आध्यात्मिक ध्येये साकारण्याचे मार्ग
१. अनेक तरुण ख्रिश्चनांनी कोणकोणती आध्यात्मिक ध्येये ठेवली आहेत?
१ तरुण ख्रिस्ती या नात्याने, तुम्हीही तुमच्या जीवनात काही आध्यात्मिक ध्येये ठेवली असतील. यहोवाबद्दल तुमच्या मनात असलेले प्रेम आणि ‘पहिल्याने त्याचे राज्य मिळविण्यास झटा’ हे सर्व ख्रिश्चनांना उद्देशून असलेल्या येशूच्या शब्दांचा तुमच्या ध्येयांवर परिणाम झालेला असेल. (मत्त. ६:३३) पायनियर बनून आपली सेवा वाढवण्याचे किंवा राज्य प्रचारकांची अधिक गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करण्याचे तुमचे ध्येय असेल. काहींच्या मनात, राज्यगृह बांधकाम प्रकल्पासाठी स्वयंसेवक म्हणून किंवा एखाद्या शाखा दफ्तरात सेवा करण्याचा किंवा मिशनरी म्हणून सेवा करण्याचा विचार असेल. ही अशी ध्येये खरोखरच किती समाधान देणारी व प्रशंसनीय आहेत!
२. आध्यात्मिक ध्येये साकार करण्यास कोणती गोष्ट तुम्हाला मदत करू शकते?
२ तुम्ही ठेवलेली आध्यात्मिक ध्येये साकार करण्यास तुम्हाला साहाय्य करणारी एक गोष्ट म्हणजे, तुमची ध्येये एखाद्या कागदावर लिहून काढणे. जुलै १५, २००४ च्या टेहळणी बुरूज अंकात असे म्हटले होते: “एक अस्पष्ट कल्पना व्यक्त करण्यासाठी आपण शब्द निवडतो तेव्हा ती आपल्या मनात अधिक स्पष्टपणे आकार घेते. यास्तव, [तुम्ही] एका कागदावर आपली ध्येये, त्यांना साध्य करण्याचे मार्ग, लिहून काढू शकता.” याशिवाय, एखादे दीर्घ-काळचे ध्येय साध्य करताना आपले लक्ष त्यावर केंद्रित करण्यासाठी तुम्ही काही अल्पकाळची ध्येये ठेवू शकता. यामुळे तुम्हाला वेळोवेळी आपण कितपत प्रगती केली आहे हे पाहण्यास मदत मिळेल.
३. अल्पकाळची काही ध्येये सांगा की जी एखाद्याला बाप्तिस्मा घेण्यास मदत करू शकतील.
३ अल्पकाळची ध्येये: तुम्ही अद्याप बाप्तिस्मा घेतलेला नसेल तर, हे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्ही काय करू शकता यावर विचार करा. तुम्हाला कदाचित मूलभूत बायबल शिकवणी चांगल्याप्रकारे समजून घेण्याची गरज असेल. असे आहे तर, बायबल काय शिकवते पुस्तकाचा अगदी कसून अभ्यास करण्याचे ध्येय ठेवा. दिलेली सर्व शास्त्रवचने तुमच्या बायबलमधून उघडून पाहा. (१ तीम. ४:१५) बेथेल सदस्य आणि गिलियड विद्यार्थ्यांना जसे संपूर्ण बायबल वाचून काढावे लागते, तसे तुम्ही देखील उत्पत्तिपासून प्रकटीकरणापर्यंत संपूर्ण बायबल वाचून काढायचे ध्येय ठेवा. पूर्ण बायबल वाचून झाल्यानंतरही, दैनिक बायबल वाचनाचा नित्यक्रम चालू ठेवा. यात खंड पडू देऊ नका. (स्तो. १:२, ३) यामुळे तुमची आध्यात्मिकरीत्या किती प्रगती होऊ शकते याची कल्पना करा! प्रत्येक वेळी, बायबल वाचन व अभ्यास करण्याआधी आणि नंतर यहोवाला कळकळीची प्रार्थना करा. शिवाय, तुम्ही जे वाचता त्याचा आपल्या जीवनात अवलंब करण्याचा नेहमी प्रयत्न करा.—याको. १:२५.
४. बेथेल किंवा मिशनरी सेवा यांसारखी दीर्घकाळची ध्येये ठेवणाऱ्याला अल्पकाळची ध्येये कशाप्रकारे मदत करू शकतील?
४ तुमचा जर बाप्तिस्मा झालेला असेल तर तुम्ही कोणती ध्येये ठेवू शकता? प्रचार करण्याच्या पद्धतीत तुम्ही सुधारणा केली पाहिजे असे तुम्हाला वाटते का? उदाहरणार्थ, क्षेत्र सेवेत देवाचे वचन सफाईदारपणे वापरण्याचे ध्येय तुम्ही ठेवू शकता का? (२ तीम. २:१५) तुम्ही तुमची सेवा आणखी कशाप्रकारे वाढवू शकता? तुमचे वय आणि परिस्थिती लक्षात ठेवून अल्पकाळची विशिष्ट ध्येये ठेवा जी तुम्हाला तुमची दीर्घकाळची ध्येये साकारण्यास मदत करतील.
५. अल्पकाळची ध्येये ठेवल्यामुळे एका बांधवाला बेथेलमध्ये सेवा करण्याचे त्याचे ध्येय सिद्धीस नेण्यास कशाप्रकारे मदत झाली?
५ सत्य कथा: १९ वर्षांचा टोनी एकदा यहोवाच्या साक्षीदारांचे एक शाखा दफ्तर पाहायला गेला होता. बेथेल पाहिल्यावर आपणही इथे सेवा करायला आले पाहिजे असे त्याला सारखे वाटू लागले. परंतु, त्याची जीवनशैली बरोबर नव्हती. शिवाय त्याने अद्याप आपले जीवन यहोवाला समर्पितही केले नव्हते. पण टोनीने मग आपली जीवनशैली यहोवाच्या मार्गांच्या सामंजस्यात आणण्याचे ठरवले आणि बाप्तिस्मा घेण्याच्या पात्रतेचे होण्याचे एक ध्येय स्वतःसमोर ठेवले. हे ध्येय साध्य केल्यावर म्हणजे बाप्तिस्मा घेतल्यावर त्याने साहाय्यक पायनियरींग आणि नंतर सामान्य पायनियरींग करण्याचे ध्येय ठेवले. केव्हापासून सुरुवात करायची त्या तारखाही त्याने आपल्या कॅलेंडरवर लिहून ठेवल्या. काही काळ पायनियरींग केल्यानंतर त्याला जेव्हा बेथेलमध्ये सेवा करण्याचे आमंत्रण मिळाले तेव्हा त्याला किती आनंद झाला असेल, याची तुम्ही कल्पना करू शकता.
६. तुमची आध्यात्मिक ध्येये सिद्धीस नेण्यास कोणती गोष्ट तुम्हाला मदत करू शकेल?
६ तुम्ही देखील, पहिल्याने राज्य मिळविण्यास झटत असताना तुमची आध्यात्मिक ध्येये सिद्धीस नेऊ शकता. “आपली सर्व कार्ये” यहोवाला प्रार्थनेत सांगा आणि मग ती पूर्ण करण्याचा कसोशीने प्रयत्न करा.—नीति. १६:३; २१:५.