“मुक्तिसमय जवळ आला आहे” २००६ यहोवाच्या साक्षीदारांचे प्रांतीय अधिवेशन
१. प्राचीन काळात देवाच्या लोकांनी खऱ्या उपासनेबद्दल आपल्याला वाटणारी कदर कशी व्यक्त केली आणि आज आपल्यालाही अशीच संधी कशी मिळू शकेल?
१. प्राचीन यहुदाचा राजा हिज्किया याने जासूद पाठवून त्यांच्या हाती लोकांना जेरुसलेममध्ये एकत्रित होण्याचा निरोप पाठवला. (२ इति. ३०:६, १३) लोकांनी या निरोपाला दिलेल्या प्रतिसादावरून खऱ्या उपासनेबद्दल त्यांची मनोवृत्ती दिसून आली. (२ इति. ३०:१०-१२) येणाऱ्या महिन्यांत यहोवाच्या सेवकांनाही त्याची उपासना करण्याकरता एकत्रित होण्याच्या सुसंधीबद्दल मनापासून कदर वाटते हे दाखवण्याची संधी मिळेल. तुम्हाला “मुक्तिसमय जवळ आला आहे” या प्रांतीय अधिवेशनाकरता निमंत्रित करण्याकरता तुमच्या मंडळीला एक पत्र पाठवण्यात आले आहे. या निमंत्रणाला तुम्ही कसा प्रतिसाद द्याल? गतकाळात, अनेक लहान अधिवेशने भरवण्यात आली होती. यामुळे, नवीन लोकांना उपस्थित राहायला सोपे गेले शिवाय लहान शहरांतील जनतेला यहोवाच्या साक्षीदारांना जवळून पाहण्याची संधी मिळाली. परंतु या वर्षाची अधिवेशने मोठी असतील जेणेकरून साक्षीदारांना इतर ठिकाणच्या आपल्या बंधूभगिनींबरोबर सहवास राखायची संधी मिळेल.
२. अधिवेशनाचा पुरेपूर फायदा घेण्याकरता आपण आतापासूनच काय करू शकतो?
२. आत्तापासूनच योजना करा: आपल्याकरता जो आध्यात्मिक कार्यक्रम अतिशय प्रेमळपणे तयार केला जात आहे, त्यापासून पुरेपूर फायदा करून घेण्यासाठी आपण सबंध कार्यक्रमाला उपस्थित राहणे आवश्यक आहे. तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला तिन्ही दिवसांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहता यावे म्हणून आतापासूनच विचारपूर्वक व्यवस्था करायला लागा. (नीति. २१:५) उदाहरणार्थ, रजेकरता अर्ज करणे, वैवाहिक जोडीदार साक्षीदार नसल्यास त्याच्या/तिच्यासोबत आपल्या योजनांविषयी चर्चा करणे, हॉटेल रुमचे आरक्षण करणे आणि आपल्या बायबल विद्यार्थ्यांना प्रत्येक दिवशी उपस्थित राहता यावे म्हणून त्यांना साहाय्य करणे. ही महत्त्वाची कामे शेवटच्या मिनिटापर्यंत लांबणीवर टाकू नका. उलट, या गोष्टी प्रार्थनेत यहोवासमोर ठेवा आणि तो “कार्यसिद्धि करील” हा भरवसा बाळगा. (स्तो. ३७:५) काळजीपूर्वक योजना केल्यास तुम्ही निश्चित्तच आर्थिक बोजा उचलू शकाल. आपण जर, आतापासूनच अधिवेशनापर्यंत येणाऱ्या प्रत्येक आठवड्यांसाठी एक ठराविक रक्कम बाजूला काढून ठेवली तर, या साठवलेल्या पैशात आपल्या कुटुंबाच्या प्रत्येक सदस्याच्या प्रवासाचा, मुक्कामाचा आणि खाण्यापिण्याचा खर्च निघू शकतो.—१ करिंथ. १६:२ शी तुलना करा.
३. आपल्या मुक्कामाकरता ज्या व्यवस्था करण्यात आल्या आहेत त्यांना आपण सहकार्य का दिले पाहिजे?
३. अधिवेशन होणार आहे त्या प्रत्येक शहरात बांधवांच्या मुक्कामाकरता पुरेशा खोल्या उपलब्ध करून देण्यासाठी यहोवाच्या संस्थेने बरेच प्रयत्न केले आहेत. या तरतुदी करण्यास ज्यांनी आत्मत्यागी भावनेने व कष्टपूर्वक हातभार लावला त्या सर्व बांधवांबद्दल जर आपण कदर व्यक्त करू इच्छितो, अधिवेशनाला येणाऱ्या आपल्या इतर बांधवांबद्दल विचारशीलता दाखवू इच्छितो, आणि ईश्वरशासित व्यवस्थेबद्दल आदर दाखवू इच्छितो तर या लेखात दिलेल्या सूचनांना पूर्ण सहकार्य देण्यास आपण प्रवृत्त झाले पाहिजे.—१ करिंथ. १३:५; १ थेस्सलनी. ५:१२, १३; इब्री १३:१७.
४-६. हॉटेलच्या खोल्यांचे बुकींग करताना आपण कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि का? (पृष्ठ ४ वरील चौकोन पाहावा.)
४. हॉटेल बुकींग: उपलब्ध असलेली हॉटेल्सची यादी अधिवेशन व्हायच्या पुष्कळ दिवसांआधी माहितीफलकावर लावली जाईल. तुम्ही सहकार्य दिल्यास, दर वर्षी अधिवेशनाच्या ठिकाणाजवळ, कमी दरात उत्तम हॉटेल्स शोधता येतील.—१ करिंथ. १४:४०.
५. अधिवेशनादरम्यान जितक्या खोल्या तुम्ही वापरणार आहात तितक्याच खोल्यांचे बुकींग करा. तुम्ही जर दुसऱ्या कोणासाठी खोलीचे बुकींग करण्याचे कबूल केले असेल तरच तुम्ही अतिरिक्त खोल्यांचे बुकींग करू शकता आणि असे करताना ज्या व्यक्ती नक्कीच त्या खोल्यांमध्ये राहतील त्यांची नावे द्या. नाहीतर अधिवेशनाकरता बुकींग केलेल्या खोल्या संपल्याचा भास निर्माण होतो आणि अधिवेशनाला येणाऱ्या इतर बांधवांना बुकींग करणे कठीण होऊन बसते. जी व्यक्ती खोलीत राहणार असेल तिच्याच नावावर त्या खोलीचे बुकींग करावे.
६. तुमच्या बुकींगची खात्री करण्यासाठी जितक्या खोल्या आरक्षित केल्या असतील त्या प्रत्येक खोलीसाठी हॉटेलला डिपॉझिट देणे आवश्यक आहे. नाहीतर हॉटेलचे व्यवस्थापन ती खोली दुसऱ्यांना देण्यास मोकळे आहेत. जर यादीत दिलेल्या सर्व हॉटेल्सना फोन करूनही तुम्हाला खोल्या मिळाल्या नाहीत, किंवा जर एखाद्या हॉटेलच्या संबंधाने तुम्हाला काही समस्या उद्भवल्यास आपल्या मंडळीच्या सचिवांना कळवा. त्याने मग शाखा दफ्तराशी नव्हे, तर अधिवेशनाच्या रूमिंग डिपार्टमेंटशी संपर्क साधावा. यादीच्या वरच्या बाजूला यासंबंधी माहिती दिली आहे. यादीत ज्या हॉटेलचे नाव नाही, त्यांच्याशी संपर्क साधण्याऐवजी कृपया तुमच्या अधिवेशनाकरता नवीन यादी मिळेपर्यंत थांबावे.
७, ८. खास गरजा असलेल्या बंधूभगिनींची काळजी कशी घेतली जाऊ शकते?
७. खास गरजा: नीतिसूत्रे ३:२७ मध्ये म्हटले आहे: “एखाद्याचे बरे करणे उचित असून ते करण्याचे तुझ्या अंगी सामर्थ्य असल्यास, ते करण्यास माघार घेऊ नको.” अधिवेशनाच्या बाबतीत आपण इतरांचे बरे कसे करू शकतो? वयोवृद्ध, आजारी, पूर्ण वेळेत असलेले किंवा इतर प्रचारकांना काही व्यावहारिक मदतीची गरज असेल, जसे की अधिवेशनाला जाण्या-येण्याच्या किंवा मुक्कामाच्या संबंधाने मदत हवी असेल. अशा लोकांच्या गरजा पूर्ण करण्याची पहिली जबाबदारी ही त्यांच्या नातेवाईकांची आहे. (१ तीम. ५:४) ते असे करू शकत नसतील तर, सहउपासक त्यांना मदत करू शकतात. (गलती. ६:१०) पुस्तक अभ्यास पर्यवेक्षकांनी, त्यांच्या गटातील अशा बंधूभगिनींनी अधिवेशन व्हायच्या पुरेशा दिवसांआधी योजना केल्या आहेत की नाही हे पाहावे.
८. खास गरजा रूम विनंती अर्ज, केवळ ज्यांच्या राहण्याची व्यवस्था त्यांचे कौटुंबिक सदस्य किंवा मंडळीतील कोणी करू शकत नसलेल्या प्रचारकांना मिळतील. मंडळीतील सेवा समितीने, फॉर्मवरील सूचनांनुसार व सर्व वडिलांना पाठवलेल्या डिसेंबर १४, २००५ तारखेच्या पत्रानुसार प्रचारकाच्या पात्रतेविषयी विचारविनिमय करावा. ही तरतूद केवळ अशा प्रचारकांसाठी आहे ज्यांचे आचरण उत्तम आहे आणि ज्यांच्या मुलांचेही वर्तन उत्तम आहे.
९. (क) तुमच्या मंडळीला नेमलेल्या अधिवेशनालाच तुम्ही उपस्थित का राहिले पाहिजे? (ख) तुमच्या परिस्थितीमुळे तुम्हाला दुसऱ्या एखाद्या अधिवेशनाला उपस्थित राहायचे असेल तर तुम्ही काय काय केले पाहिजे?
९. दुसऱ्या अधिवेशनाला जाणे: पुरेशी आसने, साहित्य, राहण्याकरता खोल्या वगैरे, आहेत की नाही याची खात्री करण्यासाठी तुम्हाला, तुमच्या मंडळीला ज्या अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी नेमण्यात आले आहे त्या अधिवेशनाला उपस्थित राहण्याचे उत्तेजन दिले जाते. पण तुमच्या परिस्थितीमुळे तुम्हाला दुसऱ्या एखाद्या अधिवेशनाला उपस्थित राहावे लागत असेल तर अधिक माहितीकरता कृपया आपल्या मंडळीच्या सचिवांशी संपर्क साधा. सुचवलेल्या लॉजेसची यादी हवी असेल किंवा कोणतीही अधिक माहिती हवी असेल तर सोबत, एक रिकामे पाकीट पाठवा ज्यावर पोस्टाचे तिकिट लावले आहे आणि तुमचा पत्ता लिहिला आहे. शहरात एकापेक्षा अधिक अधिवेशने होणार असतील तर तुम्ही कोणत्या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहात त्याची तारीख स्पष्ट लिहा.
१०. एक मार्ग कोणता आहे ज्याद्वारे आपण येणाऱ्या अधिवेशनाच्या आनंदात भर पाडू शकतो?
१०. इच्छुक स्वयंसेवक: खरेच, अधिवेशनाला येणाऱ्या सर्वांना आनंद मिळतो, तेथे दिल्या जाणाऱ्या आध्यात्मिक भोजनाचा लाभ होतो आणि उभारणीकारक सहवासासाठी संधी मिळते. अधिवेशन यशस्वी होण्याकरता केल्या जाणाऱ्या कामात आपलाही हातभार लावल्यास आपला आनंद द्विगुणीत होईल. (प्रे. कृत्ये २०:३५) स्थानीय अधिवेशन समित्या लवकरच बंधूभगिनींना या कार्यात भाग घेण्याचे आमंत्रण देतील. या कामासाठी तुम्ही स्वतःला उपलब्ध कराल का?—स्तो. ११०:३.
११. वार्षिक प्रांतीय अधिवेशनांबद्दल कोणती गोष्ट तुम्हाला प्रिय वाटते आणि तुमचा निर्धार काय असला पाहिजे?
११. एका प्रांतीय अधिवेशनाला उपस्थित राहताना, एका पाच वर्षांच्या मुलाने म्हटले: “प्रांतीय अधिवेशन, यहोवाच्या उपासनेतील माझी सर्वात आवडती गोष्ट आहे.” आपल्या वार्षिक प्रांतीय अधिवेशनांना उपस्थित राहण्याचा आपल्याला किती आनंद होतो हे, मनापासून काढलेले या उद्गारांवरून आपल्याला कळते. स्तोत्रकर्त्यालाही अगदी असेच वाटले म्हणून त्याने असे गायिले: “तुझ्या अंगणातील एक दिवस हा सहस्र दिवसापेक्षा उत्तम आहे.” (स्तो. ८४:१०) “आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी; म्हणजे मी . . . त्याच्या मंदिरात ध्यान करीन” ही इच्छा दाविदाने एका गीतात व्यक्त केली. (स्तो. २७:४) यहोवाच्या उपासकांच्या मध्ये राहण्यास दावीदाला खूप आनंद वाटायचा. आपणही “मुक्तिसमय जवळ आला आहे” या प्रांतीय अधिवेशनाच्या तिन्ही दिवशी उपस्थित राहून दावीदाप्रमाणे खऱ्या उपासनेबद्दल आपल्याला किती कदर आहे हे दाखवू या.
[३ पानांवरील चौकट]
कार्यक्रमांची वेळ
शुक्रवार आणि शनिवार
सका. ९:३० पासून संध्या. ५:०५.
रविवार
सका. ९:३० पासून संध्या. ४:१०
[४ पानांवरील चौकट]
हॉटेलमध्ये रूम बुक करण्यासाठी तुम्ही काय करू शकता
१. सुचवलेल्या लॉजेसच्या यादीत दिलेल्या फोन नंबरवर हॉटेल चालू असतानाच्या वेळेत फोन करा.
२. तुम्ही यहोवाच्या साक्षीदारांच्या अधिवेशनासाठी उपस्थित राहणार आहात हे हॉटेलमालकांना सांगा.
३. तुम्ही हॉटेलमध्ये नेमक्या कोणत्या तारखेला येणार व कोणत्या तारखेला खोली सोडणार ते सांगा.
४. एका हॉटेलमधल्या सर्व खोल्या बुक झाल्या असतील तर यादीत सांगितलेल्या दुसऱ्या हॉटेलला फोन करा.
५. यादीत दाखवलेल्या खोल्यांच्या दरापेक्षा जास्त दर असलेली खोली स्वीकारू नका.
६. खोली बुक करा आणि कन्फरमेशन मागा.
७. क्रेडिट कार्ड, चेक किंवा मनी ऑर्डरने खोलीच्या डिपॉझिटचे पैसे दहा दिवसांच्या आत पाठवा. रोख रक्कम कधीही पाठवू नका. चेक किंवा मनी ऑर्डरने डिपॉझिटचे पैसे पाठवले असतील तर पुढे कन्फरमेशनची सविस्तर माहिती लिहा.
कृपया
▪ तुम्हाला लागतील इतक्याच खोल्या बुक करा.
▪ खोल्यांचे बुकींग सारखे सारखे बदलू नका.—मत्त. ५:३७.
▪ एका खोलीत जितक्या लोकांना हॉटेल परवानगी देते त्याच्यापेक्षा अधिक लोकांना खोलीत राहायला घेऊ नका.