगिनींकडे देखील कार आहेत अशांना आपल्या कारमध्ये येण्यास सांगू शकतात. यामुळे कार पार्किंगची समस्या कमी होऊ शकेल.
▪ आसने राखणे: तुमच्यासोबत एकाच कारमधून आलेल्या किंवा एकाच घरात तुमच्याबरोबर राहणाऱ्या व्यक्तींसाठीच केवळ आसने राखून ठेवली जावीत.
▪ दुपारचे भोजन: दुपारच्या जेवणासाठी अधिवेशन स्थळ सोडून बाहेर जाण्याऐवजी कृपया सोबत साधे जेवण आणा. तुमच्या आसनाखाली बसेल अशाच आकाराची पाण्याची बाटली आणावी. पिकनिकसाठी असलेल्या पाण्याचे मोठे कूलर, बाटल्या किंवा मद्य अधिवेशनाच्या ठिकाणी आणण्यास मनाई आहे.
▪ देणग्या: प्रांतीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात बऱ्यापैकी खर्च होतो. आपल्या राज्य सभागृहात किंवा अधिवेशनात जगभरात चाललेल्या कार्यासाठी असलेल्या देणग्यांच्या पेट्यांमध्ये आपण देणग्या टाकून आपली कृतज्ञता व्यक्त करू शकतो. अधिवेशनात दिलेले चेक “वॉच टावरला” देय केले पाहिजे.
▪ अपघात आणि तातडीचे प्रसंग: अधिवेशनाच्या ठिकाणी तातडीचा उपचार देणाऱ्या विभागांनी अशी तक्रार केली आहे की त्यांना अगदी लहानसहान समस्यांकरताही फोन येतात. आणीबाणीची वैद्यकीय परिस्थिती निर्माण झाल्यास कृपया जवळच्या अटेंन्डेंटला कळवावे. तो लगेच प्राथमिक उपचार विभागाशी संपर्क साधेल आणि आपल्यापैकी प्रशिक्षित वैद्यकीय बंधू अथवा भगिनी परिस्थिती किती गंभीर आहे हे अजमावून पाहतील आणि त्यानुसार मदत देतील. आवश्यकता असल्यास १०२ क्रमांकाशी संपर्क साधला जाईल.
▪ कर्णबधिर: केवळ बेंगळूर येथील इंग्रजी अधिवेशनात अमेरिकन संकेत भाषेत कार्यक्रमाचे भाषांतर केले जाईल.
▪ रेकॉर्डिंग: अधिवेशनाच्या साऊण्ड सिस्टमला किंवा वीज उपकरणांना कोणत्याही प्रकारचे रेकॉडर्स जोडू नयेत. तसेच इतरांचे लक्ष विचलित होणार नाही अशाप्रकारे त्यांचा उपयोग करावा.
▪ अत्तरे: काही अधिवेशने बंद ठिकाणी होत असल्यामुळे यंत्राच्या साहाय्याने हवा खेळती ठेवण्याची सोय केली जाते. यास्तव, आपण खूपच उग्र अत्तरे, कोलोन व परफ्यूम वापरण्याचे टाळून इतरांप्रती दया दाखवतो; ज्यांना श्वसनाचे व श्वसनसंबंधित इतर विकार आहेत त्यांना उग्र स्वरूपाच्या वासांमुळे त्रास होण्याची शक्यता आहे.—१ करिंथ. १०:२४.
▪ पुनःभेट द्या फॉर्म्स: अधिवेशनाच्या वेळी आपण अनौपचारिक साक्ष दिल्यानंतर जर कोणी आस्था दाखवली तर त्या व्यक्तीविषयीची माहिती देण्याकरता कृपया पुनःभेट द्या फॉर्मचा (S-43) उपयोग केला पाहिजे. प्रचारकांनी अधिवेशनाला येताना एक किंवा दोन पुनःभेट द्या फॉर्म्स सोबत आणावेत. अधिवेशनात बुकरूम विभागातही हे फॉर्म उपलब्ध असतील. पूर्ण भरलेले फॉर्म एकतर बुकरूमला दिले जाऊ शकतात किंवा अधिवेशनाहून परतल्यावर तुमच्या मंडळीतल्या सचिवांना दिले जाऊ शकतात.—आमची राज्य सेवा फेब्रुवारी २००५, पृ. ६ पाहा.
▪ रेस्टॉरंट: अनेक ठिकाणी, रेस्टॉरंटमध्ये दिल्या जाणाऱ्या सेवेसाठी १० ते १५ टक्के टिप्स देण्याची प्रथा आहे.
▪ हॉटेल्स: (१) तुम्हाला जितक्या खोल्या लागणार आहेत त्याच्यापेक्षा अधिक खोल्यांचे कृपया आरक्षण करू नका; आणि जितक्या लोकांना एका खोलीत राहण्याची परवानगी आहे त्याच्यापेक्षा अधिक लोकांना खोलीत राहायला घेऊ नका. (२) तुम्हाला जर तुमचे आरक्षण रद्द करायचे असेल तर कृपया हॉटेलला लवकरात लवकर कळवा. (३) तुम्हाला लागेल तेव्हाच केवळ लगेज कार्ट घ्या आणि काम झाल्यावर लगेच परत द्या म्हणजे इतरांची गैरसोय होणार नाही. (४) स्वयंपाक करण्याची परवानगी नसलेल्या खोल्यांमध्ये स्वयंपाक करू नका. (५) प्रत्येक दिवशी हाऊसकीपरला बक्षीस द्या. (६) आपण ख्रिस्ती असल्यामुळे, हॉटेलमध्ये पाहुण्यांकरता मोफत पुरवल्या जाणाऱ्या गोष्टी, जसे की नाश्ता, कॉफी किंवा थंड पदार्थांचा गैरफायदा घेऊ नका. (७) हॉटेलच्या कर्मचाऱ्यांशी वागताना सर्ववेळी आत्म्याचे फळ प्रदर्शित करा. (८) हॉटेलांच्या नावांच्या यादीत दाखवलेले खोल्यांचे भाडे हे दर दिवसाचे भाडे आहे, पण यात टॅक्सचा समावेश नाही. जर हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी, तुम्ही न मागवलेल्या किंवा न वापरलेल्या गोष्टींचे अतिरिक्त पैसे मागितल्यास ते देऊ नका आणि लवकरात लवकर अधिवेशनातील रूमिंग विभागाला याविषयी कळवा. (९) जर तुमच्या हॉटेलच्या खोलीसंबंधी काही समस्या निर्माण झाली तर रुमिंग विभागाला अधिवेशनातच याविषयी सांगा.