इतरांना देवाशी मैत्री करण्यास साहाय्य करणे
१ आज सर्व राष्ट्रांतील लोकांना यहोवाचे मार्ग शिकवले जात आहेत. (यश. २:२, ३) पण या लोकांनी ‘धीराने फळ देत जावे’ म्हणून प्रथम त्यांचे यहोवावर प्रेम असणे महत्त्वाचे आहे. (लूक ८:१५; मार्क १२:३०) जर त्यांचे यहोवावर प्रेम नसेल तर हानीकारक प्रभावांना तोंड देण्याची ताकद आणि जे योग्य ते करण्याचे धैर्य त्यांच्याठायी राहणार नाही. यहोवासोबत चांगला नातेसंबंध जोडण्यास इतरांना साहाय्य करण्याचा एक मार्ग म्हणजे त्याच्या गुणांविषयी त्यांच्या मनात कदर निर्माण करणे. त्यांना यहोवाच्या जवळ या (इंग्रजी), या पुस्तकातील माहितीचे विचारपूर्वक परीक्षण करण्याचे प्रोत्साहन द्या.
२ तुमचे उदाहरण: तुमच्या वैयक्तिक वर्तनाचा बायबल अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनावर जबरदस्त प्रभाव पडत असतो. यहोवासोबतच्या तुमच्या मैत्रीची तुम्ही किती कदर करता आणि यामुळे तुमच्या जीवनावर कसा प्रभाव पडतो हे जेव्हा ते पाहतात तेव्हा त्यांनाही यहोवासोबत असा वैयक्तिक नातेसंबंध जोडण्याची प्रेरणा मिळते. (लूक ६:४०) किंबहुना आपण जे बोलतो त्यापेक्षा आपण जसे वागतो त्याचा इतरांवर जास्त प्रभाव पडतो.
३ आईवडीलही विशेषतः स्वतःच्या उदाहरणातून आपल्या मुलांना यहोवावर प्रेम करण्यास शिकवू शकतात. (अनु. ६:४-९) आपल्या मुलांना सत्याच्या मार्गात वाढवू इच्छिणाऱ्या एका जोडप्याने, काही अनुभवी पालकांना त्यांचा सल्ला मागितला. पती सांगतो, “मी ज्या कोणाशी बोललो त्यांपैकी बहुतेकांनी आईवडिलांच्या आदर्शावरच भर दिला.” होय, आईवडील आपल्या सबंध जीवनशैलीद्वारे, आपल्या जिवंत उदाहरणाद्वारे, यहोवाचा “मित्र” असण्याचा काय अर्थ होतो हे आपल्या मुलांना प्रत्यक्ष पाहण्याची संधी देऊ शकतात.—याको. २:२३.
४ मनःपूर्वक प्रार्थना: यहोवाला मनापासून प्रार्थना करण्यास शिकवण्याद्वारेही तुम्ही त्यांना यहोवासोबत मैत्री जोडण्यास साहाय्य करू शकता. याकरता येशूने शिकवलेली प्रार्थना, तसेच बायबलमध्ये नमूद असलेल्या इतर मनःपूर्वक प्रार्थनांच्या उदाहरणाकडे तुम्ही त्यांचे लक्ष वेधू शकता. (मत्त. ६:९, १०) प्रार्थना कशी करावी हे तुम्ही आपल्या मुलांना व बायबल विद्यार्थ्यांना तुमच्या स्वतःच्या प्रार्थनांच्या माध्यमाने शिकवू शकता. तुमचे प्रामाणिकपणे व्यक्त केलेले शब्द ऐकल्यावर यहोवाप्रती असलेल्या तुमच्या भावना त्यांना जाणवतील. जीवनात खडतर परिस्थितीला तोंड देत असताना, ‘प्रार्थनेत तत्पर राहण्याचे’ त्यांना उत्तेजन द्या. (रोम. १२:१२) कठीण परिस्थितीत यहोवा आपले कशाप्रकारे साहाय्य करतो हे जेव्हा ते स्वतः अनुभवतील तेव्हा आपोआपच त्यांचा यहोवावरचा भरवसा वाढेल व ते एखाद्या खऱ्या मित्राप्रमाणे त्याच्यावर प्रेम करू लागतील.—स्तो. ३४:८; फिलिप्पै. ४:६, ७.