“ख्रिस्ताच्या पावलांवर पाऊल ठेवून चाला” प्रांतीय अधिवेशनाची जागतिक जाहिरात मोहीम
पुन्हा एकदा एका विशेष पत्रिकेचे वितरण
१ मागच्या वर्षी, “मुक्तिसमय जवळ आहे!” या प्रांतीय अधिवेशनाच्या जागतिक जाहिरात मोहिमेचा आस्थेवाईक लोकांवर अतिशय प्रभावकारी परिणाम झाला. या निमंत्रणाचा स्वीकार करून जे अधिवेशनाला आले त्यांना पहिल्यांदा यहोवाच्या साक्षीदारांसोबत एका आध्यात्मिक मेजवानीचा प्रत्यक्ष आस्वाद घ्यायला मिळाला. (यश. ६५:१३) त्यांना आपल्या प्रेमळ, एकजूट ख्रिस्ती बंधुवर्गाच्या सहवासाचा आनंद लुटायला मिळाला. (स्तो. १३३:१) “ख्रिस्ताच्या पावलांवर पाऊल ठेवून चाला” प्रांतीय अधिवेशनालाही उपस्थित राहण्यास जास्तीत जास्त लोकांना मदत करण्याकरता आपण पुन्हा एकदा सबंध जगात एक विशेष पत्रिका वितरित करण्याच्या मोहिमेत सहभाग घेणार आहोत.
२ मागच्या वर्षीचे काही अनुभव: सबंध जगातून मिळालेल्या वृत्तांवरून असे म्हणता येते की “मुक्तिसमय जवळ आहे!” प्रांतीय अधिवेशनाची जाहिरात केल्यामुळे अतिशय उत्कृष्ट परिणाम दिसून आले. बऱ्याच ठिकाणी साक्षीदारांना वृत्तपत्रांत सकारात्मक प्रसिद्धी मिळाली. उदाहरणार्थ, एका शहरात एका वृत्तपत्राने या मोहिमेविषयी सहा रकान्यांचा लेख प्रसिद्ध केला. त्यात असे म्हटले होते: “अधिवेशनाआधी सर्व लोकांपर्यंत पोचण्याकरता या परिसरात साक्षीदार खास प्रयत्न करत आहेत—जास्त तास काम करत आहेत, दूरदूरपर्यंत जात आहेत आणि लोकांशी अगदी थोडक्यात बोलत आहेत.” पत्रिकेच्या सुसंघटित वितरणामुळे दुसऱ्या एका शहरातील प्रसिद्धी माध्यमाचे कुतूहल जागृत झाले आणि त्यांनी या मोहिमेचे सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले. अधिवेशनाआधी या शहरात कमीतकमी तीन वृत्तपत्रांनी आपल्या कार्याविषयी सकारात्मक भाष्य केले. एका पत्रकाराने वृत्तपत्राच्या रविवारच्या आवृत्तीत तब्बल दोन पाने व्यापणारे अनेक सविस्तर लेख लिहिले. यांत आपल्या विश्वासांबद्दल, आपल्या बंधुसमाजाबद्दल, पत्रिकेच्या वितरणाबद्दल आणि अधिवेशनाबद्दल माहिती देण्यात आली. एका घरात प्रचारकाने एका स्त्रीला अधिवेशनाची निमंत्रण पत्रिका दिली तेव्हा ती म्हणाली: “हो, मी आताच पेपरमध्ये याविषयी वाचत होते!” दुसऱ्या एका स्त्रीने म्हटले: “मी आताच तुमच्या या मोहिमेविषयी वाचत होते, आणि तुम्ही आलातसुद्धा! ही पत्रिका माझ्यासाठी का?” मग ती म्हणाली, “तुम्ही यहोवाचे साक्षीदार खरंच हे चांगलं कार्य करत आहात.”
३ बरेच आस्थेवाईक लोक पत्रिका हातात घेऊन अधिवेशनाच्या ठिकाणी येताना दिसले. त्यांच्यापैकी काहीजण तर दूरदूरच्या शहरांतून खास अधिवेशनाकरता आले होते. इतरांना निमंत्रित करण्यासाठी आपण घेतलेल्या परिश्रमांमुळे अधिवेशनाच्या उपस्थितीत लक्षणीय वाढ दिसून आली. एका देशात तर गतवर्षीच्या तुलनेत अधिवेशनाच्या उपस्थितीत २७ टक्के वाढ झाली.
४ क्षेत्र पूर्ण करणे: तुम्ही अधिवेशन सुरू होण्याच्या तीन आठवड्यांआधी ही पत्रिका वितरित करण्यास सुरुवात करू शकता. मंडळीचे सबंध क्षेत्र पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जावा. एखाद्या मंडळीकडे फार मोठे क्षेत्र असल्यास, अधिवेशनाच्या एका आठवड्याआधी प्रचारक घरी न भेटणाऱ्यांच्या दारात अधिवेशनाची पत्रिका ठेवू शकतात. मंडळ्यांनी पत्रिकांचा संपूर्ण साठा वितरित करण्याचा आणि जमेल तितके क्षेत्र पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. उरलेल्या पत्रिका मंडळीतले पायनियर उपयोगात आणू शकतात.
५ तुम्ही असे म्हणू शकता: “आम्ही एका महत्त्वाच्या आगामी अधिवेशनाकरता या निमंत्रणपत्रिकेचे वितरण करण्याच्या जागतिक मोहिमेत सहभागी आहोत. ही पत्रिका तुमच्याकरता आहे. अतिरिक्त माहिती पत्रिकेत दिली आहे.” संक्षिप्त सादरता असल्यास जास्त लोकांना पत्रिका देणे शक्य होईल. अर्थात घरमालकाला प्रश्न असल्यास, थांबून त्यांची उत्तरे अवश्य द्यावीत. घरमालकाने आस्था दाखवल्यास त्यांचे नाव इत्यादी नोंदून घ्यावे आणि लवकरात लवकर त्यांची पुन्हा भेट घेण्याचा प्रयत्न करावा.
६ ख्रिस्ताचे अनुकरण करणे खरंच किती महत्त्वाचे आहे! (योहा. ३:३६) आपले आगामी प्रांतीय अधिवेशन सर्व उपस्थितांना अगदी तेच करण्यास मदत करेल. या प्रांतीय अधिवेशनाची जाहिरात करण्याच्या खास मोहिमेत सहभागी झाल्यामुळे यंदाही मोठ्या प्रमाणात साक्ष दिली जाईल अशी आपण अपेक्षा करू शकतो. तेव्हा शक्य होईल तितक्या लोकांना निमंत्रित करण्याचा प्रयत्न करा. या जागतिक मोहिमेत तुम्ही सहभाग घेत असताना तुमच्या वैयक्तिक प्रयत्नांवर यहोवाचा आशीर्वाद असो.