तुम्ही कधी असे विचारून पाहिले आहे का?
तुम्ही सध्या एखाद्याबरोबर बायबल अभ्यास घेत असाल तर तुम्ही तुमच्या विद्यार्थ्याला विचारू शकता, की त्याचे मित्र, नातेवाईक किंवा ओळखीच्या लोकांपैकी कोणी असे आहे का, की ज्याला बायबल काय शिकवते हे शिकून घेण्यास आवडेल? सहसा, तुम्हाला अनेकांची नावे सुचवली जातील. मग विद्यार्थ्याची काही हरकत नसेल तर तुम्ही त्याचे नाव सांगून त्या व्यक्तीला भेटू शकता. तुम्ही म्हणू शकता: “[तुमच्या बायबल विद्यार्थ्याचे नाव]. . .ला बायबलचा अभ्यास आवडत आहे. तुम्हाला आमच्या मोफत बायबल अभ्यास कार्यक्रमाचा फायदा होईल असे त्याला वाटले.” आणि मग बायबल काय शिकवते पुस्तकाचा उपयोग करून अभ्यास कसा केला जातो ते दाखवा.
तुमचा बायबल विद्यार्थी चांगली प्रगती करत असेल तर तुम्ही त्याला, ज्यांना अभ्यास करण्यास आवडेल अशा त्याच्या मित्रांना व कुटुंबातील सदस्यांना अभ्यासाची पद्धत कशी आहे हे समजावून सांगण्याचे उत्तेजन देऊ शकता. तो कदाचित त्यांना अभ्यासाच्या वेळी त्याच्याबरोबर येऊन बसण्याचे उत्तेजन देऊ शकतो. किंवा, हे शक्य नसेल तर तो त्यांना तुमची भेट घालून देण्याची व्यवस्था करू शकतो जेणेकरून तुम्ही अभ्यासाची पद्धत कशी आहे ते दाखवू शकाल. असे केल्याने विद्यार्थ्याला बायबलचे ज्ञान इतरांना सांगण्यास सुरुवात करण्याचे उत्तेजन मिळू शकेल.
तुम्ही ज्यांना नियमित भेटी देता असे लोक, स्वतः नियमित बायबल अभ्यास करत नसले तरी इतरांविषयी सांगू शकतात. तुम्ही त्यांना बायबल काय शिकवते पुस्तकाची प्रत देता तेव्हा सहज विचारू शकता: “या प्रकाशनाची प्रत घ्यायला आवडेल अशा कोणाला तुम्ही ओळखता का?”
काळाचे गांभीर्य लक्षात ठेवून आपण लोकांना सुवार्ता ऐकण्यास व ती स्वीकारण्यास मदत करण्यासाठी प्रत्येक संधीचा उपयोग करू इच्छितो. तेव्हा तुम्ही कधी असे विचारून पाहिले आहे का?