आम्हाला काही मदत द्यायची असेल तर ती कशी देता येईल?
१ जगाच्या एखाद्या भागात आपत्ती आल्याचे वृत्त ऐकल्यावर, “आम्हाला काही मदत द्यायची असेल तर ती कशी देता येईल?” असे यहोवाचे साक्षीदार सहसा विचारतात. प्रेषितांची कृत्ये ११:२७-३० वचनांतील अहवालानुसार आपल्याला कळते, की पहिल्या शतकातील ख्रिश्चनांनी, यहुदात दुष्काळ आला तेव्हा तेथे राहणाऱ्या बांधवांना मदत पुरवली होती.
२ आधुनिक काळांत आपल्या संस्थेच्या नियमांमुळे, दानधर्म करण्यासाठी व नैसर्गिक किंवा मानवांमुळे आलेल्या विपत्तींत किंवा इतर गरजेच्या काळात मदत पुरवण्यासाठी पैशाचा वापर करणे शक्य होते.
३ उदाहरणार्थ, गेल्या वर्षी पुष्कळ बंधूभगिनींनी, दक्षिण आशियात आलेल्या सुनामी विपत्तीचा परिणाम झालेल्यांसाठी सढळ हाताने देणग्या पाठवल्या. अशाप्रकारे संस्थेच्या मदत निधीला पाठवलेल्या देणग्यांची मनापासून प्रशंसा केली जाते. परंतु, देणगीसोबत जेव्हा असे लिहून पाठवले जाते, की ही देणगी अमूक विपत्तीसाठी आहे तेव्हा, काही देशांत असा कायदा आहे, की देणगीदाराने ज्या उद्देशाने त्या देणग्या पाठवल्या आहेत त्याच उद्देशासाठी व एका मर्यादित कालावधीत वापरल्या जाव्यात; मग, तेथील बांधवांच्या गरजा पूर्ण करण्यात आल्या असोत अथवा नसोत.
४ त्यामुळे, दानधर्मासाठी व मदत कार्यांसाठी पाठवल्या जाणाऱ्या देणग्या जागतिक कार्यासाठी पाठवाव्यात असे सुचवले जाते. या निधीचा उपयोग मदत कार्यांसाठी तसेच ख्रिस्ती बंधूवर्गाच्या आध्यात्मिक गरजा पूर्ण करण्याकरता केला जातो. समजा, एखादी व्यक्ती जगभराच्या कार्यासाठी असलेल्या देणगी व्यतिरिक्त विपत्तीसाठी दान करू इच्छित असेल तर ते स्वीकारले जाईल आणि जेव्हा मदत देण्याची गरज उद्भवेल तेव्हा त्या दानाचा उपयोग केला जाईल. परंतु, दान म्हणून दिला जाणारा निधी कोठे आणि केव्हा वापरला पाहिजे यासंबंधाने कोणत्याही अटी न ठेवता देणे उचित ठरेल.
५ जगव्याप्त कार्यासाठी असलेल्या निधीत प्रामुख्याने देणगी टाकल्यामुळे अधिक देणगी गोळा होते जिचा उपयोग, फक्त भवितव्यात विपत्तीच्या वेळीच नव्हे तर राज्य कार्याच्या इतर पैलूंसाठी देखील करता येऊ शकतो. हे इफिसकर ४:१६ वचनाच्या सुसंगतेत आहे. तेथे आपल्याला, ‘आपली रचना प्रीतीमध्ये होण्याकरता व शरीराची वृद्धि होण्याकरता’ ज्याची गरज आहे ते पूर्ण करण्यासाठी एकत्र मिळून काम करण्याचे उत्तेजन दिले आहे.