व्यक्तिगत आस्था घ्या—निरीक्षक वृत्ती ठेवण्याद्वारे
१ यहोवा देव आणि ख्रिस्त येशू, लोकांच्या विशिष्ट गरजा ओळखून त्यांना साहाय्य देण्यात अतिउत्तम उदाहरण आहेत. (२ इति. १६:९; मार्क ६:३४) सेवेत आपल्याला भेटणाऱ्या लोकांच्या आवडी-निवडी आणि चिंता जेव्हा आपण ओळखतो तेव्हा आपण सुवार्ता सांगण्याच्या आपल्या पद्धतीत त्यानुसार फेरबदल करू शकतो.
२ बारीकसारीक गोष्टींकडेही लक्ष द्या: येशूचे चहूकडे लक्ष होते. (मार्क १२:४१-४३; लूक १९:१-६) तसेच, आपणही जेव्हा घरमालकाच्या दारी जातो आणि घरातील धार्मिक सजावट, वाहनांवरील घोषवाक्ये, अंगणातील खेळणी, या सर्व गोष्टी लक्षपूर्वक पाहतो तेव्हा सुवार्तेची प्रभावी साक्ष देण्यासाठी संधी निर्माण करू शकतो.
३ घरमालकाच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि त्याचे वर्तन आपल्याला त्याच्या भावनांविषयी काहीतरी सांगून जाते. (नीति. १५:१३) कदाचित, त्याच्या एखाद्या प्रिय व्यक्तिच्या मृत्यूमुळे किंवा एखाद्या दुःखदायक परिस्थितीमुळे तो असा निराश असेल व त्याला सांत्वनाची गरज असेल. शास्त्रवचनांतून उचित वचने वाचून दाखवलेले त्याला कदाचित आवडेल. (नीति. १६:२४) घरमालक घाईगडबडीत घरातून निघण्याच्या तयारीत आहे का किंवा त्याच्या हातात सतत रडत असलेले बाळ आहे का? आहे तर, मग आपण दुसऱ्या वेळेला जाणे जास्त बरे राहील. विचारशीलपणा व “समसुखदुःखी,” असल्यामुळे आपण जेव्हा पुढच्या वेळी त्याच्याकडे पुन्हा जाऊ तेव्हा तो आपले बोलणे ऐकण्यास प्रेरित होईल.—१ पेत्र ३:८.
४ परिस्थितीनुसार शब्द निवडा: प्रेषित पौलाने, अथेन्स शहरात “अज्ञात देवाला” अशी अक्षरे लिहिलेली एक वेदी पाहिली. त्यामुळे त्याच्या सुवार्ता सादरतेवर परिणाम झाला. तो म्हणाला: “ज्यांचे तुम्ही अज्ञानाने भजन करिता ते मी तुम्हाला जाहीर करितो.” पौलाच्या या व्यवहारचतुर पद्धतीमुळे उपस्थित असलेल्यांतील काही जण, राज्य संदेशाला प्रतिसाद देऊन विश्वास ठेवण्यास प्रवृत्त झाले.—प्रे. कृत्ये १७:२३, २४.
५ याचप्रकारे, आपणही जर निरीक्षक वृत्ती बाळगली तर आपल्याला घरमालकाला कोणत्या गोष्टींत आस्था आहे हे समजून घेता येईल आणि त्यानुसार मग सुवार्ता सादर करता येईल. घरमालकाच्या मनातील विचार काढून घेण्याकरता प्रश्नांचा उपयोग करा. कोणत्या शास्त्रवचनांनी त्याची आस्था वाढेल, यावर विचार करा. (नीति. २०:५) निरीक्षक वृत्ती बाळगण्याद्वारे व व्यक्तिगत आस्था घेण्याद्वारे आपण इतरांना कुशलतेने सुवार्ता सांगू शकू.