यहोवाचे गौरव जाहीर करा
१ “हे सर्व पृथ्वी, परमेश्वराचे गुणगान कर. . . . राष्ट्रांमध्ये त्याचे गौरव, सर्व लोकांमध्ये त्याची अद्भुतकृत्ये जाहीर करा.” हे आहेत स्तोत्रकर्त्याचे शब्द. यहोवाने आपल्यासाठी आतापर्यंत जे काही केले आहे, जे करत आहे, व जे करणार आहे यावर जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपले हृदय त्याचे गौरव जाहीर करण्यास प्रेरित होते!—स्तो. ९६:१, ३.
२ आपल्या सेवाकार्यात: यहोवाच्या साक्षीदारांना त्याचे नाव धारण करण्याचा व संपूर्ण पृथ्वीवर त्याच्या नावाची स्तुती करण्याचा बहुमान मिळाला आहे. (मला. १:११) पण ख्रिस्ती धर्मजगताचे पाळक याबाबतीत किती उलट आहेत. त्यांनी तर चक्क देवाचे नाव त्यांच्या बायबल भाषांतरांमधून काढून टाकण्याइतपत मजल मारली आहे! देवाचे नाव प्रकट करण्याचे काम निकडीचे आहे कारण, येणाऱ्या महासंकटातून बचावण्याकरता लोकांनी विश्वासाने या नावाचा धावा करणे अगत्याचे आहे. (रोम. १०:१३-१५) शिवाय, विश्वव्यापी शांती आणि पृथ्वीच्या रहिवाशांमधील शांती, देवाच्या नावाच्या पवित्रीकरणावर अवलंबून आहे. होय, देवाची सर्व कार्ये त्याच्या नावाशी संबंधित आहेत.
३ “परमेश्वर थोर व परमस्तुत्य आहे.” पण लोकांनी जर ‘परमेश्वराच्या नावाची थोरवी गायची’ आहे तर त्यांना त्याच्याविषयीचे सत्य माहीत असले पाहिजे. (स्तो. ९६:४, ८) काही लोक देवाचे अस्तित्व नाकारतात. (स्तो. १४:१) तो शक्तिहीन आहे, त्याला मानवजातीत कसलाच रस नाही, असा काही जण त्याच्यावर दोषारोप लावून त्याच्या नावावर काळीमा फासतात. यास्तव, नम्र अंतःकरणाच्या लोकांना जेव्हा आपण आपल्या निर्माणकर्त्याविषयी, त्याच्या उद्देशांविषयी आणि त्याच्या प्रेमळ गुणांविषयीचे अचूक ज्ञान घेण्यास मदत करत असतो तेव्हा आपण खरे तर यहोवाचा गौरव करत असतो.
४ आपल्या वर्तनाद्वारे: यहोवाच्या धार्मिक स्तरांनुसार जगल्याने त्याच्या नावाचा गौरव होतो. आपले उत्तम आचरण लपत नाही. (१ पेत्र २:१२) जसे की, आपल्या स्वच्छ, नीटनेटक्या पेहरावावर लोक अनुकूल शेरा मारतात तेव्हा आपल्याला देवाच्या वचनातील तत्त्वांनुसार जीवन व्यतीत करण्याचे कोणकोणते फायदे आहेत हे सांगण्याची संधी मिळते. (१ तीम. २:९, १०) आपली ‘सत्कर्मे पाहून लोक आपल्या स्वर्गातील पित्याचे गौरव’ करतात हे पाहून आपल्याला किती आनंद होतो, नाही का?—मत्त. ५:१६.
५ तेव्हा, आपल्या वागण्याद्वारे आणि आपल्या कार्यांद्वारे आपण दररोज आपल्या अद्भुत देवाची थोरवी गाऊ या. आणि “परमेश्वराचे गुणगान करा, त्याच्या नावाचा धन्यवाद करा; त्याने केलेल्या तारणाची घोषणा प्रतिदिवशी करा,” या आनंदी आमंत्रणाला प्रतिसाद देऊ या.—स्तो. ९६:२.