“माझ्या स्मरणार्थ हे करा”
एप्रिल २ तारखेला येशूच्या मृत्यूचा स्मारकविधी
१. एप्रिल २, २००७ ही महत्त्वाची तारीख का आहे?
१ एप्रिल २, २००७ रोजी जगभरात लाखो लोक येशूच्या बलिदानरूपी मृत्यूचा स्मारकविधी साजरा करण्यासाठी एकत्रित होतील. येशूने आपल्या पित्याच्या सार्वभौमत्त्वाचे समर्थन केल्यामुळे त्याला जिवे मारण्यात आले. पण, मरण पत्करून येशूने हे सिद्ध केले की मानव केवळ स्वार्थी हेतूनेच देवाची सेवा करतात हा सैतानाचा आरोप साफ खोटा आहे. (ईयो. २:१-५) तसेच, प्रभूचे सांज भोजन आपल्याला याची आठवण करून देते की येशूने एक परिपूर्ण, निर्दोष मनुष्य या नात्याने मरण पत्करून “पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण” केला. (मत्त. २०:२८) म्हणूनच येशूने आपल्या शिष्यांना अशी आज्ञा दिली की: “माझ्या स्मरणार्थ हे करा.” (लूक २२:१९) देवाच्या या मोलवान भेटीबद्दल तुम्ही आपली कृतज्ञता दाखवू इच्छिता का? मग प्रेमाच्या या सर्वोच्च अभिव्यक्तीच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याकरता तुम्ही आतापासून तयारीला लागले पाहिजे.—योहा. ३:१६.
२. आपण स्मारकविधीकरता मानसिक तयारी कशाप्रकारे करू शकतो?
२ मानसिक तयारी करणे: येशूच्या मानवी जीवनाच्या शेवटल्या काही दिवसांत कोणकोणत्या घटना घडल्या याविषयी मनन करण्याद्वारे आपण स्मारकविधीकरता मानसिक तयारी करू शकतो. असे करण्यास आपले साहाय्य करण्याकरता शास्त्रवचनांचे दररोज परीक्षण करणे २००७ या पुस्तिकेत तसेच २००७ कॅलेंडर (इंग्रजी) यावरही या दिवसांकरता खास बायबल वाचनाचा आराखडा आखून दिलेला आहे. आपण आज जे कॅलेंडर वापरतो त्यानुसार, येशूच्या मृत्यूआधी या घटना घडलेल्या नेमक्या दिवसाशी हा आराखडा जुळतो. यहुदी लोक सूर्यास्तापासून सूर्यास्तापर्यंत एक दिवस मोजत असत. बायबलमधील वृत्तान्तात ज्या दिवसांचा व तारखांचा संदर्भ आढळतो त्या यहुदी दिनदर्शिकेनुसार आहेत. हा फरक लक्षात घेऊन त्यानुसार स्मारकविधीच्या बायबल वाचनाचा भाग सुचवण्यात आला आहे. या माहितीचे वाचन करून देवाच्या प्रेमाविषयी प्रार्थनापूर्वक मनन केल्याने आपल्याला स्मारकविधीचा पुरेपूर फायदा घेता येईल.
३. आस्थेवाईक व निष्क्रिय झालेल्या व्यक्तींना स्मारकविधीचा फायदा व्हावा म्हणून आपण त्यांना कशाप्रकारे साहाय्य करू शकतो?
३ इतरांनाही निमंत्रण द्या: फेब्रुवारीच्या आमची राज्य सेवा अंकात या घटनेकरता लोकांना निमंत्रित करण्यासंबंधी एका खास मोहिमेची घोषणा करण्यात आली. या मोहिमेत पुरेपूर सहभाग घेण्याकरता तुम्ही आवश्यक योजना केल्या आहेत का? स्मारकविधीकरता तुम्ही ज्या ओळखीच्या लोकांना निमंत्रित करू इच्छिता त्यांच्या नावांची यादी तयार करून त्यांच्याशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे का? स्मारकविधीच्या दिवशी संध्याकाळी लवकर राज्य सभागृहात येण्याची व्यवस्था करा जेणेकरून तुम्ही ज्यांना निमंत्रित केले आहे त्यांचे, तसेच इतर पाहुण्यांचेही तुम्हाला स्वागत करता येईल. तुम्ही त्यांच्या शेजारी बसू शकता आणि त्यांच्याजवळ बायबल आणि गीतपुस्तकाची प्रत आहे याची खात्री करू शकता. मंडळीतल्या इतरांशीही त्यांची ओळख करून द्या. कार्यक्रमानंतर त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याकरता वेळ द्या. एप्रिल १५ रोजी दिल्या जाणाऱ्या खास जाहीर भाषणाला उपस्थित राहण्याचे त्यांना निमंत्रण द्या. वडिलांनी विशेषतः मंडळीसोबत एकेकाळी सहवास असलेल्या पण आता निष्क्रिय झालेल्या व्यक्तींना स्मारकविधी व खास भाषणाला येण्याचे निमंत्रण देण्याची व्यवस्था करावी.
४. स्मारकविधीला आलेल्या लोकांना सातत्याने आध्यात्मिक प्रगती करण्यास आपण कशी मदत करू शकतो?
४ नवोदितांना आणि अक्रियाशील झालेल्यांना प्रगती करण्यास साहाय्य करा: स्मारकविधीचे भाषण देणारा वक्ता भाषणादरम्यान यहोवाचे साक्षीदार बायबल अभ्यास कशाप्रकारे घेतात याविषयी स्पष्टीकरण देऊन स्मारकविधीला आलेल्या आस्थेवाईक जनांना यहोवाबद्दल अधिक ज्ञान घेत राहण्याचे प्रोत्साहन देईल. वक्त्याने दिलेल्या या माहितीचा संदर्भ देऊन तुम्ही नवीन लोकांना आणखी आध्यात्मिक मदत देण्याविषयी सुचवू शकता. जर ते सध्या बायबलचा अभ्यास करत नसतील तर तुम्ही स्मारकविधीनंतर लवकरात लवकर त्यांची भेट घेऊन त्यांना विनामूल्य बायबल अभ्यास कसा घेतला जातो हे प्रत्यक्ष दाखवू शकता. आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी त्यांनी मंडळीच्या सभांनाही उपस्थित राहणे गरजेचे आहे. (इब्री १०:२४, २५) याकरता तुम्ही त्यांना सभांना नियमित उपस्थित राहण्याचे प्रोत्साहन देऊ शकता. वडिलांनी स्मारकविधीला आलेल्या अक्रियाशील व्यक्तींना भेटून, भाषणात सांगितलेल्या मुद्द्यांच्या आधारावर अधिक माहिती देण्याचा प्रयत्न करावा. यामुळे त्यांना पुन्हा एकदा मंडळीसोबत सक्रियरित्या कार्य करण्याचे प्रोत्साहन मिळू शकते.
५. स्मारकविधीला उपस्थित राहिल्याने आपल्यावर कोणता परिणाम होण्याची शक्यता आहे?
५ स्मारकविधी, यहोवाने व येशूने आपल्याकरता काय केले आहे यावर गांभीर्याने मनन करण्याची संधी देतो. अशाप्रकारे मनन केल्यामुळे त्यांच्याबद्दल आपले प्रेम आणखी वाढते आणि याचा आपल्या वर्तणुकीवर परिणाम होतो. (२ करिंथ. ५:१४, १५; १ योहा. ४:११) तर आपण ‘प्रभूच्या मरणाची घोषणा करतो’ अशा या महत्त्वाच्या प्रसंगासाठी स्वतःची व आस्थेवाईक लोकांचीही मानसिक तयारी करण्याची हीच वेळ आहे.—१ करिंथ. ११:२६.