यहोवाच्या अतुल्य गुणांची कदर करायला शिकवा
१ क्षेत्र सेवाकार्य करत असताना, आपण लोकांना बायबलमधील सत्यांविषयी केवळ माहितीच देत नाही, तर आपण त्यांना यहोवाला जाणून घ्यायला, आणि त्याच्या अतुल्य गुणांची कदर करायलाही साहाय्य करतो. प्रामाणिक अंतःकरणाचे लोक जेव्हा देवाबद्दलचे सत्य जाणून घेतात, तेव्हा त्यांच्यावर याचा फार मोठा परिणाम होतो. “प्रभूला संतोषविण्याकरिता त्याला शोभेल असे वागावे,” म्हणून ते आपल्या जीवनात अनेक बदल करण्यासही तयार होतात.—कलस्सै. १:९, १०; ३:९, १०.
२ अभ्यासाचे नवे पुस्तक: बायबल काय शिकवते हे पुस्तक अगदी सुरुवातीपासूनच यहोवाच्या गुणांकडे वाचकाचे लक्ष वेधते. देवाला खरोखरच तुमची काळजी आहे का?, देव कसा दिसतो? आणि देवाच्या जवळ जाणे शक्य आहे का? यांसारख्या प्रश्नांचे अगदी पहिल्याच अध्यायात उत्तर देण्यात आले आहे. याच अध्यायात यहोवाची पवित्रता (परि. १०), त्याचा न्यायीपणा आणि करुणा (परि. ११), त्याची प्रीती (परि. १३), सामर्थ्य (परि. १६), तसेच त्याचा दयाळूपणा, कृपाळूपणा, क्षमाशीलता, सहनशीलता आणि विश्वसनीयता (परि. १९) यांसारख्या त्याच्या इतर गुणांवरही प्रकाश टाकण्यात आला आहे. शेवटी, २० व्या परिच्छेदात असे विधान केले आहे: “यहोवाविषयी तुम्ही जितके अधिक जाणून घ्याल तितकाच अधिक तो तुम्हाला खरा वाटू लागेल आणि तुम्हाला त्याच्यावर प्रेम करावेसे, त्याच्या जवळ जावेसे वाटू लागेल.”
३ तर मग, आपण ज्यांच्यासोबत अभ्यास करतो त्या लोकांना यहोवाच्या जवळ यायला मदत करण्याकरता आपण बायबल काय शिकवते या पुस्तकाचा कशाप्रकारे उपयोग करू शकतो? समजा एखाद्या परिच्छेदात, देवाच्या एका विशिष्ट गुणावर प्रकाश टाकला असेल, तर या परिच्छेदाची चर्चा केल्यानंतर आपण अभ्यास करणाऱ्या व्यक्तीला असे विचारू शकतो: “यावरून तुम्हाला यहोवाच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल काय समजलं?” किंवा “देवाला एक व्यक्ती म्हणून तुमच्याबद्दल आस्था आहे हे या माहितीवरून कशाप्रकारे दिसून येतं?” अभ्यासादरम्यान वेळोवेळी अशाप्रकारचे प्रश्न विचारल्यामुळे, आपण आपल्या विद्यार्थ्यांना शिकलेल्या गोष्टींबद्दल मनन करायला शिकवत असतो. आणि असे केल्यामुळे, आपण त्यांना यहोवाच्या अतुल्य गुणांची अधिकाधिक कदर करायला मदत करतो.
४ उजळणीसाठी दिलेल्या मुद्द्यांचा उपयोग करा: प्रत्येक अध्याय पूर्ण झाल्यानंतर, “बायबल असे शिकवते” या शीर्षकाच्या पेटीत जे मुद्दे दिले आहेत, त्यांपैकी प्रत्येक मुद्द्यावर विद्यार्थ्याला आपल्या शब्दांत अभिप्राय व्यक्त करण्याचे प्रोत्साहन द्या. तेथे उल्लेख केलेल्या शास्त्रवचनांकडे त्याचे लक्ष वेधा. विद्यार्थ्याच्या मनात नेमके काय आहे हे व्यक्त करायला त्याला प्रोत्साहन देण्याकरता, तुम्ही अधूनमधून त्याला असे विचारू शकता, की “या मुद्द्यावर बायबल जे शिकवते त्याबद्दल तुमचं वैयक्तिक मत काय?” असे केल्यामुळे, अध्यायाचे मुख्य मुद्दे अधोरेखित करण्यासोबतच, विद्यार्थ्याचे खरे मत काय आहे हे देखील तुम्ही जाणून घेऊ शकता. अशारितीने, हळूहळू तुमच्या विद्यार्थ्याला यहोवासोबत वैयक्तिक नाते जोडायला मदत मिळेल.