क्षेत्र सेवाकार्याच्या सभांचा पूर्ण फायदा घ्या
१. क्षेत्र सेवाकार्याच्या सभा आपल्याला कशाप्रकारे मदत करतात?
१ क्षेत्र सेवाकार्याच्या सभा परिणामकारक पद्धतीने हाताळल्या जातात तेव्हा सेवाकार्याला जाण्याअगोदर सर्व बांधवांना उत्तम प्रोत्साहन आणि व्यवहारिक मार्गदर्शन मिळते. या सभा आपल्याला इतर प्रचारकांसोबत मिळून कार्य करण्याची संधी देतात आणि असे केल्यामुळे आपण एकमेकांना साहाय्य करू शकतो, तसेच एकमेकांना उन्नती करण्यास मदत करू शकतो. (नीति. २७:१७; उप. ४:९, १०) या सभांचा पूर्ण फायदा घेण्याकरता आपण काय करू शकतो?
२. संचालक चर्चेकरता कोणते काही विषय निवडू शकतो?
२ संचालक: या सभांकरता आधीपासूनच साहित्य किंवा रूपरेषा पुरवली जात नाही. त्यामुळे, जर तुम्ही ही सभा संचलित करणार असाल तर तुम्हाला चांगली तयारी करावी लागेल. प्रत्येक वेळेस दैनंदिन वचनांची चर्चा केलीच पाहिजे असे नाही. अर्थात, जर वचनाचा सेवाकार्याशी थेट संबंध असेल तर तुम्ही त्याचा चर्चेत समावेश करू शकता. खास त्या दिवशी साक्षकार्याला जाणाऱ्या बांधवांना कोणते मार्गदर्शन उपयोगी पडेल यावर विचार करा. उदाहरणार्थ, तुम्ही एखाद्या सादरतेवर चर्चा करू शकता किंवा प्रात्यक्षिक रूपात ती सादर करू शकता. किंवा युक्तिवाद पुस्तकातून, सेवा प्रशालेच्या पाठ्यपुस्तकातून अथवा अलीकडेच झालेल्या सेवा सभेतील एखाद्या भागावर चर्चा करू शकता. इतर वेळी, तुमच्या क्षेत्रात सहसा उद्भवणाऱ्या समस्यांना कसे तोंड द्यायचे यावर तुम्ही चर्चा करू शकता. किंवा जर बहुतेक भाऊबहिणी त्या दिवशी पुनर्भेटी करणार असतील तर मग घरमालकाची आस्था वाढवून बायबल अभ्यास कसे सुरू करता येतील हा विषय तुम्ही विचारात घेऊ शकता. विषय कोणताही असला तरी, तुमची बोलण्याची पद्धत उत्साही व प्रोत्साहनदायक असावी.
३. सभा किती अवधीची असावी आणि या वेळेच्या आत काय केले पाहिजे?
३ काहीजण उशिरा येणार असतील तरीसुद्धा, सभा वेळेवर सुरू करा. जोड्या लावताना विचारपूर्वक लावा आणि ज्यांना क्षेत्र हवे असेल त्यांना पुरेसे क्षेत्र द्या. ही सभा १०-१५ मिनिटांपेक्षा जास्त अवधीची असू नये. आणि जर मंडळीच्या सभेनंतर ही सभा घेतली जाणार असेल तर ती अधिकच संक्षिप्त असावी. सभेची समाप्ती करण्याअगोदर सर्वांना हे माहीत असले पाहिजे की ते कोणासोबत व कोठे कार्य करणार आहेत. यानंतर प्रार्थनेने सभेची समाप्ती करावी.
४. क्षेत्र सेवाकार्याच्या सभांचा सर्वांना पूर्ण फायदा करून घेता यावा म्हणून काय केले पाहिजे?
४ तुम्हीही मदत करू शकता: मंडळीच्या इतर सभांप्रमाणेच, या सभेलाही वेळेवर येण्याद्वारे आपण यहोवाबद्दल आदर दाखवतो व इतर बांधवांचीही आपल्याला काळजी आहे हे दाखवतो. चर्चा चालली असताना त्यात सहभाग घ्या. तुम्ही सभा घेणाऱ्या बांधवाला तुमची दुसऱ्या एखाद्या प्रचारकासोबत जोडी लावण्यास विनंती करू शकता, किंवा सभेच्या आधी स्वतःच एखाद्या प्रचारकासोबत कार्य करण्याची व्यवस्था देखील करू शकता. तुम्ही आपला जोडीदार स्वतःच निवडण्याचे पसंत केल्यास, प्रत्येक वेळी केवळ मोजक्याच जवळच्या मित्रमैत्रिणींसोबत कार्य न करता आपले “अंतःकरण विशाल” करण्याचा प्रयत्न करून निरनिराळ्या प्रचारकांसोबत कार्य करा. (२ करिंथ. ६:११-१३) सभा समाप्त झाल्यानंतर आधी केलेल्या व्यवस्था बदलण्याचे टाळा व वेळ न घालवता लगेच क्षेत्राला जाण्याकरता निघा.
५. क्षेत्र सेवाकार्याच्या सभांचा उद्देश काय आहे?
५ क्षेत्र सेवाकार्याच्या सभांचा उद्देश हा मंडळीच्या इतर सभांप्रमाणेच असतो. या सभा आपल्याला ‘प्रीति व सत्कर्मे करावयास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष देण्याकरता’ आयोजित केल्या जातात. (इब्री १०:२४, २५) आपण या सभांचा पूर्ण फायदा करून घेण्याचा प्रयत्न केल्यास आपल्याला क्षेत्र सेवाकार्य जे खरोखरच एक ‘सत्कर्म’ आहे, ते चांगल्यारितीने करण्यास मदत मिळेल!