घरमालकाच्या हावभावांकडे लक्ष देऊन—वैयक्तिक आस्था व्यक्त करा
१ आपण सार्वजनिक ठिकाणी व घरोघरी साक्षकार्य करतो तेव्हा लोकांबरोबर बोलण्याआधी त्यांच्या हावभावांकडे पाहतो. त्या दोन-चार क्षणात आपण, आपले येणे त्यांना कसे वाटले आहे व त्यांची मनःस्थिती कशी आहे हे त्यांच्या चेहऱ्यावरील हावभावावरून समजू शकतो. हेच ते आपल्याविषयी देखील समजू शकतात. एका साक्षीदार भगिनीविषयी एका स्त्रीने म्हटले: “तिच्या हसऱ्या चेहऱ्यावर मला एकप्रकारची शांती पाहिल्याचं आठवतं. माझी उत्सुकता वाढली.” या भावनेमुळे त्या स्त्रीने सुवार्ता ऐकून घेतली.
२ रस्त्यावर किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी आपण साक्षकार्य करतो तेव्हा इतरांच्या हावभावांकडे पाहून जर आपण बोललो तर आपण प्रभावीपणे साक्ष देऊ शकू. एक बांधव त्याच्या दिशेने येणाऱ्या लोकांच्या डोळ्यांकडे पाहतो. जेव्हा ते त्याच्याकडे पाहतात तेव्हा तो त्यांच्याकडे पाहून स्मित हास्य करतो आणि त्यांना मासिके सादर करतो. यामुळे तो लोकांबरोबर मैत्रीपूर्ण संभाषण करू शकला व अनेक प्रकाशने देऊ शकला.
३ इतरांच्या भावना ओळखा: लोकांचे हावभाव पाहिल्याने आपल्याला त्यांच्या भावना ओळखता येतील. उदाहरणार्थ, आपले बोलणे त्यांना समजत नसेल किंवा आपण जे बोललो ते त्यांना पटत नसेल तर ते लगेच आपण त्यांच्या चेहऱ्यावरून ओळखू शकतो. लोक कामात आहेत किंवा त्यांना घाई लागली आहे हे आपण त्यांच्या चेहऱ्यावरील हावभावावरून समजू शकतो. त्यानुसार मग आपण आपल्या सादरतेत एकतर फेरफार करू शकतो किंवा मग काटछाट करू शकतो. इतरांच्या भावना ओळखणे, हा लोकांमध्ये व्यक्तिगत आस्था व्यक्त करण्याचा एक उत्तम मार्ग आहे.
४ प्रामाणिकपणा व ठामपणा: अनेक समाजात, व्यक्तीच्या थेट डोळ्यांत बघून बोलणे, प्रामाणिकपणाचे लक्षण समजले जाते. येशूच्या शिष्यांनी त्याला प्रश्न विचारला तेव्हा येशूची काय प्रतिक्रिया होती ते पाहा. त्यांनी त्याला विचारले: “मग कोणाचे तारण होणे शक्य आहे?” बायबल म्हणते: “येशूने त्यांच्याकडे न्याहाळून पाहून म्हटले, माणसांना हे अशक्य आहे, देवाला तर सर्व शक्य आहे.” (मत्त. १९:२५, २६) येशूच्या डोळ्यांतील ठामपणामुळे त्याचे बोलणे आणखी खात्रीलायक झाले. त्याचप्रकारे, लोकांकडे बघून आपण राज्य संदेश सांगितला तर आपण तो प्रामाणिकपणे व ठामपणे सांगू शकू.—२ करिंथ. २:१७; १ थेस्सनी. १:५.