एकमेकांची उन्नती करा
१ प्रेषित पौलाने आपल्या सहख्रिस्ती बांधवांना साहाय्य करण्याचा हर तऱ्हेने प्रयत्न केला. (प्रे. कृत्ये १४:१९-२२) त्याचप्रमाणे आपल्या बांधवांना कठीण परिस्थितींना तोंड द्यावे लागते तेव्हा आपल्यालाही त्यांच्याबद्दल काळजी वाटते आणि त्यांना मदत करण्यास आपण उत्सुक असतो. बायबल दाखवते की मंडळीत फक्त वडिलांनीच नव्हे तर सर्वांनी इतरांबद्दल आस्था बाळगली पाहिजे. (रोम. १५:१, २) “एकमेकांचे सांत्वन करा व एकमेकांची उन्नति करा,” या प्रेमळ सल्ल्याचे पालन करण्याच्या दोन मार्गांवर विचार करू या.—१ थेस्सलनी ५:११.
२ दुसऱ्यांच्या गरजा ओळखा: देवाचे वचन आपल्याला सांगते की दुर्कस ही “सत्कृत्ये व दानधर्म करण्यात तत्पर असे.” (प्रे. कृत्ये ९:३६, ३९) गरजू लोकांकडे ती लक्ष देई आणि आपल्या परीने त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करी. आपल्याकरता तिने किती उत्तम उदाहरण पुरवले आहे! कदाचित, एखाद्या वयस्क बंधू अथवा बहिणीला सभेला जाण्याकरता मदतीची गरज असेल. किंवा आठवड्यातल्या विशिष्ट दिवशी एखाद्या पायनियरसोबत कार्य करण्यासाठी कोणीही नसेल. या बांधवांना मदतीची गरज आहे हे ओळखून, तुम्ही व्यावहारिक मार्गाने त्यांना मदत केल्यास त्यांना किती प्रोत्साहन मिळेल याची कल्पना करा!
३ आध्यात्मिक संभाषणे: आपल्या संभाषणानेही आपण इतरांची उन्नती करू शकतो. (इफिस. ४:२९) एका अनुभवी वडिलाने म्हटले: “जर तुम्हाला कोणाला प्रोत्साहन द्यायचे असेल, तर आध्यात्मिक गोष्टींविषयी बोला. संभाषण सुरू करण्यासाठी, ‘तुम्हाला सत्य कसे मिळाले?’ यासारखा साधासा प्रश्न तुम्ही विचारू शकता.” मंडळीतल्या तरुणांकडे खास लक्ष द्या. जे निरुत्साहित झाले आहेत व जे लाजाळू स्वभावाचे आहेत अशा व्यक्तींबद्दल आस्था व्यक्त करण्यास पुढाकार घ्या. (नीति. १२:२५) जगिक करमणुकीबद्दल बोलण्यात वेळ वाया घालवून आपल्या बांधवांसोबत उत्तम आध्यात्मिक चर्चा करण्याची संधी गमावू नका.—रोम. १:११, १२.
४ पण इतरांना प्रोत्साहन मिळण्याकरता तुम्ही कशाविषयी बोलू शकता? तुमच्या वैयक्तिक बायबल वाचनात व अभ्यासात अलीकडे तुम्हाला एखादा असा मुद्दा आढळला का की ज्यामुळे यहोवाबद्दल तुमच्या मनातले प्रेम व कृतज्ञता वाढली? जाहीर भाषणात अथवा टेहळणी बुरूज अभ्यासात एखाद्या मुद्द्यामुळे तुम्हाला विशेष प्रोत्साहन मिळाले का? किंवा एखादा अनुभव तुमच्या मनाला स्पर्शून गेला का व त्यामुळे तुमचा विश्वास दृढ झाला का? अशाप्रकारची आध्यात्मिक रत्ने तुम्ही जपून ठेवल्यास, इतरांना प्रोत्साहित करण्यासाठी तुमच्याजवळ नेहमी काही ना काही असेल.—नीति. २:१; लूक ६:४५.
५ तर व्यावहारिक मदत पुरवून व आपल्या जिभेचा सुज्ञतेने वापर करून आपण सदोदीत एकमेकांची उन्नती करत राहू या.—नीति. १२:१८.